धुळ्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे सात बळी Print

आजाराने प्रशासन बेजार
० हिवतापाचे ८०० रूग्ण ० हलगर्जीपणा करणाऱ्यांना दंड करण्याचा इशारा
वार्ताहर / धुळे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सध्या डेंग्यूने कहर केला असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर आजार फैलावला नसता, अशी नागरिकांची भावना आहे. हीच भावना नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगर्स क्लबच्या फलकातून व्यक्त झाली आहे.

तुंबलेल्या गटारी, दरुगधी आणि स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ातील आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था साथीचे आजार रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत असल्या तरी आतापर्यंत सात जणांचा डेंग्यूसदृश्य आजारानेच मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ५३ जणांना डेंग्यूसदृश्य आजार असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारातून ५० टक्के रक्कम कपात करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा गाफीलपणा किती आणि कसा असू शकतो, हे जिल्ह्य़ात पसरणाऱ्या आजारांमुळे सहज लक्षात येऊ शकते. खरे तर जिल्हा हिवताप विभागाने यापूर्वीच नाणे, बोरकुंड या धुळे तालुक्यातील आणि साक्री तालुक्यातील बेहेड या गावांमध्ये डेंग्युसदृश्य आजाराची लागण नव्हे तर, उद्रेक झाल्याचे जाहीर केले होते. जानेवारी पासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत हिवताप विभागाच्या अहवालानुसार तब्बल सव्वा दोन लाख लोकांचे रक्त तपासण्यात आले. पैकी ८०० रुग्णांना हिवताप असल्याचे निष्पन्न झाले. धुळे शहरातील योगेश दामोदर (४५) या कनिष्ठ अभियंत्यासह सोनाली कापसे (२०) व अंकिता पाटील (रा. मोहाडी, ता. धुळे), लोणखेडी येथील दर्शन पाटील (८) यांसह नाणे गावच्या एकाचा अशाच आजाराने मृत्यू झाला. या तिघांचा डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असतानाच शहरातील पारोळारोड परिसरातील सायली खोंडे (१९) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह शिवशक्ती कॉलनीतील कीर्ती विशाल विसपूते (२४) यांचाही अशाच आजारामुळे मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सभांमध्ये सदस्यांनी प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरले. शहरासह जिल्ह्य़ातील आरोग्य, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटीर आणि ग्रामीण रुग्णालयांचे तसेच जिल्हा रुग्णालयात आणि महापालिकेच्या रुग्णांमध्ये वाढलेली गर्दी साथीच्या आजारांची भीषणता दर्शविते. खासगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज या ठिकाणी रूग्णांची लागलेली रांग पाहता डासांच्या उत्पत्तीत कमालीची वाढ झाल्याचे लक्षात येते. शहरात सुमारे ६५ रूग्ण डेंग्यूसदृश्य आजाराचे असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक रत्नाकर माळी यांनी दिली.
धुळे, शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये साथीच्या आजारांची लागण झाली असली तरी प्रशासकीय पातळीवर जबाबदारी सांभाळणारे अधिकारी ठोस अशी कोणतीच माहिती देत नाहीत अशी स्थिती आहे.