मत मान्यवरांचे Print

रविवार, ५ ऑगस्ट  २०१२

‘लोकसत्ता व्यासपीठा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या कार्यक्रमाचे खास कौतुक संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी आणि उपस्थित असलेल्या मान्यवर साहित्यप्रेमींनी केले. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना एका व्यासपीठावर आणून त्यांना बोलते करण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी साहित्य व्यवहाराशी संबंधित निवडक लोकांना बोलविण्याची ‘लोकसत्ता’ची कल्पना सर्वाना खूपच आवडली.

संमेलनाध्यक्ष निवडणूक, निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लेखकाची भूमिका, त्याचे या संदर्भातील विचार, हे सर्व मोकळ्या मनाने येथे मांडता आले. मराठी साहित्य आणि एकूणच साहित्य व्यवहारासाठी अशी निकोप चर्चा व्हायला पाहिजे. त्याची सुरुवात या आगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन, असे मत आणि प्रतिक्रिया चारही उमेदवार आणि आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.

खेळीमेळीने चर्चा झाली
अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या चारही उमेदवारांनी एकमेकांवर चिखलफेक न करता खूप खेळीमेळीने चर्चा केली, हे दृष्य खरोखरच स्तुत्य आहे. मात्र चौघेही अध्यक्षपदासाठी तेवढेच उत्सुक आहेत, हे सत्य नाकारूनही चालणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एकच साहित्य संमेलन घेण्याऐवजी विभागवार चार साहित्य संमेलने व्हावीत. विभागवार संमेलने होतात, मात्र त्याहीपेक्षा मोठय़ा स्तरावर सहा-सात जिल्ह्यांनी एकत्र येऊन एखादे संमेलन भरवावे. म्हणजे सर्वाना समान संधी मिळेल आणि साहित्य रसिकांनाही अशा संमेलनांना हजेरी लावायला मिळेल. तसेच साहित्यिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, संमेलन हे साहित्यिकांसाठी नाही, तर त्यांना देव मानणाऱ्या लोकांसाठी असते. या संमेलनांमध्ये काळानुरूप बदल करायला हवेत. ती जास्तीत जास्त तंत्रप्रवण बनवायला हवीत. तसेच अध्यक्षांनी एखाद्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यायला हवी.
डॉ. विजया वाड, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ.

वाचकांचे महत्त्व अधोरेखित करणारे कार्यक्रम हवेत
परिसंवादाचे विषय बऱ्याच वेळा विद्यापीठातील चर्चासत्रांसारखे असतात. सर्वसामान्यांना आवडतील असे विषय या परिसंवादात नसतात. वास्तविक संमेलनांमध्ये सर्वसामान्यांना आवडणारे विषय असायला हवेत. प्रकाशकांचा सहभाग असेल असेही परिसंवाद आवर्जून घ्यायला हवेत, वाचनसंस्कृतीविषयक परिसंवादही ठेवावेत. ग्रंथप्रदर्शनाचे महत्त्व साहित्य संमेलनात फार मोठे आहे. परंतु, ग्रंथप्रदर्शनाची जागा मुख्य मंडपापासून खूप लांब असते. व्यासपीठावरूनही ग्रंथांची जाहिरात करायलाही हरकत नाही. संमेलनानिमित्त मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्यामुळे सहजपणे वाचकाला डोकावता येईल अशा ठिकाणी किंवा मंडपाच्या सुरुवातीलाच ग्रंथप्रदर्शनाची जागा असायला हवी. पुस्तकाकडे वाचक कसा वळेल हे पाहिले पाहिजे. म्हणून वाचकांचे महत्त्व अधोरेखित करणारे कार्यक्रम संमेलनातून असायला हवेत.
अशोक कोठावळे, ज्येष्ठ प्रकाशक व ‘ललित’ मासिकाचे संपादक

‘महाकोष’ वाढविण्यासाठी कार्यक्रम आखावा
कार्यक्रमाची कल्पना खरोखरीच अभिनव म्हणायला हवी. या प्रकारची चर्चा खरेतर राजकारण्यांना एकत्र आणून करायला हवी. पण साहित्य संमेलनाचा ‘महाकोष’ वाढविण्यासाठी साहित्यिकांनी कार्यक्रम आखला पाहिजे. महाराष्ट्रातून प्रत्येक व्यक्तीने आपल्या मिळकतीतील एक रुपया जरी महाकोषाला दिला तरी २० टक्के निधी जमा होईल.
अप्पा परचुरे, परचुरे प्रकाशन

