शहेनशाह-ए-गज़्‍ाल Print

 

सतीश टंकसाळे - रविवार, १७ जून २०१२

मेहदी हसन आपल्याला सोडून गेले. गज़्‍ाल आणि गज़्‍ालरसिक पोरके झाले, पण किती तरी जणांची जिंदगी समृद्ध करून गेले. अनेक रसिकांच्या फाटक्यातुटक्या कॅनव्हासवर सप्तरंगांचा शिडकावा करत सूरमयी चित्र रेखाटून गेले. त्यांच्या अनेक खासगी मैफलींमध्ये समोर बसून त्यांचे गज़्‍ाल गायन गात्रागात्रांमध्ये मनसोक्त भरून घेता आले. त्यांची काळजाला हात घालणारी गज़्‍ाल मला उर्दू शेरोशायरीच्या प्रांतात मुशाफिरीसाठी घेऊन गेली.

त्यांच्या गज़्‍ाल गायकीने अनेकांना गज़्‍ाल, उर्दू भाषा यांचा अभ्यास करण्यास मजबूर केले. मी कलेचा आस्वादक आहे. अभ्यासक कधीच नव्हतो, पण या महान कलाकाराने माझ्यातला आस्वादक तर फुलवलाच, पण अभ्यासकही चेतवला. मला मनापासून वाटतं की, मेहदी हसन यांची गज़्‍ाल गायकी हा पीएच. डी. करण्याचा विषय होऊ शकेल. त्यांना मी जेव्हा विचारलं होतं की, इतके सगळे गज़्‍ाल गायक असताना फक्त मेहदी हसन यांनाच शहेनशाह-ए-गज़्‍ाल का म्हणतात, तर त्यावर त्यांचं नम्र उत्तर होतं, ‘अल्लाताला की मर्जी.’ मी म्हटलं, ‘अल्लाताला काय फक्त तुमचाच आहे का? इतरांवर त्याची मर्जी नाही का?’ तर त्यांच्या मुलायम स्वरांसारखेच ते मोहक हसले. मला असं वाटतं गज़्‍ाल आणि गज़्‍ाल गायकीचा त्यांनी जेवढा विचार केला आहे, तेवढा अन्य कुणी केलेला दिसत नाही. अनेक वैशिष्टय़े आहेत त्यांच्या गायकीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची गज़्‍ालची निवड! त्यांनी गायलेल्या गज़्‍ालची शायरी अतिशय अर्थपूर्ण तर असतेच, पण अंतर्मुख करणारीही असते. अशा शायरीला सुरांचा साज चढवणं ही काही साधी कारागिरी नसते. शायरने ‘त्या’ अवस्थेत केलेलं काव्यसुरांचं योग्य कोंदण देऊन जडवणं आणि रसिकांच्या काळजात तो दागिना अलगद गुंफणं याला तितक्याच ताकदीचा कलाकार असावा लागतो. काळीज तर भळभळतंय, पण हवंहवसं! अशी अनुभूती आपल्या प्रत्येक गज़्‍ालमधून देणारा हा एकमेव गज़्‍ाल गायक! तुम्ही गज़्‍ालला चाल कशी बांधता, या प्रश्नाला ‘अरे, पूछिये मत’ अशी सुरुवात करून सांगायचे की, ‘शेकडो चाली लावून बघतो. पसंत पडत नाही, नाराज होतो, पुन्हा नवीन चाल बांधतो. हे सर्व झाल्यावर थोरले भाऊ जे पंडित गुलाम कादिर या नावाने ओळखले जातात त्यांना ऐकवतो. त्यांनी पसंती दिली की मग पेश करणार मैफलीमध्ये. त्यांची प्रत्येक गज़्‍ाल लक्ष देऊन ऐकाल तर कळेल की, खरंच याला अनेक चाली लावून बघितल्या असतील, कारण ती गज़्‍ाल उस्तादजी, समजण्याच्या पातळीवरून पलीकडे नेऊन महसूस करण्याच्या स्तरावर नेऊन ठेवतात. चाल तर अशी लाजवाब बांधतात की गज़्‍ाल जिवंत होऊन समोर ठाकते.
जेवढी गज़्‍ाल चांगली, चाल उत्तम, तशीच गज़्‍ालची मांडणीही बहारदार! लय, ताल याचं भान ठेवत शब्दांवर असा आघात करतात की, तो शब्द प्राण लेवून उतरतो आणि हे सगळं गज़्‍ालची नाजूक तबियत कुठेही बिघडू न देता. कुठं आक्रस्ताळेपणा नाही, कोलांटउडय़ा नाहीत, चमत्कृती नाहीत, मला काय येतंय हे दाखवण्याचा अट्टहास नाही. त्या गज़्‍ालशी इमान राखून सर्व कारागिरी! आणि त्या गज़्‍ालला लगडून चालणारी ती मधाळसुरांची वेलबुट्टी! अहाहा! ते सूर कुरवाळण्याचं कसब असं की, जणू गळ्याला मधाचं पोळं लागलंय.
हा कलाकार अशा ताकदीचा की सिनेमातील गाण्यांना पण गज़्‍ालची डूब देणार. (अनेक गज़्‍ाल गायक गज़्‍ालचे गीत करून टाकतात, ते सोडा) शब्दांची जिवंत फेक हे मेहदी हसनसाहेबांचं आणखी एक वैशिष्टय़! असं म्हणतात की, उत्तम गवई नुसत्या ‘सा’मधून सबंध रागाचं दर्शन घडवतो. मेहदी हसन यांची गज़्‍ाल गायकी अशाच वळणाची. गज़्‍ालचा मतला (पहिला शेर) पेश करताना पहिला अर्धा शेर अशा अंदाजने पेश करतात की, त्यावर सारी गज़्‍ाल उभी ठाकलेली दिसते. पुढं काही गायची गरजच नाही. सगळा दर्द पिळवटून या फेकीवर ओतलेला. ‘रंजिश ही सही’ची फेक असो किंवा ‘गो, जरासी बात पर’ असो किंवा ‘शोला था’ असो, सबंध गज़्‍ालचं किवाड किलकिलं होऊन गज़्‍ाल ‘दिसू’ लागते.
अशा महान गायकाचा सूरसत्संग म्या पामराला घडला अन् जिंदगी आबाद झाली. त्यांना मी ‘अलविदा’ म्हणणार नाही, कारण त्यांचे मधाळ सूर, त्यांची गज़्‍ाल माझ्या गात्रागात्रांत रुजलेली आहे. मला खात्री आहे की, त्यांनी शेवटचा श्वास पण नेहमीच्याच नजाकतीने समेवर येऊन सोडला असेल.
मुमकिन हो आपसे, तो भुला दीजिये मुझे
पत्थर पे हूँ लकीर, मिटा दीजिये मुझे।