मानधनात वाढ करण्याची सरपंच संघटनेची मागणी Print

जळगाव / वार्ताहर
सरपंचांना दरमहा पाच हजार रुपये, उपसरपंचांसाठी तीन हजार रुपये, इतर भत्ता म्हणून किमान शंभर रुपये देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष तथा चाळीसगाव तालुक्यातील टाकळीचे सरपंच किसन जोर्वेकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, यांच्या मानधनात राज्य शासनाने नुकतीच भरीव वाढ केली आहे. ग्रामपंचायतींचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थेत होतो. या संस्थेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करताना सरपंचांच्या बाबतीत मात्र मानधन वाढीचा विचार केला गेला नाही. सरपंचांना सद्यस्थितीत ३०० ते ७०० रुपये असे अत्यल्प मानधन मिळते. सदस्यांना तर अवघे दहा ते २५ रुपये भत्ता मिळतो, तर उपसरपंचांना कुठल्याच स्वरूपाचे मानधन मिळत नाही. त्या उलट अलीकडील काही वर्षांत सरपंचांच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे. महागाई वाढली तरी इतर खर्च, प्रवास खर्च, यासाठी निधी मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर राज्य सरपंच संघटनेच्या वतीने याआधीही वारंवार निवेदने देण्यात आली असून पुन्हा एकदा सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी जोर्वेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.