परंपरा, आधुनिकतेच्या समन्वयातून संशोधन करावे - पटवर्धन Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक पद्धतीचा समन्वय साधून संशोधकांनी संशोधन यशोधन करावे. आपला ज्ञानाचा फायदा इतरांना होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.भूषण पटवर्धन यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव वर्षांनिमित्त वनस्पतिशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘औषधी वनस्पती : वर्तमान आणि भविष्यकालीन उपचारपद्धती’ या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ‘औषधी वनस्पती दिशा आणि दृष्टिकोन’ या विषयावर बोलत होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, एकाचवेळी होमिओपॅथिक व आयुर्वेदिक औषधे घेऊ नये, असे केल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. औषधी वनस्पती जरी कमी प्रमाणात असली तरी त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांची माहिती सर्वाना झाली पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. एन. जे.  पवार म्हणाले, वनस्पतिशास्त्र विभागात चांगल्या प्रकारची संशोधन होत आहेत. यासाठी सर्व ती मदत विद्यापीठ प्रशासन करीत आहे. याचा वापर समाजातील प्रत्येकाला होत आहे. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एस. कांबळे म्हणाले, औषधी वनस्पती बद्दलचे जे गैरसमज होत आहेत ते दूर करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या सत्रात धारवाड विद्यापीठातील डॉ.जी. आर. हेगडे यांचे इकोमेडिसिन व हर्मा हेगडे यांचे ’आयुर्वेद केमिस्ट’ या विषयावर चर्चासत्र झाली. प्रास्ताविक प्रा. एस. आर. यादव यांनी, सूत्रसंचालन डॉ. एस. आर. घाटगे यांनी केले तर आभार डॉ. एन.एस.चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ.ए. बी. साबळे यांनी केले. सर्व विभागांचे विभागप्रमुख प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.