धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींवर जवाहर गटाचे वर्चस्व सिद्ध Print

धुळे / वार्ताहर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला हादरा दिला आहे. मुकटी, देऊर बुद्रुक, फागणे, मोराणे प्र.ल. बोरकुंड या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा जवाहर गटाने केला आहे. तालुक्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींसाठी अलीकडेच निवडणूक झाली. पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर गटाचे वर्चस्व होते. जवाहर गटाची सत्ता उलथविण्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र मतदारांनी रोहिदास पाटील यांच्यावरच विश्वास टाकल्याने जवाहर गटाने ९० टक्के ग्रामपंचायतींवरील वर्चस्व कायम राखले. यापैकी फागणे आणि मुकटी, मोराणे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारली.
देऊर बुद्रुक, ग्रामपंचायत पुन्हा जवाहर गटाच्या ताब्यात आली. वार, कुंडाणे, नंदाणे, कौठळ, धनुर, तामसवाडी, विश्वनाथ, न्याहळोद, बाभूळवाडी, हडसुणे, बोरकुंड, भांडळ, सिताणे, रतनपुरा, चांदे, कुळथे, तिखी, उभंड, धामाणे, नावरा, भदाणे या ग्रामपंचायतींवरही जवाहर गटाचे वर्चस्व कायम राहिले. ग्रामपंचायतीच्या या निकालामुळे जवाहर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.