‘मामको’ सहकारातील आगळे उदाहरण Print

मालेगावनामा -प्रल्हाद बोरसे ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

सहकार क्षेत्रातील बोकाळलेल्या स्वाहाकारामुळे अनेक संस्था रसातळाला गेल्याचे सिद्ध झाले आहे. या क्षेत्रातील कारभाऱ्यांच्या नानाविध प्रतापांमुळे बहुतेक सहकारी बँका व पतसंस्थांची अक्षरश: वाट लागली आहे. पैसे अडकून पडल्याने ठेवीदारांना देशोधडीला लागावे लागल्याचे अनेक दाखले देता येतील. अशा वातावरणातही बहुतेक सहकारी संस्थांनी आर्थिक उत्कर्षांचा आलेख उंचावतानाच आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. मालेगाव र्मचटस् को-ऑपरेटिव्ह बँक ही यापैकीच एक. सध्या सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या या बँकेने सचोटीचा व्यवसाय करण्यासह सामाजिक बांधीलकी जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवीत ‘जन जोडोनिया उत्तम व्यवहारे’ अशी कार्यपद्धती अंगीकारलेली ही बँक सर्वसामान्यांच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे.
५० वर्षांपूर्वी ४१ सभासद व ४१ हजार भांडवल यावर सुरू झालेल्या या बँकेतील सत्ताधाऱ्यांबद्दलदेखील तसेच म्हणता येईल. बँकेचे विद्यमान अध्यक्ष हरिलाल अस्मर हे संस्थापकांपैकी एक. प्रगतिपथावरील संस्थेत सतत ५० वर्षे एखादी व्यक्ती सत्तास्थानी असण्याची घटना तशी विरळच म्हणावी लागेल. आठ शाखांचा विस्तार असलेल्या या बँकेचे सद्यस्थितीत साडेबावीस हजारांवर सभासद असून भागभांडवल सव्वापाच कोटींपेक्षा अधिक आहे. तीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या बँकेत १६२ कोटींच्या ठेवी असून कर्जवाटप ११९ कोटींचे आणि ६७ कोटींची गुंतवणूक आहे. गेल्या वर्षी बँकेला दोन कोटींपेक्षा अधिक निव्वळ नफा झाला. गेल्या पाच-सात वर्षांत एनपीएचे प्रमाण हे २५ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यत कमी करण्यात बँकेला यश आले आहे.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी संचालक एकदिलाने दाखवत असलेल्या धडपडीमुळे सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण झाला आहे. मालेगावमधील गरीब जनतेला अत्यल्प मोबदल्यात औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बँकेने १९८७ मध्ये रौप्यमहोत्सवी वर्षांत मामको जनकल्याण ट्रस्टची स्थापना करून २५ खाटांचे धर्मार्थ रुग्णालय सुरू केले. ग्रामीण भागासाठी बँकेतर्फे फिरता दवाखाना हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बँकेने आता अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सटाणा रस्त्यावर १४ हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी करण्यात आला आहे.
बँकेतर्फे दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार केला जातो. गुजरातमधील भूज प्रांतात झालेल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी बँकेच्या आठ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक फिरत्या रुग्णालयासह तेथे दाखल झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोटातील जखमींवर मोफत औषधोपचार करण्यात आले होते. शिवाय रक्तदान शिबिराद्वारे या जखमींना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला होता. मामको ट्रस्टद्वारे वेळोवेळी विविध आजारांवरील शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मालेगावमार्गे पायी जाणाऱ्या भाविकांना रस्त्यावरच बँकेच्या वतीने औषधोपचार करण्यात येतो.
सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभरात बँकेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सुंदर अक्षराची गोडी वाढावी, यासाठी प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘ऐशी अक्षरी’ हा कार्यक्रम दोन वेळा झाला. ‘मालेगावच्या प्रगतीसाठी धावा’ हा संदेश देत आयोजित राज्यस्तरीय मॅरेथान स्पर्धेत १२ वर्षांच्या बालकापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत तब्बल पाच हजारांवर स्पर्धकांनी सहभाग घेतला. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदडोह’ हा योगेश सोमण यांचा एकपात्री प्रयोग रावळगाव, सोयगाव, संगमेश्वर, झोडगे येथे झाला. प्रसिद्ध संगीतकार व गायक संजय गीते यांचा ‘पाडवा पहाट’ तसेच ‘सत्यशोधक’ नाटकाचा प्रयोग, रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, मालेगाव तालुक्यातील कीर्तनकारांचा सत्कार, अशा कार्यक्रमांना लोकांनी मनापासून दाद दिली. केवळ धनच नव्हे, तर एकूणच सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून जनसामान्यांनाही ‘जन जोडोनिया उत्तम व्यवहारे’ याप्रमाणे बँक आपलेसे करीत आहे.