लाभार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना Print

नंदुरबार
जिल्ह्य़ात राबविल्या जाणाऱ्या सुमारे ३२०० वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान हे राष्ट्रीयीकृत बँकांमार्फतच वितरित केले जाणार असून सर्व विभागांनी लाभार्थीच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी दिल्या आहेत.
जिल्हा वार्षिक योजना २०१२-१३ अंतर्गत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, आदिवासी विकास नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत, आदिवासी विकास तळोद्याचे प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी अनिल भंडारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माधव जगताप आदी विविध विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
ज्या योजनांना शासनामार्फत अनुदान दिले जाते, त्या योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेत अनुदानाची मागणी करू नये, असा शासन निर्णय असून याची काटेकोर अंमलबजावणी सर्व विभागांनी करावी. ज्या कार्यालयांना आपल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जमीन अथवा जागेची आवश्यकता आहे, अशा कार्यालयांनी जागा मागणीबाबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा सूचनाही बकोरिया यांनी दिल्या आहेत.