अब सब कुछ खो दिया! Print

 

मुकुंद संगोराम - रविवार, १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गज़्‍ालच्या मैफलीत शब्दांच्या बरोबरीनं अभिजात संगीताला स्थान होतं. प्रत्येक शेर आणि त्याचं मर्म सहजपणे सांगत असताना मुलायम आणि मृदू स्वरांच्या लडीतून ताजमहाली सौंदर्य निर्माण करण्याचं कसब मेहदी हसन यांनी कमावलं होतं. गळ्यात तान आहे, म्हणून सपाटून त्यांची चक्राकार वर्तुळं मारून श्रोत्यांना अचंबित करायचं नव्हतं, की रागदारीचं ज्ञान पाजळायचं नव्हतं. हे सारं आपल्यापाशी आहे, याची फक्त जाणीव करून द्यायची होती एवढंच.

मेहदीसाहेबांनी हे सारं इतकं लीलया केलं, की त्यामुळे संगीताच्या जगाला गज़्‍ाल नावाचा एक अप्रतिम असा दागिना ‘नज़्‍ार’ झाला.
१९७१च्या भारत-पाकिस्तानमधील युद्धानं दोन्ही देशांमधलं बिघडलेलं वातावरण खऱ्या अर्थानं निवळायला लागलं, ते मेहदी हसन यांच्या गज़्‍ालेनं. युद्धाच्या छायेतल्या वातावरणात त्यांनी आपल्या स्वरांनी असा काही दर्द भरला की, सारं वातावरणच बदलायला सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या तटबंदी या संगीतानं तुटायला लागल्या आणि राजकीय शत्रू असलेल्या पाकिस्तानातील मेहदीसाबना भारतीय रसिकांच्या हृदयात खास जागा निर्माण करायला वेळ लागला नाही. इकडून तिकडे जाण्यासाठी संगीताला देशांच्या जमिनीवरच्या सीमा पार करावा लागणारा काळ होता तो. संगणक नव्हते. त्यामुळे संगीत संगणकावर साठवण्याचा प्रश्नच नव्हता. इंटरनेट असण्याची शक्यताच नव्हती. कॅसेट नावाच्या संगीताच्या प्रवासाला वरदान ठरणाऱ्या शोधापूर्वीचा हा काळ.. ध्वनिमुद्रिकांचा. मध्यमवर्गीयाच्या घरात ध्वनिमुद्रिका वाजवणारा रेकॉर्ड प्लेअर नव्हता, तेव्हाही म्हणजे सत्तरच्या दशकाच्या अखेरी अखेरीला मेहदी हसन नावाच्या या स्वरांच्या जादुगारानं संगीत आवडणाऱ्या प्रत्येकाचं अक्षरश: वेड पळवलं. जेवण सुचू नये, भूक लागू नये आणि काही करायचंच असेल, तर कुठूनही मेहदी हसनची गज़्‍ाल कानावर पडण्याचीच आस असावी, असं बेचैनीचं वातावरण. ‘रंजीश ही सही’ असो की ‘अब के हम बिछडे’ असो, शब्दांचे अर्थ शोधायला उर्दू-फारसी शब्दकोश पाहण्याची गरज नव्हती. शब्दांचे त्यातले अर्थ स्वरांवरून तरंगत हलकेच मनात येऊन उतरत होते आणि एका अमिट गोडीच्या संवेदनांनी सगळं मन मोहरून जात होतं. त्या गज़्‍ालांमध्ये होतं प्रेमाचंच वर्णन. आयुष्यात हरवलेलं, कधी तरी मिळालेलं, पुन:पुन्हा मिळावंसं वाटणारं, न मिळण्याच्या खात्रीनं व्याकूळ झालेलं असं हे प्रेम मेहदीनं किती तरलपणे पोहोचवलं. कोणत्याही वयातल्या कुणालाही हा प्रेमाचा नवा साक्षात्कार नुसता मोहवत नव्हता, तर त्यात डुंबण्यासाठी खुणावत होता. दु:खाचा हा आनंददायी आविष्कार प्रत्येकालाच सुखावणारा होता.  

