साखरेवर कारखान्यांना ९० टक्के कर्ज देण्याची शंभूराज देसाई यांची मागणी Print

कराड /वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती बँकांनी जे कारखाने कर्जमुक्त आहेत त्यांना नाबार्डच्या नियमाला लवचिकता ठेवून साखरेवर ८५ टक्क्यांऐवजी ९० टक्के कर्ज द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातल्या त्यात पहिला हप्ता बरा देता येईल, अशी मागणी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे सर्वेसर्वा व माजी आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. त्या संदर्भातील निवेदन आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.    
शंभूराज देसाई म्हणाले की, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेने साखरेचा भाव २८०० ते २९०० रुपये धरला आहे. त्यावर बँक साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर ८५ टक्के रक्कम उचल म्हणून देणार. त्यानुसार बँक २५०० रुपयांच्या दरम्यान उचल देणार. त्यातून कारखान्यांनी घेतलेले पूर्व हंगामी कर्ज, तोडणी वाहतूक यंत्रणा, संस्थासाठीचे कर्ज यासाठी बँक किमान तीनशे रुपये कापून घेते. त्याचबरोबर कारखाना सुरू केल्यावर दर १५ दिवसांनी तोडणी वाहतूकदारांची बिले, लागणारे डिझेल, नोकरांचे पगार व अन्य गोष्टींसाठी किमान २५० ते ३०० रुपये लागतात.
मिळणाऱ्या उचलीतून ही रक्कम वजा केल्यास कारखान्याला १९०० रुपये हातात शिल्लक राहतात. सध्या बाजारात साखरेचा भाव ३ हजार ३०० रुपये सुरू आहे. लेव्ही साखरेचा केंद्र शासनाचा दर १८९३ रुपये आहे. याची सरासरी ३१६० रुपये होते.
जिल्हा बँकेने ८५ टक्के उचल देण्याएवजी ९० टक्के रक्कम दिली, तर दहा टक्के रक्कम राखून ठेवून किमान २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये एका पोत्याला उपलब्ध होतील.
मात्र, नाबार्ड आणि राज्य बँकेच्या नियमाप्रमाणे बँका ८५ टक्केच्या वर कर्ज देणार नाहीत. जे कारखाने कर्जमुक्त आहेत त्यांच्यासाठी जिल्हा बँकेने लवचिक धोरण घेण्ेा आवश्यक आहे. ते पैसे दिल्यावर संबंधित कारखान्यांकडून व्याजासह ते परत मिळणार आहेत.