वणीमध्ये भरदिवसा दीड लाखाची चोरी Print

वणी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या घरफोडय़ा, आठवडय़ापूर्वी वृद्धेच्या सहा तोळे दागिन्यांची चोरी, अद्याप या चोरींचा तपास लागलेला नसताना भरवस्तीत दिवसा शिक्षिकेच्या घरातून रोख रक्कम, दागिन्यांसह सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरटय़ांनी नेल्याने पोलीस यंत्रणेला हे आव्हान मानले जात आहे.
जगदंबामाता मंदिराकडून कळवण-सापुतारा राज्य मार्गास जोडणाऱ्या रस्त्यालगत आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका भक्ती देशमुख राहतात. शुक्रवारी सकाळी त्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. त्यांची दुसरी मुलगी घरातील कामे आटोपून दुपारी साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात गेली. जाताना तिने घरातील दरवाजे बंद केले होते. देशमुख कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरटय़ाने घराच्या पाठीमागील बाजूने प्रवेश करत कपाटातील दागिन्यांसह   रोख  रक्कम असा सुमारे  दीड लाखाचा ऐवज लांबविला.
दीडच्या दरम्यान भारती देशमुख घरी आल्या असता दरवाजा उघडा पाहून त्यांना धक्का बसला. अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली.