आ. शरद पाटील यांचे ‘संकेतस्थळ’ Print

कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम
धुळे / वार्ताहर
आपण निवडून दिलेला आमदार नक्की काय करतो, प्रचाराप्रसंगी त्याने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण केली किंवा त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे, माहिती अधिकाराचा वापर कसा करावा, याविषयीची माहिती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आ. प्रा. शरद पाटील यांनी संकेतस्थळ सुरू केले आहे.
माहितीच्या अधिकाराखाली नागरिकांना ज्याप्रमाणे माहिती मिळते, त्याप्रमाणे एक मतदार म्हणूनही त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून मिळाली पाहिजे. माहिती अधिकाराचा ज्याप्रमाणे एक वचक शासकीय अधिकाऱ्यांवर निर्माण झाला आहे, त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींवरही असला पाहिजे, संकेतस्थळ सुरू करण्यामागे आपली हीच भावना असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. sharadpatil.com या संकेतस्थळाचा वापर करून जनता त्यांचे प्रश्न, समस्या मांडू शकते, आमदारांनी काय काम केले, याची माहितीही त्यात देण्यात येणार असल्याने कामात आपोआपच एक पारदर्शकता येणार असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. या संकेतस्थळाचे उद््घाटन मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यांनीही आ. पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.