खरं तर त्याआधीपासूनच ठुमरीतल्या अतिशय अभिजात स्वरांनी शब्दांना एका वेगळ्या भावविश्वात नेऊन ठेवलं होतं. बेगम अख्तरांच्या अशा किती तरी ठुमऱ्या हृदयातला दर्द गहिरा करत होत्या. तरीही त्यात संगीताचं वर्चस्व अबाधित होतं. लयीचं, तालाचं आणि त्यातल्या स्वराकृतींचं महत्त्व लक्षात आणून देणाऱ्या अशा त्या ठुमऱ्या रसिकांच्या मनावर राज्य करत होत्या. अभिजात संगीताला ठुमरी, टप्पा, तराणा, होरी, कजरी यांसारख्या ललित प्रकारांनी सजवलं जात होतं. ते ‘सुगम’ संगीत तर मुळीच नव्हतं. त्यामध्ये अभिजात संगीतातील सौंदर्याच्या खाणाखुणा ठासून भरलेल्या होत्या. शब्दांना चिकटलेल्या नानाविध छटांनी स्वरांना व्यापणारं संगीत नव्हतंच ते.
मेहदी हसनसाहेबांनी आपल्या मृदू स्वभावाप्रमाणे गज़्‍ालेला पाकात घोळलेल्या गुलाबजामसारखं गोडगट्ट करून टाकलं होतं आणि त्यासाठी ते अतिशय तरल आणि साहित्यसंपन्न गज़्‍ालांच्या शोधात होते. त्यांना शायरही असे मिळाले, की त्यातल्या शब्दांचे अर्थ स्वरात घोळवणं, हसनसाहेबांसाठी एक कलात्मक आव्हान ठरलं. त्या शब्दांना भावगीतासारखी किंवा चित्रपट संगीतासारखी फक्त चाल लावायची नव्हती. गज़्‍ालमधला प्रत्येक शेर स्वरांमध्ये रसरसून जायला हवा. त्यात आविष्काराचं स्वातंत्र्य असण्याची सोय हवी, तसंच त्या शब्दांचं सौंदर्य आणि त्यातून प्रतीत होणाऱ्या अर्थाच्या नाना छटा त्याच ताकदीनं व्यक्त होण्याची क्षमताही हवी. रागदारी संगीताची छाया हवी, पण तिचा बडिवार नको, असं हे नवं रसायन निर्माण झालं आणि रसिकांनी त्याला फार पटकन आपलंसं केलं. मेहदी हसन हा असा कलावंत होता, की ठरवलं असतं, तर घरात परंपरेनं आलेल्या ध्रुपद गायकीत स्वत:ला बिनधास्तपणे झोकून देऊ शकला असता. शेकडो वर्षांच्या भारतीय संगीत परंपरेची दीक्षा त्यांना वाडवडिलांकडूनच मिळाली होती, पण त्यांना शब्दांना स्वरांमध्ये चिंब भिजवण्याची हौस होती. त्यासाठी परंपरेतल्या संगीतातून एका नव्या आकृतिबंधाची निर्मिती करण्याची प्रज्ञाही होती. अभिजात संगीताच्या दरबारात, कुणाशीही सवतासुभा न करता ही गज़्‍ाल मान ताठ करून उभी राहायला हवी असा आग्रह मात्र जरूर होता, पण त्यासाठी स्पर्धा नव्हती की आक्रस्ताळेपणा नव्हता. मेहदीसाबचा तो स्वभावच नव्हता. त्यांना ठुमरीच्या बरोबरीनंच कव्वालीशीही ‘सामना’ करायचा होता. भक्तिसंगीतात कव्वालीनं निर्माण केलेला माहौल काही न्यारा होता. संगीताच्या मैफलींमध्ये कव्वालीनं स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं होतं. कव्वालीतल्या भक्तिसंगीताला लोकसंगीताचा आधार होता आणि तिला अभिजाततेची ओढ होती. गज़्‍ालमध्येही तोच भाव मनाच्या अंतरंगाचा ठाव घेत एका अपूर्वतेचा अनुभव देणारा होता. तसं गज़्‍ाल आणि कव्वालीमध्ये भांडण नव्हतंच, पण संगीतात गज़्‍ालेला ते स्थान मिळण्यासाठी बऱ्याच अटी होत्या. गज़्‍ालच्या मैफलीत शब्दांच्या बरोबरीनं अभिजात संगीताला स्थान होतं. प्रत्येक शेर आणि त्याचं मर्म सहजपणे सांगत असताना मुलायम आणि मृदू स्वरांच्या लडीतून ताजमहाली सौंदर्य निर्माण करण्याचं कसब मेहदी हसन यांनी कमावलं होतं. गळ्यात तान आहे, म्हणून सपाटून त्यांची चक्राकार वर्तुळं मारून श्रोत्यांना अचंबित करायचं नव्हतं, की रागदारीचं ज्ञान पाजळायचं नव्हतं. हे सारं आपल्यापाशी आहे, याची फक्त जाणीव करून द्यायची होती एवढंच. मेहदीसाहेबांनी हे सारं इतकं लीलया केलं, की त्यामुळे संगीताच्या जगाला गज़्‍ाल नावाचा एक अप्रतिम असा दागिना ‘नज़्‍ार’ झाला.
