मालेगावमध्ये वृद्धेची हत्या Print

मालेगाव / वार्ताहर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
शहरातील महेशनगरात अत्यंत गजबजलेल्या शिवाजी पुतळा भागात वास्तव्यास असलेल्या भानुमतीबेन शामजीभाई आमिन या ७२ वर्षांच्या महिलेची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कम व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे दिसत असले तरी दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांनी चोरीचा बनाव केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
‘शाम-स्मृती’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भानुमतीबेन एकटय़ाच राहत होत्या. त्यांचा एक मुलगा देवेंद्र याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहतो. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवेंद्र नेहमीप्रमाणे आईच्या खोलीजवळ आले असता दरवाजाची कडी बाहेरून लावण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. दरवाजा उघडून आत बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात भानुमतीबेन दिसून आल्या. त्यांनी त्वरीत पोलिसांना कळविले. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळच्या दरम्यान ही हत्या झाली.
भानुमतीबेन यांच्या डोक्यावर व गळ्यावर वार करण्यात आले आहेत. मारेकऱ्यांनी त्यांच्या घरातील कपाट उघडलेले दिसून येत असून किती रक्कम चोरीस गेली, याची माहिती मिळणे मुश्किल झाले आहे. भानुमतीबेन यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही गायब आहेत. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असे वरवर वाटत असले तरी प्रतिकाराची कोणतीच निशाणी दिसून येत नाही. तसेच बाहेरून कडी लावलेली आढळल्याने मारेकऱ्यांनी पुढील दरवाजाने घरात प्रवेश करूनच आपला कार्यभाग साधला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. परिचीत व्यक्तिंचेच हे कृत्य असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.     याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्त्येचे निश्चित कारण समजलेले नाही. जूना आग्रा रस्त्यालगत असलेल्या व उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात लोकांची सतत वर्दळ असते.अशा या ठिकाणी वृध्देच्या हत्त्येची घटना घडल्याने पोलीसही चक्रावले आहेत.