निमित्त अबू जुंदालचे.. Print

 

निशांत सरवणकर - रविवार, १ जुलै २०१२

झबीहुद्दीन अन्सारी ऊर्फ झबी असे नाव इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीत आहे. अबू जुंदाल असा कुठेच उल्लेख नाही. पण मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या कबुली जबाबात अबू हमजासोबत जुंदालचे नाव आहे. आतापर्यंत एवढाच या जुंदालशी भारतीय तपास यंत्रणांचा संबंध होता. झबीचे संपूर्ण डॉसिअर तयार होते. परंतु झबी म्हणजेच जुंदाल असल्याचे १४ महिन्यांपूर्वी जेव्हा त्याच्याविरुद्ध भारतीय गुप्तचर यंत्रणेने मोहीम सुरू केली तेव्हा उमजून आले.


सौदी अरेबियातून भारतात आलेला (की पाठविलेला) अबू जुंदाल हा सुरुवातीला अबू हमजा असल्याचेही सांगितले गेले. परंतु अबू हमजा ही वेगळी व्यक्ती आहे. तो पाकिस्तानी असून त्याच्याविरुद्धही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचे खरे नाव आहे मोहम्मद रामादान मोहम्मद सिद्दिकी. म्हणूनच भारतीय तपास यंत्रणांनी अबू जुंदालला भारतीय बनावटीचा ‘अबू हमजा’ असे संबोधले आहे ते गमतीने. मात्र झबी सापडल्यामुळे २६/११ च नव्हे तर ‘लष्कर-ए-तय्यबा’च्या देशातील सर्वच प्रमुख घातपातांवर प्रकाश पडेल, असा विश्वास यंत्रणांना वाटत आहे. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगळुरू आदी सर्वानाच तो हवा आहे. गेली नऊ वर्षे तो या सर्वाना चकवा देत होता. महाराष्ट्र पोलिसांना पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी तो हवा आहे. अत्यंत कट्टर जिहादी म्हणून झबीची गुप्तचर विभागाच्या दफ्तरी नोंद आढळते.
गेल्या १४ महिन्यांपासून भारतीय गुप्तचर यंत्रणा म्हणे अबू जुंदालच्या मागावर आहे. जुंदालचे पहिल्यांदा नाव फक्त कसाबकडूनच नव्हे तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यांच्या यंत्रणेने केलेल्या तपासातून २६/११च्या वेळी कराची आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नियंत्रण कक्षात जे पाच-सहा कट्टर दहशतवादी होते त्यामध्ये अबू जुंदाल एक होता. तो नरिमन हाऊसमधील दहशतवाद्यांशी सॅटेलाइट फोनद्वारे संपर्कात होता. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मुद्रित केलेल्या केलेल्या दूरध्वनी संभाषणातही त्याचे नाव आले आहे.
गेवराई (बीड) जिल्ह्य़ातील झबी हा उत्कृष्ट इलेक्ट्रिशिअन होता. २२ वर्षांचा असतानाही त्याने अनेक किचकट कार्यालयांची इलेक्ट्रिशिअनची कामे केली आहेत. इतकेच नव्हे तर अधीक्षक कार्यालयाच्या वायरिंगचे कामही त्यानेच केले होते. परंतु लग्न झालेल्या बहिणीचा हुंडय़ासाठी छळ होऊ लागला तसा तो बिथरला. छळ करणाऱ्या फातिमा शेखला बोलणी करण्यासाठी बोलावून तलवार घेऊनच तो तिच्या मागे लागला आणि त्याने तिच्यावर सपासप वारही केले. अर्थातच त्यामुळे त्याला अटक झाली. जामीनही झाला. मात्र त्यानंतर न्यायालयाच्या तारखांना तो हजरच राहिला नाही. पोलिसांच्या फरारी आरोपींच्या यादीत तो झळकू लागला. २००६ मध्ये औरंगाबाद येथे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला एके-४७ तसेच अन्य शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला तेव्हा त्यात पहिल्यांदा झबीचे नाव पुढे आले. परंतु या पथकाला गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला होता. सिमीचा व पर्यायाने इंडियन मुजाहिद्दीनचा एक खंदा पाईक असल्याचे तोर्प्यत तपास यंत्रणांना कळून चुकले होते. २६/११च्या हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमधील नियंत्रण कक्षात बसून दहशतवाद्यांना मार्गदर्शन करणारा अबू जुंदाल म्हणजेच झबी असल्याची तपास यंत्रणांना अजिबात कल्पना नव्हती. किंबहुना कसाबकडून मिळालेल्या माहितीनंतरही जुंदाल त्यांना पाकिस्तानीच वाटत होता. परंतु या हल्ल्याचा समांतर तपास करणाऱ्या अमेरिकन यंत्रणांना डेव्हिड हेडलीच्या जबानीतून झबी ऊर्फ जुंदालचा सहभाग उघड होत होता. त्यामुळे अमेरिकन यंत्रणाही त्याच्या मागावर होती. कदाचित अमेरिकेच्याच दबावामुळे भारतीय तपास यंत्रणांना झबी ऊर्फ जुंदाल सापडला असावा, असा दावाही सूत्रांनी केला आहे.
