धगधगता आसाम Print

 राजकीय इच्छाशक्ती हवी!
ब्रिग. हेमंत महाजन - रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्थानिक विरुद्ध घुसखोर यांच्यातील वादाने आसाममध्ये हिंसक रूप धारण केले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि व्यापक कारवाई करण्याबाबतची उदासीनता  यांमुळे चिघळलेल्या या प्रश्नाची उकल करणारा हा लेख..
गुवाहाटीसारख्या राजधानीत एका युवतीवर जमावाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलेला आसाम सावरत असताना आता बोडो भूमीत िहसाचाराचे लोण पसरले आहे. आताचा वाद  ‘स्थानिक विरुद्ध परके’ असा आहे.

त्यातच या वादाला जमिनीच्या मालकीची पाश्र्वभूमी आहे. धुबरी जिल्हय़ातून गेली अनेक वष्रे अल्पसंख्याक समाजातील (आता ते बहुसंख्याक झाले आहेत ) लोक कोक्राझार जिल्हय़ात येत आहेत. त्याचा स्थानिकांना राग आहे आणि त्यातून संघर्षांची ठिणगी पडली. मुळात आसाम हे काही प्रगत राज्य नाही. िहसाचाराचा हा आगडोंब उसळल्यामुळे राज्य सरकारचा ढिसाळपणा उघड झाला आहे.
आपल्याला संधी मिळावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आणि त्यात बाहेरच्यांची घुसखोरी; अशी स्थिती निर्माण झाल्याने तिचे पर्यवसान िहसाचारात होते. स्थानिकांच्या वेदना जाणून घेऊन त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. केवळ चच्रेच्या आश्वासनातून काही साध्य होणार नाही. बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवूनच या समस्येवर समाधानकारक तोडगा काढणे हाच शांततेचा खरा मार्ग ठरेल.

