महापालिका हद्दवाढीतून औद्योगिक वसाहतीला वगळण्याची मागणी Print

धुळे / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ही स्वतंत्र संस्था असून महापालिका हद्दवाढीत औद्योगिक वसाहतीचा समावेश रद्द करण्याची मागणी नगरसेवक अनिल मुंदडा यांनी केली आहे. महासभेत शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात अवधान शिवारातील एमआयडीसीचाही समावेश असल्याने हा ठराव आयुक्तांनी विखंडित करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. लघुउद्योग भारती या उद्योजकांच्या संघटनेने यासंदर्भात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला संघटनेचे शहराध्यक्ष देवेंद्र राजपूत, नगरसेवक अनिल मुंदडा यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंदडा यांनी महापालिका अधिनियमानुसार ठराव विखंडित करण्यासाठी उद्योजकांकडून महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात यावे, अशी सूचना केली. खरे तर औद्योगिक धोरणातील ही वसाहत महापालिकेअंतर्गत येऊ नये, असे निर्देश असल्याचेही मुंदडा यांनी लक्षात आणून दिले. धुळे औद्योगिक वसाहतीत साधारणपणे ३५० उद्योग आहेत. त्यामुळे २० हजार कुटूंबियांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. उत्पादनांची निर्यात करणारेही उद्योग याठिकाणी असल्याने हद्दवाढ आणि कर संकलनात ही वसाहत आली तर पुढील निरनिराळी प्रक्रियाही अडचणीत येईल. एवढे करूनही महापालिकेला फारसा आर्थिक लाभ होणार नाही, यावर सर्वाचे एकमत झाले. एमआयडीसीची हद्दवाढ रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.