कवितेत तर गज़्‍ाल आधीपासूनच होती. संगीतातही होती, पण तिला वळचणीला बसावं लागत होतं. अभिजात संगीताच्या रसिकांसाठी गज़्‍ाल ऐकणं हा काही मानाचा भाग नव्हता. गज़्‍ाल ऐकण्यापेक्षा त्यांनी अभिजात संगीत ऐकणं अधिक पसंत केलं असतं. उर्दू शेरोशायरीच्या मुशायऱ्यांमध्ये मनानं रमणाऱ्या कुणाही रसिकाच्या हृदयाला त्यातल्या भावना सहज पोहोचत असत आणि त्या काव्याला ते हृदयापासूनच दाद देत. संगीतच ऐकायचं, तर त्यासाठी खूप पर्याय होते. रागदारी आणि ललित संगीत तर सगळ्यांपर्यंत पोहोचायला लागलं होतं आणि त्याच्या जोडीला चित्रपट संगीतानं सगळ्यांच्या कानांना एक नवा अनुभव द्यायला सुरुवात केली होती. भारत काय किंवा पाकिस्तान काय, या दोन्ही देशांमधलं संगीत एकाच मुशीतलं आणि एकाच कुटुंबातलं. मेहदी हसननं या दोन्ही देशांमधला सगळा द्वेष त्याच्या मधाळ आणि रसाळ स्वरांनी संपवायला सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होण्याच्या आधी किती तरी शतकं या दोन्ही भूभागांची संस्कृती एकच राहिली होती. मुसलमानांच्या आक्रमणानं या सगळ्याच प्रदेशात घडलेल्या सांस्कृतिक बदलांमध्ये सर्वात जास्त स्पष्टपणे समोर येणारा बदल संगीतात झाला. वागण्याबोलण्यात, खाण्यापिण्यात, कपडय़ालत्त्यात हे बदल फारसे रुजले नाहीत, पण कलांच्या क्षेत्रात, त्यातही संगीताच्या क्षेत्रात हे बदल इतक्या सहजपणे झाले, की प्रबंध गायकीपासून ध्रुपदापर्यंतचा एकाकी प्रवास पुढे अनेक शतकं साहचर्याने होत गेला. एका अर्थानं हे आक्रमण संगीतासाठी फायद्याचंच ठरलं. दरबारात गाणं हा नित्याचा भाग होता, तसा दैनंदिन जीवनातही गाणं खूप खोलवर रुजलं होतं. चांगलं काय आणि कमअस्सल काय, याचं भान यायला वेळ लागला, तरी या साऱ्या भूभागातील बहुतांश लोक कानसेन होत होते आणि त्यांना सतत नव्या प्रतिभासंपन्न कलाकारांकडून मेजवानी मिळत होती. मेहदी हसन या एकत्रित परंपरेचे पाईक होते.
