..अखेर अतिक्रमण निरीक्षकासह तिघे निलंबित Print

गुरांची कातडी विक्री प्रकरण
जळगाव / वार्ताहर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
महापालिकेच्या जप्त केलेल्या गुरांच्या कातडी प्रकरणात आयुक्तांनी अखेर प्रभाग अधिकारी अरविंद भोसलेंसह अतिक्रमण निरीक्षक एच. एम खान आणि जेसीबी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बिथरलेला नगरसेवकांचा एक गट भोसले यांच्या बचावासाठी पुढे सरसावला असून अतिक्रमण निरीक्षकावरील कारवाईचे स्वागत केले जात आहे.
शहराच्या मासूमवाडी परिसरातील एका बंद गोदामातून महापालिकेच्या पथकाने मागील आठवडय़ात गुरांच्या कातडीचा साठा जप्त केला होता. उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्या आदेशाने प्रभाग अधिकारी अरविंद भोसले, अतिक्रमण निरीक्षक खान, संजय ठाकूर यांनी ही जप्तीची कारवाई केली. परंतु जप्तीनंतर कातडीची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजले. या पथकास कातडी जप्त केल्यानंतर ती जमिनीत पुरण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी शिरसोली रस्त्यावरील कत्तलखान्याजवळची जागा निश्चित करण्यात आली होती. प्रभाग अधिकारी अरविंद भोसले यांनी ही जबाबदारी खान आणि ठाकूर यांच्यावर सोपविली. जेसीबी यंत्राद्वारे खड्डा करण्यात आला. त्यात कातडी पुरण्यात आली. ठाकूर यांनी मोबाइलमध्ये या सर्व कामाचे चित्रणही केले. वास्तविक तिघांनी कातडी पुरण्याचा फक्त बनावच केल्याचे नंतर स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते इब्राहिम पटेल यांनी हा चोरीचा प्रकार उघड केला. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्वानाच निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी प्रथम ठाकूर यांच्याविरुद्ध कारवाई केली. ज्यांच्या मालकीची ती कातडी होती, त्याला फक्त दोन लाखांत ती विकण्याची हुशारी या मंडळींनी दाखविली. खड्डा खोदून तो परत तसाच बुजविण्याचे सोपस्कार पथकाने पार पाडले होते. खड्डा उकरल्यावर ही बाब स्पष्ट झाली.
आयुक्तांनी या चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेत भोसले, खान व जेसीबी चालकासही निलंबित केले. नगरसेवकांचा एक गट प्रभाग अधिकारी भोसले यांच्या बचावासाठी पुढे आला आहे. ते प्रामाणिक अधिकारी असल्याचे नितीन लढ्ढा व इतरांचे म्हणणे आहे. अतिक्रमण निरीक्षक खान यांच्यावर कारवाई झाल्याने शहरातील अतिक्रमणधारकांनी आनंद व्यक्त केला आहे. खानबद्दल सत्ताधारी गटासह विरोधी नगरसेवकांनीही ते हप्ते घेतात असे बऱ्याचदा आरोप केले होते.