गौण खनिजाची अवैध वाहतूक; चौघांना कोठडी Print

चोपडा
तालुक्यातील मौजे विरवाडे येथे ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करीत असताना पोलिसांनी अडविल्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयराम बुधा भोई, रतिलाल बुधा भोई, नंदलाल बुधा भोई व समाधान पंढरीनाथ पाटील हे विरवाडे येथून आडगाव येथे ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या गौण खनिज घेऊन जात असताना मंडळ अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले असता त्यांनी अधिकारी आर. ए. वाडे यांच्याशी हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यामुळे शासकीय मालमत्तेची विनापरवानगी चोरटी वाहतूक केल्याची फिर्याद वाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सर्व संशयितांना अटक करण्यात येऊन न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.