ग्रामपालिका नाही ठिकाणावर, ग्रामस्थ वाऱ्यावर Print

वणी ग्रामपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’
संदीप तिवारी
सरपंचांची निष्क्रियता आणि कार्यकारी मंडळाची उदासीनता यातील काही घटकांच्या बेबंदशाहीपणामुळे वणी ग्रामपालिकेच्या कारभाराचे पुरते तीनतेरा वाजल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ग्रामस्थ व ग्रामपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने सध्या तरी ग्रामपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू असून हतबल व उदासीन ग्रामस्थांवर ‘ग्रामपालिका नाही ठिकाणावर, ग्रामस्थ वाऱ्यावर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
२५ हजार लोकसंख्या आणि एक कोटीच्या पुढे वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या ग्रामपालिकेत नवनिर्वाचित सत्ताधारी आल्यापासून ग्रामपालिकेची स्थिती दयनीय झाली आहे. साडेचार लाख रुपयांच्या जवळपास म्हणजे ३५ टक्क्यांच्या पुढे थकबाकीची रक्कम गेल्याने पालिकेस पाणीपुरवठय़ाचे बिल अदा करण्यास नाकीनऊ येत आहे. घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत रकमेसंदर्भात वेळीच कारवाई न केल्यास या आर्थिक वर्षांत हा आकडा फुगण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित कर न भरणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्याची गरज आहे, नाहीतर पालिका दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही. थकबाकीदार व अतिक्रमणधारकांवर वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अशी कारवाई केली नाही तर ग्रामपालिका बरखास्त करण्याची तरतूद मुंबई ग्रामपालिका अधिनियम कायद्यात आहे. असे सर्व असताना पालिकेच्या कारभाऱ्यांना मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. ज्या अनुभवी लोकांनी पालिकेचा कारभार युवा सत्ताधाऱ्यांच्या हातात दिला, त्यांना पालिकेची वाताहत होत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर काही दिवसांपासून अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे वणी परिसरात हे अतिक्रमण झपाटय़ाने वाढत असून त्याविरोधात पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने या सर्व अतिक्रमणधारकांना पालिकेतीलच काही सदस्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यभर वेगवेगळ्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी, विस्कळीत पाणीपुरवठा, वाढलेले गवत, बिकट रस्ते या सर्वाचे दिव्य ग्रामस्थांना करावे लागत असताना पालिकेचे मात्र सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. जगदंबा मंदिरालगत नऊ दिवस राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून डासांचा उपद्रव, स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने भाविकांसह ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडे बाजारात निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे भाजीबाजारातून भाजीपाला खरेदी करणेदेखील असह्य़ झाले आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे भाजीविक्रेत्यांकडून कर आकारणी होत असली तरी त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. असे असताना मूलभूत सुविधांविषयीचे आवश्यक ठराव ग्रामसभेच्या माध्यमातून मंजूर करण्याऐवजी विशिष्ट हेतूने झटपट ठरावाना मंजुरी दिली जात असल्याचे प्रकार अलीकडे वाढू लागले आहे. पालिकेतील काही सदस्यांचा पडद्याआडून या प्रकारांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी पालिकेची निवडणुकीनंतर सरपंच आणि उपसरपंच यांनी अनेक दिव्य पार करीत सत्ता संपादन केली होती. त्या वेळी एक वर्षांकरिता सरपंच आणि उपसरपंच राहतील असा करार झाल्याचे बोलले जात होते, परंतु वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही या सत्ताधाऱ्यांत बदल झालेला नाही. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच पदासाठी संभाव्य दावेदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच अंतर्गत धुसफूस वाढली आहे. सेतू कार्यालय, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण, पोलीस ठाणे, शैक्षणिक संस्था व इतर समाज संस्थांशी सामान्य जनतेचा दैनंदिन कामांच्या निमित्ताने थेट संपर्क होत असतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी नि:स्वार्थ हेतूने जनतेची कामे करावीत, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.