२३ जुलपासून आसाममध्ये जातीय िहसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्हय़ाला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. ८००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या ५०० गावांमध्ये िहसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आसाममध्ये शुक्रवारी रात्री बोडो लिबरेशन टायगरच्या चार कॅडर्सची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बोडो आणि बांगलादेशींमध्ये घुसखोरांत संघर्ष भडकला आहे. भारतात बेकायदेशीर घुसखोरी करून येथेच कायमचे स्थायिक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नेमकी मोजदाद कधीही केली गेलेली नाही. परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या साडेतीन-चार कोटींच्या घरात आहे. यापकी सर्वाधिक म्हणजे ८० ते ९० लाख बांगलादेशी एकटय़ा आसाममध्ये घुसलेले आहेत
भौगोलिक अडचणीमुळे ही घुसखोरी रोखणे जिकिरीचे असले तरी गेल्या ५० वर्षांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने हे काम अधिकच कठीण झाले आहे. या घुसखोरांना हुडकून त्यांना परत बांगलादेशात पाठविण्यासाठी केंद्राने केलेला कायदा ही यातील मोठी अडचण असल्याची सबब बरीच वष्रे पुढे केली गेली. परंतु हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून आता आठ वष्रे झाली तरी या कामात जराही गती आलेली नाही.
घुसखोर बांगलादेशी गेली कित्येक दशके अप्पर आसामच्या सीमेला लागून असलेल्या जिल्हय़ांमध्ये बहुसंख्येने घुसले. तेथे स्थानिकांचा दबाव, विरोध व संघर्ष वाढल्यावर त्यांनी लोअर आसामच्या धुबरी, गोलपाडा, कोक्राझार, मोरीगाव व नवगाव जिल्हय़ांमध्ये घुसण्यास सुरुवात केली. १९८०च्या दशकात आसाममधील विद्यार्थ्यांनी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या (आसू) नेतृत्वाखाली या घुसखोरीविरुद्ध सहा वष्रे प्रखर आंदोलन केले. त्यातून पुढे केंद्र सरकारने आसाम करार केला व २५ जून १९७१ नंतर घुसखोरी केलेल्या सर्व बांगलादेशींची हकालपट्टी करण्याचे मान्य केले. पण हा करार कधीही प्रामाणिकपणे पाळला गेला नाही.
२०११ सालात ईशान्य भागात १४८९ िहसक घटना घडल्या. या िहसक घटनांत ईशान्य भागात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला. एकटय़ा आसाममध्येच गेल्या वर्षभरात शंभरेक बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत. व २०१२ मध्ये २२ जुलपर्यंत ७० नागरिकांचा मृत्यू झाला. भारताच्या ईशान्येकडील राज्यांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या कुख्यात ‘इंटर सíव्हसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या संघटनेने या राज्यांतील दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. आसाममधून जाणाऱ्या भारत-बांगलादेश सीमेवर गुरांचा चोरटा व्यापार वाढला आहे. अनेक दहशतवादी संघटना येथे कार्यरत आहेत. ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा) ही दहशतवादी संघटना इस्लामी दहशतवाद्यांबरोबर संपर्कात आहे.
बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीमुळे ‘आयएसआय’ आणि मूलतत्त्ववाद्यांना केवळ आसाममध्येच नव्हे, तर ईशान्येकडील अन्य राज्यांतही तळ उघडणे सोपे जाते. या प्रदेशात वीसपेक्षा जास्त जिहादी गट कार्यरत असून, आसामचे रूपांतर इस्लामी देशात करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. बांगलादेशातून होणाऱ्या अर्निबध घुसखोरीमुळे या राज्यांतील लोकसंख्येचा तोल आणि समन्वयच धोक्यात आला आहे. प्रथम घुसखोरी करायची आणि मग त्या प्रदेशाचा लचका तोडायचा, असा ‘आयएसआय’चा डाव आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील वीस दहशतवादी संघटना सध्या ‘आयएसआय’च्या जवळ आल्या आहेत.
आसाममध्ये बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी होत असून, धुबरी, नागाव, गोलपारा या जिल्हय़ांत घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यात मूलतत्त्ववादाचा प्रसार केला जात असून, त्याकडे सत्ताधारी एक तर दुर्लक्ष करीत आहेत किंवा राजकारणासाठी त्याचा सोयीस्करपणे वापर केला जात आहे. भारतात बांगलादेशाचे सुमारे ४ कोटी नागरिक बेकायदा घुसले असून, स्थिती अशीच कायम राहिल्यास ही संख्या दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही. बांगलादेशात असलेली ‘हुजी’ ही दहशतवादी संघटना आसाममध्ये िहसाचार घडवून आणते आहे. यांपकी बहुतेक घुसखोर आसाममध्ये स्थायिक होतात. गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांची संख्या वाढली आहे आणि आता तर ते मतदारही झाले आहेत. घुसखोर बांगलादेशींनी एक पक्षही सुरू केला आहे. त्याने निवडणूकही लढविली आहे. त्यांचे सध्या २१ आमदार आहेत व ते मुख्य विरोधी  पक्ष आहेत. कठोर राजकीय इच्छाशक्ती दाखविली नाही तर या घुसखोरांच्या लोंढय़ांमुळे आसाममधील मूळ रहिवासी त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्य होण्याचा दिवस फार दूर नाही.
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्ये मिळून भारत-बांगलादेश सीमेची लांबी ४०९६ किलोमीटरची आहे. यातील २४००पेक्षा जास्त किलोमीटरच्या सीमेवर भारताने गेल्या आठ वर्षांत काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. आसाममध्ये २६३ पकी १९७ किलोमीटरच्या सीमेला कुंपण घालण्यात आले आहे. कुंपण घालणे, सीमेवरून होणारी घुसखोरी, बनावट चलनाची तस्करी आदी मुद्दय़ांवर सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेश रायफल्सच्या अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा झाली आहे; पण हे सगळे प्रश्न कायमच आहेत. तेथील सुरक्षा दलांबरोबरच पोलिसांची संख्याही वाढवायला हवी. नवीन ठाणी निर्माण करायला हवीत. बांगलादेश आणि म्यानमारमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी तेथील सरकारशी चर्चा केली जावी, ईशान्येकडील अनेक राज्यांत असलेला िहसाचार थांबविण्यासाठी आसाममधील कारवाई उपयुक्त ठरू शकते. आसाममध्ये मोहीम घेण्याची हीच वेळ आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मतपेढीचे राजकारण थांबवले, तर ते शक्य आहे.