सात मिनिटांचा थरार.. Print

 

रविवार, १२ ऑगस्ट २०१२

पृथ्वीशिवाय जीवसृष्टीची शक्यता असलेला सूर्यमालेतील ग्रह म्हणजे मंगळ. आतापर्यंतच्या अनेक मोहिमांत तेथे पाणी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळेच अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने मार्स सायन्स लॅबोरेटरी म्हणजे एमएसएल प्रकल्पात क्युरिऑसिटी रोव्हर यशस्वीरीत्या उतरवली.

बुधवारी नासाच्या नियंत्रण कक्षात ज्यांनी ही रोव्हर मंगळावर अतिशय अवघड जागी उतरवण्याचा थरार अनुभवला त्यात भारतीय वंशाची अनिता सेनगुप्ता ही एरोस्पेस अभियंता असलेली महिला वैज्ञानिकही होती. विशेष म्हणजे क्युरिऑसिटी रोव्हर मंगळावर उतरवताना तिचा वेग कमी करण्यासाठी वापरलेल्या पॅराशूटच्या चाचण्या व प्रयोगात तिचा मोठा वाटा होता. त्यामुळेच शेवटच्या सात मिनिटांचा थरार हा तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी आठवण ठरते. नासामधील अनेक भारतीय वैज्ञानिकांनी या मंगळ मोहिमेत आपली विज्ञान व तंत्रज्ञान कौशल्ये पणाला लावली होती. त्यातीलच एक असलेल्या नासाच्या एरोस्पेस अभियंता अनिता सेनगुप्ता यांनी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी राजेंद्र येवलेकर यांच्याशी कॅलिफोर्नियातून व्हिडिओ मुलाखतीत या मंगळ मोहिमेविषयी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.
प्रश्न- जेव्हा ‘क्युरिऑसिटी रोव्हर ’अचूकपणे मंगळावर हव्या त्या ठिकाणी उतरली तेव्हा नेमकं काय वाटलं?
उत्तर- मंगळावर ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ उतरवण्याचा हा अनुभव अतिशय वेगळा होता. आमची सर्व अभियांत्रिकी कौशल्ये यात आम्ही वापरली होती. जेव्हा क्युरिऑसिटीने यशस्वी मंगळावतरणाचा पहिला संदेश पाठवला व छायाचित्रही पाठवले तो माझ्यासाठी आनंदाचा अन् अविश्वसनीय क्षण होता यात शंका नाही.
प्रश्न- मंगळावर अंतराळयानाचा त्या सात मिनिटांचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू झाला तेव्हा खूप मानसिक ताण जाणवला असेल. त्याला कसे सामोरे गेलात?
उत्तर-  ताण जरूर होता, पण आम्ही अवतरणाच्या वेळी असलेल्या शक्यता गृहीत धरल्या होत्या. त्याचबरोबर यश मिळणार ही आशाही मनापासून वाटत होती. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकीच्या माध्यमातून जे काही करणे शक्य होते ते सर्व आम्ही केले होते. पुढच्या काही बाबी आमच्या हातात नव्हत्या. अखेर आम्ही ते करून दाखवलं.
प्रश्न- मंगळावर उतरवलेल्या या रोव्हरची जी शेवटची सात मिनिटांची कसरत होती त्याला ‘ चित्तथरारक सात मिनिटे’ असे म्हटले गेले आहे. त्यात तुम्ही चाचणी केलेल्या मोठय़ा पॅराशूटचा वापर केला होता़  यात नेमके  काय घडले?
उत्तर - तो श्वास रोखून धरायला लावणारा अनुभव होता. त्या चित्तथरारक सात मिनिटांत अंतराळयानाचा वेग हा सहा ते सात  मिनिटे इतक्या कमी कालावधीत ताशी १३ हजार मैलांवरून ताशी दोन मैल इतका खाली आणला जातो. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा अंतराळयान मंगळाच्या वातावरणात प्रवेश करून तेथील पृष्ठभागाच्या दिशेने खाली जाऊ लागते तेव्हा मोठय़ा घर्षणाचा सामना करावा लागतो, त्यामुळे तापमान १६०० अंशांपर्यंत वाढून ते नष्ट होण्याचा धोका असतो. पण उष्णतारोधक आवरणाने त्यावर यशस्वीरीत्या मात करण्यात आली. ‘अ‍ॅपॉरच्युनिटी’ व ‘स्पीरिट’ या रोव्हर सोडताना जो पॅराशूट वापरला होता, त्यापेक्षा खूप मोठा पॅराशूट यावेळी वापरण्यात आला. कारण या रोव्हरचे वजन ८९० किलो म्हणजे पूर्वीच्या रोव्हर्सपेक्षा खूपच जास्त होते. साधारण १२ कि.मी. उंचीवर असताना पॅराशूट उघडण्यात आले व त्याच्या मदतीने अंतराळयानाचा वेग कमी करण्यात आला. मंगळाच्या वातावरणातील प्रवेश ते त्याचे अवतरण या काळात अंतराळयानाला खूप धोक्यांना तोंड द्यावे लागते. तो हा सात मिनिटांचा काळ असतो.
प्रश्न- क्युरिऑसिटी रोव्हर मोहीम व इतर मंगळ मोहिमा यात नेमका काय फरक होता?
