लासलगाव समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना Print

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार
 लासलगाव
निफाड तालुक्यात यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चणा, ज्वारी, मका व गहू या शेतीमालाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले असून, सदरचा शेतीमाल एकाच वेळी बाजार आवारात विक्रीस आल्यास भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी लासलगाव बाजार समितीने २०१२-१३ या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
राज्य कृषी पणन मंडळ संस्थेमार्फत १९९०-९१ पासून राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत बाजार समितीने २०१२-१३ या हंगामाकरिता तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चणा, ज्वारी, मका व गहू या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविण्याकरिता पणन मंडळाकडे कर्ज मागणी केली होती. या योजनेंतर्गत फक्त उत्पादकाचाच माल तारण म्हणून ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी शिफारस केलेला तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चणा, ज्वारी, मका, गहू हा शेतीमाल ज्या दिवशी वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल, त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाच्या पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे. संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व सातबारा उताऱ्यावरील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चणा, ज्वारी, मका व गहू या शेतीमालाचे लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून ज्वारी, मका व गहू या शेतीमालासाठी किमतीच्या ५० टक्केअथवा जास्तीत जास्त ५०० रुपये प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी तसेच तूर, मूग, उडीद, सोयाबीन व चणा या शेतीमालासाठी किमतीच्या ७५
टक्केरक्कम तारण कर्ज म्हणून सहा महिन्यांचे मुदतीने सहा टक्केव्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.
या योजनेचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन बाजार समिती सचिव बी. वाय. होळकर यांनी केले आहे.
तसेच लासलगाव व निफाड येथील स्थानिक हवामान केंद्रामार्फत हवामान बदलाची माहिती घेण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सेवक संदीप होळकर यांच्या ८१४९९०९७३२ या भ्रमणध्वनीवर    संपर्क   साधावा, असे   आवाहन   सचिव बी. वाय.    होळकर   यांनी केले आहे.