सद्गुरू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ Print

सोलापूर/प्रतिनिधी
सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ाच्या हद्दीवर मर्यादित सभासदांच्या खासगी मालकीचा राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री. सद्गुरू साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा प्रारंभ आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सद्गुरू रवी शंकर यांच्या हस्ते मोळी टाकून २२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती या कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरी राव यांनी दिली.
अतिशय आधुनिक तंत्रज्ञान व संपूर्ण संगणकीकरणाबरोबरच पूर्ण राजकारण विरहित कामकाज असलेल्या या २५०० मे. टन गाळप क्षमतेच्या उभारणीचे काम केवळ दीड वर्षांत पूर्ण झाले .२२ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष गाळपास सुरुवात होत आहे. या वर्षीच्या चाचणी गळीत हंगामातही कारखान्याकडे या २७ हजार एकर उसाच्या नोंदी असून सुमारे ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. केवळ एक किलोमीटर अंतरामुळे सांगली जिल्ह्य़ात कार्यक्षेत्र गेले असले व गाळप सोलापूर, सातारा जिल्ह्य़ातील उसाचे करणार असले तरी कारखाना उसाला भाव मात्र कोल्हापूर झोनप्रमाणेच देणार आहे. हा कारखाना श्री. श्री. सद्गुरू या समाजसेवी संस्थेचा असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात जादा उत्पादन घेण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी कारखाना कार्यस्थळावर संस्थेच्या मालकीच्या ५५० एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती, गोशाळा, आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
शेतीचे आरोग्य टिकवण्यासाठी ती रसायनमुक्त करून घराघरात देशी गायीचे महत्त्व पटवून देऊन शेतकऱ्यांना १० तासांचे प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध उपक्रम शिकवण्यात येणार असून त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाबरोबरच आत्मविश्वासही वाढणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर, कार्यकारी संचालक उदय जाधव, डॉ. माधवराव पोळ आदी संचालक उपस्थित होते.