आधुनिक संस्कृतीचे मृगजळ Print

 

फ्रेंच विचारवंत रूसोचे विचार
के. रं. शिरवाडकर - रविवार, १ जुलै २०१२
जगद्विख्यात फ्रेंच विचारवंत जाँ झॅक्स रूसो
(१७१२-१७७८) याच्या जन्माला आजमितीस ३०० वर्षे झाली. त्याच्या सर्वागीण विचारांचा एक संक्षिप्त आढावा..
माणसाच्या सांस्कृतिक इतिहासात काही चिरंतन मूल्यांचे बीजारोपण करणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांती (१७८९)च्या प्रमुख प्रेरकांमध्ये रूसोचा निश्चित समावेश होतो. त्याचा जन्म स्वित्र्झलडमधील जीनिव्हा शहरी २८ जून १७१२ साली झाला.

त्याला आपल्या जन्मस्थानाचा अतिशय अभिमान वाटत असे म्हणून तो आपल्या सहीखाली ‘जीनिव्हाचा नागरिक’ असा उल्लेख करीत असे. पण त्याच्या प्रक्षोभक लिखाणामुळे त्याची बरीच ससेहोलपट झाली. स्वित्र्झलड, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी देशांतून त्याला स्थलांतर करावे लागले. रूसो हा प्रतिभासंपन्न विचारवंत होता. साहित्य, संगीत, समाजशास्त्र, शिक्षण, राज्यशास्त्र अशा महत्त्वाच्या ज्ञानशाखांमध्ये त्याने महत्त्वाची भर घातली. पण त्याच्या विचारांचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची मौलिकता (originality), त्यामागील स्वतंत्र बुद्धिमत्तेचा प्रभाव. त्यामुळेच तो अनेक क्षेत्रांत नव्या परंपरा निर्माण करू शकला. त्याच्या ‘जुली’ (१७६१) कादंबरीने रोमँटिक प्रवृत्तीचा साहित्यिक क्षेत्रात पाया घातला, तर मरणोत्तर प्रकाशित झालेल्या ‘रेव्हरिज ऑफ दी सॉलिटरी वॉकर’ (१७८२)ने त्या प्रवृत्तीचा सर्वत्र प्रसार केला. ‘एमिल’ने पाश्चात्त्य जगापुढे शिक्षणक्षेत्रातील नवीन वाटा दाखविल्या. ‘कन्फेशन्स’ (१७६१) हे आत्मकथन आत्मचरित्र क्षेत्रात नवीन वळण ठरले. संगीतक्षेत्रातही त्याच्या सात ऑपेराजने मोलाची भर घातली. पण पाश्चात्त्य जगात सर्वत्र त्याला प्रसिद्धी देणारे त्याचे लिखाण होते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतले. १७५० साली लिहिलेल्या ‘डिस्कोर्स ऑन दी आर्ट्स अँड सायन्सेस’पासूनच त्याने आपल्या वादळी विचारांच्या मांडणीला सुरुवात केली. रूसोच्या मते कला आणि विज्ञान हे दोन्हीही मानवी जीवनाला अपायकारक आहेत. त्यांची प्रगती म्हणजे संस्कृतीची बांधणी आणि संस्कृतीची बांधणी म्हणजे माणसाची शृंखलाबद्धता; माणूस ज्या बेडय़ांमध्ये अडकलेला आहे, त्याने केलेले हारार्पण. रूसोचा राग आहे संस्कृती (civilization) वर. विज्ञानावरील (अकारण का होईना) राग आपण समजू शकतो, पण कला हानिकारक कशा हे समजणे कठीण. रूसोच्या मते दोन्हींची निर्मिती माणसाच्या आंतरिक जाणिवांतून होत नाही. ती होते प्रतिष्ठेचा हाव आणि मोठेपणाची आकांक्षा. यांमधून कला आणि विज्ञान जीवनातील कृत्रिमता वाढवितात आणि त्यामुळे माणसाची नैसर्गिकता लोप पावते.
रूसोने जे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्या अनुषंगाने लिखाण केले त्यात ‘डिस्कोर्स ऑन इन इक्वालिटी’ (१७५५) हे महत्त्वाचे आहे. त्यामधून युरोपीय विचाराची मार्क्‍सवादाकडील वाटचाल स्पष्ट दिसते. या गं्रथाने रूसोच्या विचारांना सुसंगत आणि सुस्पष्ट बैठक मिळाली. रूसोच्या मते विषमतेच्या विषवृद्धीचे मूळ आहे खासगी मालमत्तेच्या अनावर आकांक्षेत. खासगी मालमत्तेच्या हव्यासामुळे सामाजिक जीवनात हिंसा, अन्याय, निर्दयपणा, संघर्ष इ. अपप्रवृत्तींचे तांडव सुरू झाले. सामूहिक जीवनातून ज्या कुटुंबसंस्थेचा उदय झाला आणि जीमध्ये मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ आनंद होता ती संस्थाही धोक्यात आली. उलट मालमत्तेचे सामथ्र्य वाढत गेले आणि कायदा आणि शासन मालमत्ताधारकांच्या ताब्यात गेले. त्यातून संघर्ष आणि अशांतता निर्माण झाली. व्यक्तीच्या निसर्गदत्त स्वातंत्र्याला कायद्याने नियंत्रित करण्यात आले आणि सामान्य माणसाला शासनापुढे शरणागती स्वीकारण्याशिवाय मार्ग उरला नाही. एकूण मालमत्ता आणि अनुषंगाने आलेला