पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवर भास्कर बनकर यांचे वर्चस्व कायम Print

पिंपळगाव बसवंत
जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी भास्करराव बनकर आणि दिलीप बनकर या दोघांच्याही पॅनलला धक्का देत संमिश्र स्वरूपाचा निकाल दिला. विद्यमान सरपंच भास्कर बनकर यांच्या प्रगती पॅनलला १७ पैकी ९ जागा, तर दिलीप बनकर यांच्या परिवर्तन पॅनलला ८ जागा मिळाल्या. असे असले तरी प्रगती पॅनलला सत्ता अबाधित राखण्यात यश मिळाले आहे.
प्रगती पॅनलला बहुमतासाठी आवश्यक ९ जागांसह सरपंच पदासाठी राखीव असलेल्या वार्ड क्रमांक एकमधून नंदू गांगुर्डे हे विजयी झाल्याने भास्करराव बनकर गटाकडे सलग १५ वर्षे सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ता संपादन केली असली तरी खुद्द भास्कर बनकर हे केवळ ९२ मतांनी विजयी झाले. निवडणुकीतील वॉर्ड क्र. ३ चा निकाल त्यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- वार्ड क्र. १- नंदू वसंत गांगुर्डे, ज्योती वाघले, वार्ड क्र. २ - विष्णू गांगुर्डे, कल्पना खोडे, आश्विनी खोडे, वार्ड क्र.३- भास्कर बनकर, गफ्फार जब्बार शेख, रेखा लभडे, वार्ड क्र.४- दीपक बनकर, संजय मोरे, साधना शिंदे, वार्ड क्र.५ - गणेश बनकर, अनिता साळवे, अलका वारडे, वार्ड क्र.६- दीपक मोरे, प्रीती देवकर, सुवर्णा देशमाने यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी जंगजंग पछाडले, परंतु मतदारांनी संमिश्र निकाल दिला. भास्कर बनकर यांना सत्ता मिळाली असली तरी विरोधक दिलीप बनकर यांनी चांगले यश संपादन केले आहे. परिवर्तन पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले असून मतदारांनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर गेल्या १० वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे यश मिळाले असले तरी हा आमचा काठावरचा विजय असल्याचे प्रगती पॅनलचे भास्करराव बनकर यांनी सांगितले.