राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या डॉ. शालिनीताई बोरसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश Print

धुळे / वार्ताहर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच झालेला धुळे दौरा राष्ट्रवादीसाठी फलदायी ठरला नसल्याचे दिसत आहे. दौऱ्याच्या तोंडावरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यानंतर माजी मंत्री डॉ. शालिनीताई बोरसे याही राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या आहेत.
करनकाळ यांनी अद्याप कोणत्याच पक्षात प्रवेश केला नसला तरी, डॉ. बोरसे या मात्र स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे टिळक भवनात डॉ. बोरसे यांचा काँग्रेस प्रवेश झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्य़ातील राजकीय हालचालींना गती आली आहे. प्रस्थापित नेते, कार्यकर्ते शक्य त्या पद्धतीने पक्ष बळकटीकरणाचे प्रयत्न करीत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यावर येण्याआधीच माजी महापौर करनकाळ राष्ट्रवादीतून बाहेर पडले. करनकाळ यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, अशी अपेक्षाही काही राजकारण्यांनी व्यक्त केली. परंतु अद्याप करनकाळ यांची भूमिका अनिश्चित आहे. करनकाळपाठोपाठ माजी मंत्री डॉ. बोरसे यांनी    अजितदादांच्या    दौऱ्यानंतर  राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे पुत्र डॉ. अभय बोरसे यांच्यासह त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.