जोतिबा देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू - टोपे Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
श्री जोतिबा देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी दिले. तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन दख्खनचा राजा जोतिबांचे दर्शन घेताना त्यांनी मंदिरातील व गावातील समस्या जाणून घेतल्या.
 पुजारी उत्कर्ष समितीच्या वतीने त्यांना श्री जोतिबाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जोतिबा पुजारी समितीचे दत्तात्रय मिटके यांनी मंदिरात अखंडितपणे वीजपुरवठा व्हावा व गावामध्ये संपूर्ण विद्युत यंत्रणा ही भूमिगत स्वरूपात करण्याची मागणी केली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार विनय कोरे यांच्याशी चर्चा करून लवकरच याची कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. सध्या जोतिबा डोंगराला ‘ब’ वर्गा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती दिली असता या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
यावेळी पुजारी उत्कर्ष समितीचे पदाधिकारी, सहायक अभियंता अजित अस्वले, शशांक अष्टेकर, जोतिबा शाखा अभियंता सचिन काटकर, स्थानिक पुजारीवर्ग, लाटकरकाका व ग्रामस्थ उपस्थित होते.