‘धुळे जिल्हा बँक बचाव समिती’ स्थापन Print

धुळे / वार्ताहर
जिल्हा बँकेतून अपेक्षित पतपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अडकलेला पैसा मिळविण्यासाठी संचालक व अधिकाऱ्यांचे दरवाजे झिजवावे लागत होते, असे स्पष्ट करत जिल्ह्य़ातील शेतकरी व सभासदांनी एकत्र येत ‘जिल्हा बँक बचाव समिती’ गुरुवारी स्थापन केली. धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अभूतपूर्व आर्थिक घोटाळ्यात सापडल्याने बँकेचे दैनंदिन व्यवहारही रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशाने थांबले आहेत.  प्रशासन कोणतेही कठोर पाऊल उचलण्यास तयार नाही. ठेवीदार, सभासद व शेतकऱ्यांची रक्कम दिली जात नाही. वशिलेबाज, राजकारणी किंवा पदाधिकाऱ्यांशी सलगी असणाऱ्यांना पैसे दिले जात आहेत. एवढेच नव्हे तर बँकेला उपलब्ध झालेली निरनिराळ्या अनुदानाची रक्कमही दिसेनाशी झाली आहे. अशी परिस्थिती या वेळी मांडण्यात आली. टक्केवारी वसूल करून संबंधितांचे आर्थिक व्यवहार मिटवू नयेत, प्रसंगी संचालकांची मालमत्ता आधी ताब्यात घ्यावी, या मागण्यांसाठी  समितीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती डॉ. गिरधर पाटील यांनी दिली. समितीच्या शिष्टमंडळाने बँक प्रशासकांची भेट घेऊन निवेदनातून त्यांना लढय़ाची कल्पना दिली. सभासदांनी समन्वयक उत्तमराव चौधरी यांच्याशी ९४२०९६७६८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.