टाकेदमध्ये अतिसाराची लागण Print

इगतपुरी
तालुक्याच्या पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद येथे दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. या आजाराने १०० जण आजारी असून आरोग्य विभागाने या साथीची तातडीने दखल घेऊन घरोघरी रुग्णांची पाहणी करण्यात येत आहे. घरोघरी प्रतिबंधात्मक औषधे दिली जात असून नळपाणी योजनेतील गळतीमुळे पाणी दूषित होऊन ही साथ फैलावल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सुजाता वाजे यांनी तत्काळ टाकेद येथे भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. चोवीस तासांत साथ आटोक्यात आणण्याबाबत पथकातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या वेळी सूचना देण्यात आल्या. दरम्यान खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक टाकेद गावात तैनात करण्यात आले असून परिस्थिती व साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टाकेद येथे नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याने या यंत्रणेत गळतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात झाले. गळतीमुळे गटाराचे दूषित पाणी मिश्रित होऊन ग्रामस्थांकडून हे पाणी पिण्यात आल्याने अतिसार, उलटी, मळमळ व काहींना चक्कर येणे सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या साथीत जवळपास १०० रुग्ण असून त्यात ७० ते ८० रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांनी नळाद्वारे येणारे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन वैद्यकीय पथकाने केले.