जळगाव जिल्ह्यतील ७४४ गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश Print

जळगाव / वार्ताहर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

जिल्ह्य़ातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जळगाव हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले असून राज्य शासनाकडून या तालुक्यातील ७४४ गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे.राज्य शासनाने १५ सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारीचा अंदाज घेत राज्यातील साडेतीन हजारावर गावात टंचाईसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. त्यात ज्या गावांची पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा गावात टंचाईच्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्य़ातील १९ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ६१ गावातील ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जळगावसह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, बोदवड, मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यात यापूर्वीच टंचाईला तोंड देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. भुसावळ तालुक्याचा नव्याने समावेश झाला आहे. जिल्ह्य़ातील जामनेर तालुक्यात सर्वधिक १५२ तर भुसावळमध्ये सर्वात कमी ४१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. तसेच चाळीसगाव तालुका १३६ गावे, पाचोरा १२८, जळगाव ९२, मुक्ताईनगर ८१, भडगाव ६३ तर बोदवड तालुक्यातील ५१ गावांची पैसेवारी ५० पेक्षाकमी आहे.
या गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आवश्यक ती कामे सुरू करावीत, मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून द्यावा, तात्पुरत्या नळ योजना सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल तेथे टँकर वा बैलगाडय़ांमार्फत पाणी पुरवठा करावा, गुरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यास छावण्या उभाराव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.