‘यह तो ट्रेलर है.. पिक्चर अभी बाकी है..’ असे भारतीय प्रशासनाला २६/११च्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना बजावण्यास सांगणाऱ्या झबीने दीड वर्षांपूर्वी सौदी अरेबियात जाऊन पुढील कटाची आखणी केली होती. त्यासाठी तो नवे चेहरे शोधत होता. गुजरातमधील दंगलीची सीडी तेथील मदरशात उच्चशिक्षित तरुणांना दाखवून त्यांना जिहादसाठी तयार करीत होता. टॅक्सी चालविणे हा एक बहाणा होता. परंतु त्याआडून त्याने असे जिहादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठविण्यास सुरुवात केली होती. मरगळलेली इंडियन मुजाहिद्दीन पुनरुज्जीवित करण्याचा त्याचा डाव होता. रियाझ आणि यासिन भटकळच्या मागे भारतीय तपास यंत्रणा हात धुवून लागल्यानंतर ‘लष्कर’कडून झबीकडे आशेने बघितले जात होते. भारतात घातपात घडविण्यासाठी तेथील तरुण तयार करण्याची जबाबदारी झबीवर होती आणि त्यात तो यशस्वीही होत होता. परंतु त्यामुळेच भारतीय तसेच अमोरिकन तपास यंत्रणेच्या रडारवर आला आणि पकडला गेला.
त्या वेळी पाकिस्तानने तो आपलाच नागरिक असल्याचाही बनाव केला. कारण त्याच्याकडे रियासत अली या नावे पाकिस्तानी पासपोर्ट होता. मरीअम नावाच्या पाक महिलेशी त्याने विवाह केला होता. कराचीतील ओळखपत्र त्याच्याकडे होते, असे अनेक पुरावे दाखविले गेले. परंतु भारतीय तपास यंत्रणांनी सादर केलेला डीएनए चाचणीचा अहवाल आणि हातांचे ठसे आदींमुळे तो भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात मिळाला. मात्र केवळ हे एकच कारण असणे कठीण आहे. अमेरिकन तपास यंत्रणेच्या दबावामुळेच तो भारताच्या हाती लागला असण्याची शक्यता अधिक असल्याचेच सूत्रांचे म्हणणे आहे. कारण काहीही असले तरी २६/११च्या हल्ल्यातील पडद्यामागील महत्त्वाचा सूत्रधार हाती लागला आहे हे महत्त्वाचे आहे. या काळात त्याला स्थानिक मदत कोठून मिळाली हे शोधणेही आवश्यक आहे. सबाउद्दीन आणि फईम अन्सारी यांना न्यायालयाने निर्दोष सोडले असले तरी झबीच्या जबानीतून यावर अधिक प्रकाशझोत पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सय्यद झबी ते जुंदाल
नाकासमोर चालणारा सय्यद झबी अन्सारी हा तसा धार्मिकवादी नव्हता. पण जामिनावर सुटून फरारी झालेल्या झबीला काही व्यक्तींनी गुजरातमधील गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीतील क्रौर्य दाखविले. त्यानंतरच तो बिथरला आणि सिमीमध्ये सक्रिय झाला. सिमीच्या माध्यमातून ज्या तरुणांना २००३-०४ च्या आसपास नेपाळमार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आले त्यात झबीचा समावेश होता. त्याचे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि अल्पावधीतच तो ‘लष्कर’च्या खास मर्जीतला बनला ते त्याच्यातील कडवटपणामुळे. ‘दौरा-ए-आम’, ‘दौरा-ए-खास’ ही दहशतवादी कारवायांची अत्याधुनिक प्रशिक्षणे पूर्ण करणाऱ्या झबीला एके-४७ चालविण्याचे प्रशिक्षण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या अधिकाऱ्याने स्वत: दिले आहे. ‘लष्कर’चा कमांडर हाफिज सईद, मीर आदींची खास मर्जी त्याने संपादन केली होती, असे गुप्तचर विभागाचे डॉसिअर सांगते. झबीवर पहिल्यांदा जबाबदारी सोपविण्यात आली ती, प्रचंड मोठा  शस्त्रसाठा महाराष्ट्रातील ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचविण्याची. परंतु राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ही मोहीम उद्ध्वस्त करून टाकली. एके-४७ आणि जिवंत काडतुसे, मॅगेझीन्स, बॉम्ब बनविण्याचे साहित्य, आरडीएक्स असा मोठा साठा हस्तगत करताना १२ जणांना अटक करण्यात आली असली तरी झबी निसटून जाण्यात यशस्वी ठरला होता. ही एक मोहीम अयशस्वी ठरली असली तरी त्याआधी त्याच्या काही मोहिमा फत्ते झाल्या होत्या, असेही सांगितले जाते. त्याच वेळी मुंबईत येऊन राहिल शेखसोबत त्याने २००६ मधील मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटांचा कट आखला. त्या वेळी झबीऐवजी त्याने ‘अबू हमजा’ हे नाव धारण केले होते. पोलिसांच्या तपासात फरारी दाखविण्यात आलेला अबू हमजा हा बहुधा अबू जुंदाल असावा, असे आता सांगितले जात आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर तो २००६ मध्ये काश्मिरात पळून गेला होता आणि तेथेच राहत होता. रेल्वे बॉम्बस्फोटांमुळे झबी ‘लष्कर’चा महत्त्वाचा पाईक झाला होता. २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांची आखणीही त्यानेच केली होती. त्यानंतर २६/११ चा हल्ला. त्या वेळी अबू हमजाऐवजी त्याने ‘जुंदाल’ नाव धारण केले असावे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.