एक गाव, नसे सुविधांचा ठाव Print

जाकीर शेख, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
इगतपुरी हा आदिवासी तालुका. अनेक ठिकाणी आदिवासी समाजाचे प्रतिनिधी उच्च पदावर असतानाही तालुक्यातील अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. पर्यटन क्षेत्र म्हणून तालुक्याचा विकास करण्याच्या गप्पा एकीकडे मारल्या जात असताना अनेक वाडय़ा-पाडे विकासाची किरणे आपल्यापर्यंत पोहोचावीत म्हणून झगडत असून घोटीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या जुन्हवनेवाडीचे त्यासाठी उदाहरण देता येईल.

सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आजही रुग्णास दुसऱ्या गावी नेताना आदिवासींना डोलीचा वापर करावा लागतो.
जुन्हवनेवाडीची लोकसंख्या सुमारे ४०० आहे. उंच डोंगरावर वसलेली ही वाडी. या वाडीतून रात्रीच्या वेळी चोहीकडे नजर फिरविल्यास सर्वत्र विजेचा झगमगाट दिसून येतो, परंतु वाडीत मात्र अजूनही वीजच पोहचली नसल्याने अंधार आहे. वाडीला वीज मिळावी म्हणून ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व वीज वितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले, परंतु केवळ मंजुरीशिवाय या वाडीला काहीच मिळालेले नाही. अशीच अवस्था वाडी व तळोघ गावाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची आहे. या रस्त्याचे किमान खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी संघटित होत श्रमदानातून रस्ता तयार केला. हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला. तरीही हतबल न होता ग्रामस्थ दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात रस्त्याचे काम श्रमदानातून करतात. गावात आरोग्य केंद्र नसल्याने व रस्ताही नसल्याने येथील रुग्णांना आजही डोली करून तळोघ या गावापर्यंत आणण्यात येते. तेथून वाहनातून घोटीला आणण्यात येते. यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती माजी उपसरपंच गोविंद भगत, राजू गांगड, रामदास भगत, काळू भगत, देवराम भगत यांनी दिली.
संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावात कोणत्याच सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. गावात पाणीटंचाई दरवर्षी होत असून आरोग्य उपकेंद्र नाही, रस्ता नाही, वीज नाही असा या वाडीचा नन्नाचा पाढा आहे.