उमेदवाराची भूमिका ठोस वाटली नाही
साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजिण्यात आलेला हा कार्यक्रम निश्चितच चांगला उपक्रम आहे. कार्यक्रमही अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. लोकशक्तीनं उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह आहे. मात्र, कोणत्याही उमेदवाराची भूमिका ठोस वाटली नाही. लेखकाने लेखणीच्या पलीकडे जाऊन साहित्य चळवळ जगवली पाहिजे. त्यासाठी साहित्यिकांनी कार्यकर्त्यांच्या ऊर्मीने काम करायला हवे. साहित्य क्षेत्रातील परिवर्तनाची ती गरज आहे. परंतु या उमेदवारांनी अत्यंत सावध उत्तरे देऊन वेळ मारून नेली, असे म्हणायला हवे. आतापर्यंत दुर्गाबाई भागवत, पु. भा. भावे, विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या जोरकसपणे आपली भूमिका साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडली , तशी वृत्ती दुर्दैवाने आत्ताच्या साहित्यिकांमध्ये दिसत नाही.
नरेंद्र पाठक, के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य

साहित्यबाह्य़ निकषांवर टीका नको
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार शिरीष गोपाळ देशपांडे यांनी मांडलेला भावंडभाव वाढविण्याचा मुद्दा योग्यच आहे. त्या अनुषंगाने सर्व साहित्यिकांनी प्रयत्न करायला हवेत. आज साहित्यिकाचे जात, वर्ण अशा मुद्दय़ांवरून मूल्यमापन करून टाकाऊ किंवा महान ठरविले जाते. या गोष्टीचा निषेध करायला हवा. साहित्यिकच एकमेकांना साहित्यबाह्य़ निकष लावून टीका करतात; त्याचा उल्लेख निवडून आलेल्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात करायला हवा. त्या दृष्टीने वर्षभर प्रयत्न करायला हवेत.
जयंत एरंडे, ‘आकाशवाणी’चे निवृत्त उपमहासंचालक

समाज आणि साहित्याची नाळ तुटलेली
आजघडीला समाजासमोर आदर्श नाही.  समाज आणि साहित्य यांची नाळ तुटलेली आहे. देशातील तरुण पिढी संभ्रमित अवस्थेत आहे. त्याबाबत निवडून आलेल्या अध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून भूमिका मांडली पाहिजे. साहित्यिकांनी समाजापासून स्वत:ला वेगळे काढू नये. वैचारिक बैठक नसल्यामुळे आजचे तरुण जेव्हा ४०-५० वर्षांचे होतील तेव्हा भरकटतील.  म्हणून निवडून आलेल्या अध्यक्षांनी वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका मांडली पाहिजे. समाजाला चांगल्या गोष्टींची दिशा दाखविण्याबरोबरच ठाम भूमिका घेऊन निवडून आलेल्या अध्यक्षांनी वेळोवेळी आपले मते व्यक्त करून दबावगट म्हणून काम करायला हवे.     
ज्ञानदा पटवर्धन, साहित्यप्रेमी

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा
वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम होता. साहित्यिक एकत्र जमविण्याचे अवघड काम ‘लोकसत्ता’ने केले  हे निश्चितच प्रशंसनीय आहे.  साहित्य संमेलन भरविण्यासाठी सरकारनेच सगळे करायचे अशी भूमिका अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मांडली. मग साहित्यिक काय करणार, हा मोठा प्रश्न आहे. साहित्य संमेलने सार्वजनिक ग्रंथालये भरवितात. साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रंथालयेच करतात. म्हणून ग्रंथालय, ग्रंथालयाचे कर्मचारी यांचे प्रश्न मांडून सोडवायला हवेत. साहित्य संमेलनात फक्त ठराव मांडले जातात, त्याबाबत कृती काहीच घडत नाही. मग लाखो रुपये खर्चून संमेलन साजरे करण्याला काय अर्थ उरतो? साहित्य व्यवहार, ग्रंथालय कर्मचारी, वाचन व्यवहार यासंबंधीच्या विविध प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी ठाम भूमिका घेऊन करायला हवा.
विवेक जुवेकर, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष

दावेदारांना एकत्र आणण्याची कल्पना छान
संमेलनाध्यक्षपदाच्या दावेदारांना एकत्र आणण्याची ही कल्पना खूपच आवडली. कार्यक्रमाच्या कल्पनेतच त्याचे यश दडलेले आहे. निवडक प्रेक्षक असल्याने चर्चाही आटोपशीर झाली.
विजय कदम,  ‘सह्य़ाद्री’ वाहिनीचे वृत्तनिवेदक

अभिनव उपक्रम
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेल्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून चर्चा घडवण्याचा ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम खूपच अभिनव आहे.  या उपक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरांचे आकलन झाले. प्रत्येक उमेदवाराची भूमिका, त्यांची मनोकामना याबाबतही आम्हाला माहिती मिळाली. मात्र एक सूचना कराविशी वाटते की, अध्यक्षपदाचा कार्यकाल वाढवावा. त्यामुळे अध्यक्षांना त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यास योग्य कालावधी मिळेल. तसेच निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्यायला हवे. निवडणूक होण्याऐवजी एकमताने अध्यक्षाची निवड व्हावी.
शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन

नवीन पायंडा
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या या शब्दगप्पांच्या निमित्ताने एक नवीन पायंडा पडला आहे. एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणल्याने या चारही उमेदवारांना समान संधी मिळाली. आपल्या भूमिका मांडण्यासाठी, विशिष्ट प्रश्नांवर मतप्रदर्शन करण्यासाठी त्यांना उत्तम संधी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम ‘लोकसत्ता’ने  आयोजित करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा आहे.
संजय भुस्कुटे , संमेलन संयोजन समितीचे सदस्य

अतिशय वस्तुनिष्ठ उपक्रम
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि त्यावरून होणाऱ्या शाब्दिक चकमकी याआधी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. मात्र यंदा ‘लोकसत्ता’ ने अतिशय वस्तुनिष्ठ उपक्रम राबवत विषयाला नेमक्या पद्धतीने वाचा फोडली आहे. अनेकदा संमेलनांना जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र ते तसे होऊ नये, म्हणून नेमके काय करायला हवे, या अपेक्षाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या उमेदवारांपर्यंत पोहोचल्या. मात्र एक गोष्ट नक्कीच जाणवली की, अध्यक्ष हा शोभेचा गणपती नको, तर त्याने ठाम भूमिका घ्यायला हवी. अध्यक्षाच्या मागे कामासाठी कार्यकर्त्यांची फळी आपोआप तयार होईल. तसेच अध्यक्षांनी निर्णय प्रक्रियेतही उतरायला हवे.
विद्याधर निमकर, चतुरंग प्रतिष्ठान

खूप माहिती मिळाली
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय सुरेख आणि वेगळा होता. या कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रश्नकर्ते मोजके आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित असल्याने विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. खूप माहिती मिळाली. ‘लोकसत्ता’चे आयोजनही अतिशय उत्तम होते. अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या भूमिकाही आम्हाला ऐकायला मिळाल्या. एका गोष्टीचा खेद वाटतो की, काही उमेदवारांनी या व्यासपीठाचा म्हणावा तेवढय़ा प्रभावी पद्धतीने वापर केला नाही. अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची ही मते आणि भूमिका ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे या सर्वच उमेदवारांनी या व्यासपीठाचा उत्तम वापर करून घेणे आवश्यक होते.
नारायण लाळे, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते

चांगली कल्पना
संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांची मतं थेटपणे जाणून घेण्याची ही चांगली कल्पना आहे. कारण एकदा का अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली की साहित्यिक बनचुके होतात. आता ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कोणत्याही भूमिकेत अडकलेले नाहीत.
सुदेश हिंगलासपूरकर, ‘ग्रंथाली’चे विश्वस्त

प्रतिक्रियांचे शब्दांकन - रेश्मा शिवडेकर, रोहन टिल्लू, सुनील नांदगावकर