नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेताना कर्मचाऱ्यास पकडले Print

सोलापूर /प्रतिनिधी
हॉटेल व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहायक निर्मल ईश्वर पवार (वय ४६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील बशीर बाबासाहेब जहागीरदार यांनी टेंभुर्णी येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी जि.प. आरोग्य विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील संबंधित आरोग्य सहायक निर्मल पवार (रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर) याची भेट घेऊन कामाची पूर्तता करण्याची विनंती केली होती. परंतु पवार याने या कामासाठी लाच मागितली. त्यामुळे जहागीरदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे फिर्याद नोंदविली होती.
त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त शंकरराव चव्हाण व पोलीस निरीक्षक संगीता हत्ती यांच्या पथकाने जि.प. आरोग्य विभागाच्या कार्यालयात सापळा रचून आरोग्य सहायक पवार यास लाच घेतल्यानंतर लगेचच पकडले.