सोलापूर पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा पगाराअभावी दिवाळीऐवजी ‘शिमगा’ Print

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर दूरच, गेल्या दोन महिन्यांपासून पगारही अदा झाला नाही. त्यामुळे या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर दिवाळीत ‘शिमगा’ करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावर सत्तेत असूनही पालिका स्तरावर जबाबदारी पार पाडण्यापासून दूर राहिलेले परिवहन समितीचे सभापती मल्लेश बडगू यांनी कामगारांसह सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याची टीका होत आहे.
पालिका परिवहन विभागाची अवस्था बिकट असून चार वर्षांपूर्वी तत्कालीन सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी पालिका परिवहन विभागाचे व्यवस्थापन यशस्वीरीत्या सांभाळून या विभागाला ऊर्जितावस्था मिळवून दिली होती. मात्र त्यांच्या पश्चात पुन्हा परिवहन विभाग संकटात आला.
परिवहन विभाग समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे असून मल्लेश बडगू हे अजित पवारनिष्ठ कार्यकर्ते सभापतिपद सांभाळत आहेत. परंतु त्यांना परिवहन बससेवेची पूर्ववत घडी बसविता आली नाही. परिवहन विभागात नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या. अनेक बसथांबे विकसित झाले. यात कोटय़वधींचा व्यवहार झाला. परंतु तरीदेखील हा विभाग कधीच रुळावर आला नाही. कर्मचाऱ्यांना कधीच वेळेवर पगार अदा होत नाहीत. अलीकडे दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार अदा झाले नाहीत. दिवाळीतही त्यांच्या घरात अंधार कायम आहे. कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे सातशे एवढी आहे. बोनससह पगारासाठी सुमारे दीड कोटीची रक्कम लागणार आहे. मात्र तेवढी तरतूद नसल्यामुळे कर्मचारी पगारापासून वंचित आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी संवेदनशील नसल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे परिवहन कर्मचारी संघटनाही रस्त्यावर येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
यासंदर्भात परिवहन विभागाचे सभापती मल्लेश बडगू यांनी, आपण सत्ताधारी असूनदेखील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल खंत व्यक्त केली. दरम्यान, या पाश्र्वभूमीवर परिवहन विभागाचे व्यवस्थापक तीन दिवसांच्या रजेवर गेले आहेत.