खरं तर फक्त स्वर आनंद द्यायला पुरेसे असतात. त्यातून व्यक्त होणारे भाव कुणालाही सहजपणे समजू शकतात आणि त्याच्या आनंदाला नि:शब्दतेचा स्पर्श असतो. शब्दांना स्वरांच्या कोंदणात बसवण्याचा उद्योग हा माणसाच्या सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार होता. शास्त्रीय संगीतातील बंदिशी या काही कविता नव्हत्या. सगळ्याच बंदिशींना साहित्याचा परीसस्पर्श नव्हता. त्यातील शब्दांचा अंतिम हेतू रागातून व्यक्त होणाऱ्या अमूर्त भावाशीच होता. एका अर्थानं स्वरांच्या खुंटय़ाच होत्या त्या. त्यातून शब्दांच्या आधारे स्वरांना त्यांची नक्षी तयार करायला वाव मिळत होता. साहित्याचीही जाण असणाऱ्या काही गायकांनी मग बंदिशींमध्येही आपली प्रतिभा ओतली आणि काही उत्तम कविताच बंदिशीच्या रूपात पुढे आल्या. तरीही त्यांचा मूळ हेतू फक्त संगीत पोहोचवण्याचाच होता. शब्द आणि स्वरांचा हा शुभसंकर महाराष्ट्रात मराठी संगीत नाटकांनी आणि त्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या भावसंगीतानं अधिक स्पष्ट केला तरी रागसंगीताच्या परिसरात निर्माण होत असलेल्या ललित संगीतात ठुमरीसारखा शब्दप्रधान प्रकार रसिकप्रिय झालेला होता. शब्दांचं संगीतातलं स्थान नेमकेपणानं सांगितलं, ते मात्र गज़्‍ालेनं.  रागदारीतील शास्त्रोक्त आणि परंपरांना घट्ट धरून राहणाऱ्या संगीताला हवी असणारी भावाभिव्यक्ती मेहदीसाहेबांच्या गाण्यात इतकी मधुरपणे भरून राहिली होती, की हे सारं संगीत श्रोत्याला एका वेगळ्या विश्वात नेण्याची क्षमता बाळगायला लागलं.
मराठी माणसाला भरभरून संगीत ऐकण्याची सवय लावली ती संगीत नाटकांनी. त्यानंतर त्याच्याच आधारानं आलेलं भावगीत हे गज़्‍ालचं छोटं भावंडं. शब्द आणि स्वर यांचा चपखल संबंध जोडणाऱ्या भावगीतात गायक कलावंताच्या प्रज्ञेपेक्षा संगीतकाराच्या रचनेला अधिक महत्त्व होतं. ती गोळीबंद रचना शब्दसौष्ठवाचं सौंदर्य त्यातल्या अर्थछटांसह घडवणारी असे. प्रत्येक भावगीत म्हणजे एक स्वतंत्र शिल्पच जणू. पुन:पुन्हा ऐकताना कवितेचा नवा अर्थ उलगडत जावा, तसा त्यातील स्वररचनेतील वेगळेपणा ठसत जावा, पण त्यात गायक कलावंताच्या ऐनवेळच्या अभिव्यक्तीला फारसा वाव नव्हता. ते फक्त भक्तिसंगीत नव्हतं, कारण त्याची शेकडो वर्षांची एक संपन्न परंपरा आधीच निर्माण झालेली होती. ते फक्त प्रेमगीत नव्हतं. जगण्यातल्या सगळ्या अनुभवांचं कलात्मक सादरीकरण शब्द आणि स्वरांच्या गुंफणीतून करण्याचं कौशल्य त्या रचनातंत्रातच होतं.
मेहदी हसन यांनी गज़्‍ाल गायनात आपलं स्वतंत्र घराणं स्थापन केलं. त्यात त्यांचा स्वत:चा अंदाज होता, अदाकारी होती आणि संगीत व्यक्त करण्याची एक तऱ्हा होती. ते नशीबवान असे की, त्यांच्यासमोरच गुलाम अली, जगजितसिंग, हरिहरन यांच्यासारख्या नव्या दमाच्या कलावंतांनी या गज़्‍ालला आपापल्या पद्धतीनं पेश करण्याचं धैर्य दाखवलं. गुलाम अलींनी त्यात पंजाबी ढंग आणला तर जगजितसिंग यांनी संयत अभिजातता आणली. गज़्‍ाल मग चित्रपटांत आली. तिथंही तिला सलाम मिळाला. चित्रपटातच कशाला, गज़्‍ालेनं आपलं सगळं जगणंच व्यापून टाकलं. मनाची हुरहुर आणि काळजाचं पाणीपाणी करणारी ही गज़्‍ाल मेहदी हसन यांच्यामुळे आपल्याला भिडली. शब्दांना चिकटलेल्या अर्थाच्या पदरांना सुटं करत त्यातून पाझरणारा स्वरांचा प्रवाह आपल्यापुढे सतत नवी रूपं लेऊन येत राहिला. आयुष्यातलं सगळं श्रेयस हरवून बसल्याची ही जाणीव इतक्या ताकदीनं आणणाऱ्या मेहदी हसन यांचं जाणं असं चटका लावणारं आणि ‘अब सब कुछ खो दिया’ अशी मनाची विकल अवस्था करणारं.. त्यांच्या जाण्यानं एक कळलं, की गज़्‍ालला अमरत्वाचा नजराणा बहाल झाला आहे.