भरत सवतीरकर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित Print

जळगाव / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीट समाजाच्या औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात भरत सवतीरकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
औरंगाबाद येथील अब्दुल कलाम संशोधन केंद्रात परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश पदाधिकारी व जिल्हास्तर प्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्योगपती रमाकांत कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परीट समाजातील सामाजिक उपक्रम रायगड जिल्ह्य़ात राबवून समाजात अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती करणे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे, श्री संत गाडगेबाबांचा संदेश गावागावात पोहोचवणे आदी सामाजिक कामांची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली. संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था साताराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित होणाऱ्या विशेषांक व कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड येथे २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीट युवक संघटना आयोजित युवक मेळाव्याची माहिती देण्यात आली. सवतीरकर यांचा गौरव झाल्याबद्दल अध्यक्ष एकनाथ बोरसे, संतोष भालेकर, भाऊसाहेब साळुंखे, नारायण अभंग, विष्णुपंत दळवी, भीमराव शिरसाळे, भीमराव मांडोळे आदींनी अभिनंदन केले आहे.