उत्तर- एकतर पूर्वी अंतराळयान उतरवण्यासाठी एअर बॅग्ज वापरल्या जात असत. नंतर स्पीरिट व अ‍ॅपॉरच्युनिटी या रोव्हरसाठी पॅराशूट वापरले होते, पण ते लहान होते. आताची रोव्हर वजनाने अधिक असल्याने मोठे पॅराशूट वापरले होते. त्यामुळे जड रोव्हर  हव्या त्या ठिकाणी उतरवणे हा वेगळा अनुभव होता. यावेळी मंगळावतरणासाठी निवडलेली गेल विवराची जागाही अतिशय वेगळी होती. वैज्ञानिकदृष्टय़ा तिचे वेगळे महत्त्व आहे. पूर्वीच्या मोहिमांमध्ये पाणी शोधण्यावर भर होता. आताच्या मोहिमेत कार्बनी रेणू शोधणे हा प्रमुख हेतू आहे. हे कार्बनी रेणू जीवसृष्टीचा मूलाधार असतात. त्यांचे अस्तित्व हे जीवसृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे ठरेल.
प्रश्न- गेल विवराचे स्थानमाहात्म्य नेमके काय आहे ?
उत्तर- मंगळाच्या दक्षिण गोलार्धात असलेले हे विवर आहे व त्यात एक मोठा पर्वत आहे. तो खडकांची रचना होते त्या सेडिमेंटरी प्रक्रियेने बनलेला आहे. पूर्वी असलेल्या पाण्याचा ही प्रक्रिया मूलाधार मानली जाते. जिथे पूर्वी अस्तित्वात असलेल्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपातील जीवसृष्टीचे पुरावे सापडतील, असा वैज्ञानिकांना विश्वास वाटतो ते हे ठिकाण आहे. गेल्या लाखो वर्षांतील मंगळावरच्या सर्व घडामोडींचे पुरावे तिथे आहेत.
प्रश्न- मंगळावर कार्बनचे प्रमाण जास्त आहे, तरीही तो वसाहतयोग्य का मानला जातो?
उत्तर- मंगळावर कार्बनचे प्रमाण जास्त आहे हे खरे आहे, पण त्याचबरोबर मंगळ हा एकेकाळी उबदार व ओलसर ग्रह होता त्यामुळे तेथील स्थिती ही जीवसृष्टीस अनुकूल होती.  त्यामुळे आमच्या आशा त्याच्यावर केंद्रित आहेत.
प्रश्न- मंगळावर क्युरिऑसिटी ही रोव्हर उतरताना शेवटच्या दोन मिनिटात त्यावरील कॅमेऱ्यांनी अनेक छायाचित्रे टिपली आहेत. त्यात मंगळावरील पाण्याचे काही पुरावे दिसले का?
उत्तर- मंगळाची छायाचित्रे टिपली आहेत, पण त्यांचा वैज्ञानिक अभ्यास नासाने अजून सुरू केलेला नाही. त्यामुळे त्याविषयी आताच काही सांगता येणार नाही. परंतु मंगळावरच्या पाण्याबाबत सांगायचे तर ‘ फिनिक्स लँडर’ या अगोदर पाठवण्यात आलेल्या अंतराळयानाच्या पायांना (चाके) उतरत असतानाच बर्फ चिकटले होते. नंतर जेव्हा ते मंगळावर उतरले तेव्हा हे बर्फ वितळले. त्यामुळे त्यावर पाण्याचे थेंब दिसले आहेत.
प्रश्न- विश्वात आणखी एखाद्या ग्रहावर प्रगत जीवसृष्टी आहे की नाही, याबाबत सर्वानाच कुतूहल असते. तर तुम्हाला परग्रहवासीय खरोखर असतील असे वाटते काय?
उत्तर- शक्याशक्यतेचा विचार करायचा तर विश्वात पृथ्वीवरील जीवसृष्टी एकमेव आहे, असे म्हणता येणार नाही. तर्कसंगत विचार करायचा तर विश्वात इतरही असे ग्रह आहेत, जे पृथ्वीवर ज्या प्रक्रियांमुळे जीवसृष्टीचा उदय झाला तशा प्रक्रिया घडल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती किती प्रगत असेल हे सांगता येणार नाही.
प्रश्न- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तसेच नासा प्रशासनाने २०३० पर्यंत मंगळावर माणूस पाठवण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्याबाबत काय वाटते ?
उत्तर- मंगळावर माणूस पाठवणे शक्य आहे, पण त्यात अनेक आव्हाने आहेत. कारण रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे आणि माणसाला तेथे उतरवणे यात फरक आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून अशा योजना साकार होऊ शकतात.
प्रश्न- सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थाही मंगळ मोहिमेची तयारी करीत आहे. त्याबाबत तुम्हाला काय वाटते?
उत्तर- चांगलेच आहे. आपण यात एकत्रितरीत्या काम करू शकतो. पुढील मोहिमा या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आधारावरच होतील.
प्रश्न- तुम्ही भारतीय वंशाच्या तरुण महिला वैज्ञानिक म्हणून भारतातील तरुण पिढीला काय सांगाल?
उत्तर- मला सांगावेसे वाटते की, खूप मेहनतीने अभ्यास करा. विज्ञान व तंत्रज्ञानात करिअर करा. विशेषत: तरुण मुलींनी यात पुढे यावे. एरोस्पेस अभियांत्रिकीच्या क्षेत्रात महिला जास्त संख्येने आल्या पाहिजेत. त्याची गरज आहे.
प्रश्न- तुम्ही अनेक अंतराळ प्रकल्पांवर सध्या काम करीत आहात. या व्यस्त दिनक्रमात जो मोकळा वेळ मिळतो त्यात कुठले छंद जोपासता?
उत्तर- मला मोटारसायकलवरून फिरायला आवडते. स्कूबा डायव्हिंग, प्रवास, हायकिंग याचीही आवड आहे. त्यामुळे मन अधिक ताजेतवाने होते व पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.
प्रश्न- तुम्ही भारतीय वंशाच्या आहात. कधी भारतात येण्याचा विचार आहे का?
उत्तर- हो! कदाचित पुढील वर्षी सुटीच्या काळात मी भारताला भेट देईन.