कायदा या दोन संस्थांनी माणसाचे जगणे असमाधानी, विकृत केले. त्यामुळे माणसे एकमेकांपासून तर दुरावलीच, पण ती एकमेकांपासूनही दुरावली. नैसर्गिक अवस्थेत जे निरलस, प्रेमळ, स्वाभिमानी होते ते आता स्वार्थी, मत्सरी, कनिष्ठांशी गर्विष्ठ, वरिष्ठांशी लाचार झाले. सरळ मनाच्या नैसर्गिक संस्कृतीचे विकृत मनाच्या आधुनिक संस्कृतीत हे रूपांतर, पण रूसोचे सर्वात महत्त्वाचे सामाजिक-सांस्कृतिक लिखाण त्याने लिहिलेला ‘ऑन सोशल कॉन्ट्रक्ट’ (१७६२) हा ग्रंथ. ग्रंथाची सुरुवात त्याच्या प्रसिद्ध विधानाने होते. तो म्हणतो, ‘माणूस स्वतंत्र म्हणून जन्माला येतो, पण तो सर्वत्र बेडय़ांत अडकलेला आढळतो.’ (Man is born free but he is found everywhere in chains). आता रूसोने काही प्रमाणात वस्तुस्थितीचा स्वीकार केला. त्याच्या म्हणण्यानुसार सामाजिक सहकार्यासाठी त्याला नैसर्गिक अवस्थेचा अपरिहार्य त्याग करावा लागला. जसजसा समाज ‘प्रगत’ होऊ लागला तसतशी सामाजिक व्यवस्थेला कामविभागणी (Division of labour) ची आवश्यकता वाटू लागली आणि समाजाची वर्गात/वर्णात विभागणी झाली. त्यांच्यात संघर्ष वाढले आणि शांतता आणि सामंजस्य लोप पावले. कायद्याची जरब, शासनाचे महत्त्वही वाढले. या तथाकथित प्रगतीत त्याच्या जन्मजात स्वातंत्र्याचा बळी तर पडलाच, पण त्याची माणुसकी हरपली. एका बाजूला सामाजिक व्यवस्थेची, कायद्याची अपरिहार्यता आणि दुसऱ्या बाजूस निसर्गदत्त स्वातंत्र्याचा लोप या शंृगापत्तीत सापडलेल्या माणसापुढे सुटकेचा एकमेव मार्ग म्हणजे ‘सर्वसाधारण इच्छाशक्ती’ (General will, समष्टी संकल्प)चा लोकशाही मार्गाने स्वीकार करणे, म्हणजे सर्वानी मिळून ठरविलेले प्रशासन आणि नियमन मान्य करणे. अशी सर्वेच्छा ही रूसोच्या राजकीय विचाराची केंद्रीभूत कल्पना आहे. ती मध्ये लोकशाही संकल्पना अनुस्यूत आणि तिच्या उपयोजनेत सापेक्ष किंवा साधारण (relative) समानता गृहीत धरली आहे. अशा व्यवस्थेतच माणसाला नैतिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचे समाधान मिळण्याची शक्यता आहे, कारण प्रशासन आणि विधिव्यवस्था आपलीच निर्मिती आहे याचे सामान्यांना भान राहील. महत्त्वाची गोष्ट ही की या संकल्पनेत निवडणुकांवर आधारलेली प्रचलित प्रातिनिधिक लोकशाही (Representative Democracy) चा समावेश नाही. जनतेने एकदा निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकांशी कसलाही संबंध न ठेवता चार-पाच वर्षे, त्यांना विश्वासात न घेता प्रतिष्ठा आणि जनतेच्या पैशातून मिळणाऱ्या सुविधा आरामात उपभोगत आणि भ्रष्टाचारातून पुढील निवडीसाठी पैसे जमवत मनमानी कारभार करणे म्हणजे लोकशाही नव्हे. सर्वेच्छेची संकल्पना गुंतागुंतीची आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की प्रचलित निवडणूकशाही म्हणजे लोकशाही नसून लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. रूसोच्या संकल्पनेत प्रशासनाच्या सत्तेचे विकेंद्रीकरण समाविष्ट आहे. त्यामध्येच खरी लोकशाही आणि खरे लोककल्याण शक्य आहे.रूसोबद्दल भारतीयांना अधिक आस्था वाटू शकेल याचे कारण रूसो आणि गांधी समविचारी आहेत. दोघांच्या मते आधुनिक संस्कृतीने माणसाला खूप भौतिक सुख दिले, त्यामुळे त्याची व्यावहारिक हाव वाढली, पण समाधान आणि मन:शांती संपली. दोघांच्या मते मशीन हा शाप आहे. आर्थिक समृद्धीपेक्षा नैतिक समृद्धी अधिक महत्त्वाची हे आधुनिकता विसरली. म्हणून ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात नैतिक प्रगती महत्त्वाची मानली जाणे आवश्यक आहे. राजकारणात निवडणूकशाहीचा त्याग करून सत्तेचे व्यवस्थित विकेंद्रीकरण तारक ठरेल. खरी लोकशाही म्हणजे सर्व जनतेच्या इच्छा आणि आदेश, सर्वाचे सुख आणि सर्वाचे स्वातंत्र्य रूसोच्या विचारांचा मोठेपणा हा की २०व्या शतकात गाजलेल्या मार्क्‍सवाद आणि गांधीवाद या दोन्ही  विचारांची बीजे त्याच्या विचारात स्पष्टपणे रुजलेली दिसतात.