झळाळणाऱ्या तेजाची शलाका Print

 डॉ. शरच्चंद्र गोखले - रविवार, २९ जुलै २०१२

ज्यांच्याविषयी लहानपणापासून खूप वाचलं आहे, कार्याविषयी ऐकलं आहे, अशी एखादी व्यक्ती अवचितपणे भेटली तर? अशा वेळी एखाद्या लहान मुलाला दुर्मिळ खजिना सापडल्यावर जसा आनंद होतो, डोळे मोठ्ठे होऊन त्यातून कौतुक ओसंडू लागतं, तसंच माझंही अगदी आत्ता या वयातही होतं. अलीकडेच मी कानपूरला तेथील विद्यापीठात वयोवर्धन परिषदेसाठी गेलो, तेव्हा मला सुतराम कल्पना नव्हती की भारतीय इतिहासात स्वत:च्या कर्तृत्वाची मोहोर उमटवलेल्या एका वीरांगनेला मी भेटणार आहे. 

कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी यांचा सत्कार करताना मी काहीसा संकोचलोही होतो आणि त्याचवेळी मनात अभिमानही दाटून येत होता.
वयाच्या ९३ वर्षीही तितक्याच धडाडीने काम करणाऱ्या लक्ष्मीजींचा वयोवर्धन परिषदेत आवर्जून सत्कार करण्यात आला. माझ्या डोळ्यासमोरची त्यांची प्रतिमा खाकी गणवेशामध्ये ‘चलो दिल्ली’ अशी घोषणा देणाऱ्या वीरांगनेची होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावळीत जनरल भोसले, कर्नल सहगल यांच्यात झळकणाऱ्या पहिल्या स्त्री सेनापती कॅप्टन लक्ष्मी म्हणजे अद्भुत वीरकथा होती. त्यामुळं वार्धक्यातही जपलेल्या इतक्या सुंदर रूपामध्ये त्यांना ओळखणंही अवघड होतं.
उत्तर प्रदेशातल्या गावातल्या कुठल्याही कसब्यातल्या घराप्रमाणे हे तीन मजली घर! घरात मोजक्या पण उत्तम फर्निचरची नेटकी मांडणी होती. टेबलांवर, भिंतीवर स्वातंत्र्यसंग्रामाचा विशेषत आझाद हिंद फौजेचा इतिहास सजून बसला होता. सुभाषबाबूंचे अनेक फोटो मला बघायला मिळाले. एक फोटो दाखवत त्या म्हणाल्या, ‘ही मी, हे सुभाष बाबू आणि यांना तुम्ही ओळखलंच असेल.’ आपले पती कर्नल सहगल यांची अशी ओळख करून देताना साऱ्या स्त्रीसुलभ भावना त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होत्या.
फोटो दाखवत दाखवत बाई आपल्या कुटुंबाच्या कहाणीत केव्हाच शिरल्या होत्या. माझी एक मुलगी कानपूरला असते, दुसरी दिल्लीत! दिल्लीची सुभाषिणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सक्रिय सदस्य आहे. लोकसभेची ती सदस्य होती. तिचे पती मुजफ्फर अली प्रसिद्ध कलाकार आहेत. अन् नातू तुम्हाला ठाऊक असेलच! शाद अली- ‘साथियाँ’ अन् ‘बंटी और बबली’ या चित्रपटांचा दिग्दर्शक! बाईंचा चेहरा नातवंडांचं कर्तृत्व सांगताना फुलून आला होता. माझ्या मनात आलं, आजी कुठलीही असो, शेवटी नातवंड म्हणजे तिच्यासाठी दुधावरची सायच! ही बहीण-मृणालिनी साराभाई.. बाई पुढं सांगत होत्या. ही आई- हे वडील. आमचं कुटुंब मुळात केरळमधलं. पण आम्ही वाढलो ते चेन्नईमध्ये. वडील एस. स्वामीनाथन शिक्षक होते अन् अतिशय पुढारलेल्या विचारांचे! कम्युनिस्ट विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता. अगदी तिखट कम्युनिस्ट म्हणा ना! जात-पात, धर्म ही उतरंडीची समाजव्यवस्था त्यांना नामंजूर होती. त्याही काळात हरिजनांविषयी ते वेगवेगळी कामं करत. विशेष म्हणजे आमच्या आईनंही त्यांना साथ दिली.
कॉलेजात शिकत असतानाची गोष्ट! ‘जेल भरो’ आंदोलनाचे दिवस. महात्मा गांधी चेन्नई भेटीवर आले होते. कौतुकाने लक्ष्मीजी त्यांना भेटायला गेल्या. त्यांची स्वाक्षरी मागितली. गांधीजींनी नेहमीच्या शैलीत मिश्किलपणे त्यांना विचारलं. ‘स्वाक्षरीच्या बदल्यात देशाला तू काय देशील?’ ‘तुम्ही म्हणाल ते!’ बाई उत्तरल्या, ‘तुरुंगात जाशील?’ असं गांधीजींनी विचारताच त्या म्हणाल्या, ‘माझ्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या घ्या. पण मी शिक्षण अर्धवट टाकून कुठंही जाणार नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जरूर सत्याग्रहात सामील होईन.’ आजही करारी चेहेऱ्याने त्या सांगतात. ‘पढम्ना.. शिक्षा पूरी करनाही मेरा ध्येय था।’ लक्ष्मीजींनी खरोखरच पाटल्या देऊन टाकल्या. सुभाषबाबूंना ब्रिटिशांनी कलकत्त्यात स्थानबद्धतेत ठेवलं होतं. जर्मनी आपल्याला काही मदत करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी नेताजी ब्रिटिश पोलिसांचा पहारा चुकवून, गुप्तपणाने खैबर, पेशावर मार्गाने जर्मनीत पोचले. मात्र अपेक्षेप्रमाणे जर्मनीनं सहकार्य दिलं नाही. या परिस्थितीमध्ये रासबिहारी घोष यांनी सुभाषबाबूंनी जपानला यावं असं सुचवलं आणि जनरल टोजो यांच्या मदतीने पाणबुडीतून त्यांना जपानमध्ये आणण्याची सोय केली. जपानने जर सुभाषबाबूंना सहकार्य केलं, तर पूर्ण आशियामध्ये ब्रिटिशांची एकाधिकारशाही नष्ट करू शकू अशी रासबिहारी घोष यांची भूमिका होती. रासबिहारींचे जपानचं मन वळवण्याचे प्रयत्न चालूच होते. अखेरीस त्यांना यश मिळालं. सुभाषबाबूंना मदत करण्यास टोजो तयार झाले.
सुभाषबाबूंनी सिंगापूर येथे सार्वजनिक सभेमध्ये भारतीय नागरिकांना उद्देशून भाषण केलं. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा.’ त्यांच्या भाषणानंतर बाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांना विचारलं, की ‘तुम्ही स्त्रियांना सैन्यात प्रवेश का देत नाही?’ सुभाषबाबू म्हणाले, ‘स्त्रियांची पलटण तयार करण्यासाठी कमीत कमी ३००० स्त्रिया हव्यात. एवढय़ा तयार होतील का?’ बाईंनी तत्क्षणी त्यांना ३००० स्त्रियांना राजी करण्याचा शब्द दिला.
हिंदुस्तानी बायका मार्ग राहणाऱ्या नाहीत. त्या अत्यंत कर्तृत्ववान आहेत हे ओळखून बाईंनी सिंगापूर-मलेशियातल्या ३००० बायका गोळ्या केल्याही. ‘आम्ही रक्त देऊ, कुर्बानी देऊ, पण बायका म्हणून मागे ठेवू नका.’ हे त्यांनी सुभाषबाबूंना कळकळीने सांगितलं. स्त्रियांची पलटण तयार झाली. मी बाईंना विचारलं, ‘इतक्या महिलांना लष्करामध्ये रुजू होण्यासाठी त्यांच्या नवऱ्यांनी परवानगी कशी दिली?’ या महिलांच्या पलटणीमध्ये भारतातल्या विविध राज्यांमधल्या स्त्रिया होत्या. संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व या तुकडीमध्ये होतं. एका महिन्याचं सैनिकी प्रशिक्षण या महिलांनी घेतलं. त्यांना बंदुका मिळाल्या. इथेच बाईंना भेटले कर्नल सहगल!
आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे तेव्हाचे कॅप्टन सहगल आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत होते. मी बाईंना विचारलं, ‘लग्नासाठी कोणी कोणाला विचारलं?’ मिश्किलपणे बाई म्हणाल्या, ‘मी कशाला विचारू?’ त्यानेच विचारलं. पण तो मला आवडला. अन् मी त्याला होकारही दिला. लग्नानंतरही त्यांनी आझाद हिंद सेनेत मनोभावे काम केलं. स्त्रियांची पलटण लढत-लढत ब्रह्मदेश इम्फाळकडे निघाली. ‘चलो दिल्ली’ ही त्यांची घोषणाही होती आणि लक्ष्यही होते. मात्र त्याच सुमारास अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला. हिरोशिमाच्या नरसंहारानंतर जपानचा जगभरात अनेक आघाडय़ांवर पराभव झाला.
बाईंना मी म्हटलं, ‘लढून स्वातंत्र्य मिळविण्याच्या विचारप्रवाहातल्या आपण! आज आपली मतं बदलली आहेत का?’ विशेषत: उत्तर प्रदेशाच्या भ्रष्ट राजकारणाचा संबंध घेऊन मी हा प्रश्न विचारला होता. माझा प्रश्न पुराही होऊ न देता, त्या म्हणाल्या, ‘सामान्य माणूस जोवर जागृत होऊन अन्यायाच्या प्रतिकारात उभा राहत नाही, तोवर दुसरा पर्याय नाही. लोकक्रांती हेच भ्रष्ट राजकारणाला थेट उत्तर आहे.’
मला भेटलेल्या कॅ. लक्ष्मी सहगल अशा आहेत. मी कम्युनिस्ट आहे असं अभिमानानं सांगणाऱ्या. पूर्वायुष्यातील तेजस्वी पर्वाचा गर्व न बाळगणाऱ्या, कॅप्टन सहगल यांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आणणाऱ्या. जातिभेद, गरिबांच्या पिळवणुकीबद्दल तळमळीने बोलणाऱ्या, संघटित लोकक्रांतीसाठी अजूनही धडपडणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या! पण परिपूर्ण स्त्रीचं आंतरिक सौंदर्य ल्यालेल्या! वीरांगना, पत्नी, माता, रुग्णांसाठी दैवत, नातवंडांची मॉडर्न पण मायाळू आजी असणाऱ्या! वाईट राजकारणाला नाकं न मुरडता, न घाबरता.. ‘पेटून उठा’ म्हणणाऱ्या! तेजाने तळपणारी ज्योत भोवताली प्रकाश देते तशाच!