मन ‘रसा’यन.. Print

 

दिनेश गुणे - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राजकारण, साहित्य, नाटक आणि ‘हवापाण्याच्या गप्पा’ हे मानवी मनाचे खतपाणी आहे. मराठी मन तर त्यावरच पोसलेले असते. अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं, की भ्रष्टाचाराच्या बजबजाटाने कावलेले मराठी मन, आता काहीतरी घडणारच, या आशेने उसळ्या घेऊ लागते आणि आता सरकारचे काही खरे नाही, अशा फुशारक्याही मनामनात सुरू होऊ लागतात.

मंत्रालयाला आग ‘लागली’ की ‘लावली’, असा एखादा प्रश्न, उत्तर नाही हे माहीत असूनही मनाच्या एखाद्या कोपऱ्याला अकारण घट्ट चिकटून बसतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील भांडणांनी ते विनाकारण बेचैन होते, तर उद्धव ठाकरेंना राज ठाकरेनी स्वत: हॉस्पिटलातून घरी नेल्यानंतर कधीपासून जपलेलं एक स्वप्न साकारणार या वेडगळ आशेनं सुखावतं.. शरद पवारांच्या बंडानंतर त्याचे लक्ष दिल्लीतल्या राजकारणावर लागते आणि त्यांनी सपशेल माघार घेतल्याच्या बातम्या येताच, त्यांच्या नेहमीच अनाकलनीय अशा राजकारणाचे विश्लेषणही सुरू करते. दिवसभर ऑफिसात खर्डेघाशी करून संध्याकाळी सेकंड क्लासच्या खचाखच गर्दीतून आणि नंतर बसच्या रांगेत ताटकळून घामाच्या धारा गाळत घरी पोहोचल्यानंतर चहा-पोहे खाऊन ताजातवाना झालेला मराठी माणूस चाळीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांशी गप्पा मारताना सरकारचे काय चुकले आणि काय करायला हवे होते, यावर तावातावाने वाद घालतो आणि रात्री ‘साडेनऊच्या बातम्या’ पाहून झाल्यावर एखादे पुस्तक, कथा-कादंबरी चाळत झोपी जातो. त्याचा दुसरा, तिसरा आणि प्रत्येक दिवस असाच असतो. तरीही प्रत्येक दिवसाला नवलाई असते. कारण सकाळचे वर्तमानपत्र! तो त्याच्या दिवसाच्या सुरुवातीचा अविभाज्य भाग असतो. सकाळच्या चहासोबत वर्तमानपत्र चाळताना एखाद्या बातमीने तो अस्वस्थ होतो, तर एखाद्या बातमीने त्या दिवसाच्या नवलाईत भर पडल्याचा आनंदही त्याला मिळतो. ‘आज कुठे काय’, हे तो न चुकता पाहतो आणि एखाद्या दिवशी वेळ काढून तेथे हजेरीही लावतो. अशा दिनक्रमातच, आपल्या व्यक्तिमत्त्वाची धार कायम ठेवण्याची नकळत सुरू असलेली ही धडपड त्याला स्वत:लादेखील जाणवत नसते. कारण, एक तर ती अत्यंत नैसर्गिक असते आणि त्याच्या दैनंदिनीचाच एक भाग झालेली असते. अशाच धकाधकीत, एखाद्या शनिवार-रविवारी तो सहकुटुंब एखादं नाटक-सिनेमा पाहतो आणि कधी कधी तेथेही बसणाऱ्या एखाद्या सांस्कृतिक धक्क्याने अस्वस्थ होऊन घरी परततो. ‘जग बदललंय’, ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ आणि ‘भविष्यात कसं होणार’, हे त्याचे ‘त्रिकाळचिंते’चे विषय असतात. अशाच चिंतेने पोखरलेली असंख्य मने अवतीभवतीही असतात. त्यांचे एकमत होते आणि चिंतेच्या सामुदायिक सुरातून कधी कधी असंतोषाचा हुंकारही उमटतो. अशाच वातावरणात कुणीतरी अस्मितेवर फुंकर घालतो आणि अस्वस्थ मनांवरील मरगळीची राख झटकली जाते. धुमसणारी ही मने मग रस्त्यावर येतात आणि आंदोलनांना धार चढते. ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’, असा निर्धार व्यक्त करणारे हात मुठी वळून उंचावले जातात आणि कधी कधी जीत होते. मग मराठी मन पुन्हा त्या विजयाच्या आनंदाने बहरून जाते. मरगळ दूर होते आणि वर्तमानाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे मनोबलही उंचावते..
म्हणूनच, मराठी मन हे एक ‘रसा’यन आहे. एखाद्या क्षणाची गरज ओळखून ते स्वत:ला पुरेपूरपणे त्या क्षणाच्या स्वाधीन करतं. सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींनी या मनाची मशागत केली. आजचा मराठी तरुण ‘जंकफूड’ साहित्यात गुरफटलाय, संगणकाच्या चौकटीतच तो गरागरा फिरतोय आणि टीव्हीसारख्या माध्यमांचा केवळ विरंगुळ्यापुरताच वापर करतोय, असे चिंतेचे असंख्य सूर वडील पिढीत उमटत असले, तरी याच तरुणांची शक्ती चळवळींना बळ देताना दिसते. आंदोलनाचे वारे वाहू लागताच, हाच तरुण रस्त्यावर उतरतो. साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींना वर्षांनुवर्षांच्या पठडीबाजपणामुळे तोचतोपणा आलेला असतानाही, उत्साहाने साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतो आणि त्यातील सहभागासाठी स्वत:ची जागा निर्माण करण्याकरताही धडपडतो. त्यातून एक स्वतंत्र, समांतर चळवळही उभी करतो. तरुणांच्या अशा वागण्याने बुजुर्गाचा वर्ग कधीतरी बुचकळून जातो आणि काहीतरी नवे, सकारात्मक घडत असल्याचे दिसू लागले, की बुजुर्गाच्या मनातील चिंतेचे ढग तात्पुरते दूर होतात. सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रांत हे प्रकर्षांने दिसू लागते. जे चाललंय ते संस्कृतीला पोषकच ठरते, हे बुजुर्गानाही पटू लागते.
राजकारण आणि साहित्य-संस्कृती हा मराठी मनाचा विरंगुळा नव्हे, तर हळवा कोपरा असतो. त्यातही, साहित्यावरील त्याचे प्रेम तर ओसंडणारे असते. म्हणूनच, राज्यातल्या लहानात लहान गावातही एखादे ग्रंथालय दिसते. नव्या-जुन्या पुस्तकांची देवाणघेवाणच नव्हे, तर त्यावर व्यक्त होणारे तरुणही दिसतात. नवे काय वाचले, नवे काय पाहिले आणि नवे काय अनुभवले, याची देवाणघेवाण करणारे असंख्य कप्पे संगणकाच्या मराठी खिडक्यांमध्ये डोकावले की सहजपणे दिसतात. संगणकाच्या विश्वजालात तरुण मराठी मनाचे ‘व्यक्तपण’ आता ठळकपणे उमटू लागले आहे. संगणकीय जाळ्यातील संकेतस्थळांवर मराठीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. मराठी ‘ब्लॉगविश्व’ बहरू लागले आहे आणि ‘ई-साहित्य’सृष्टी आकाराला येऊ लागली आहे. ब्लॉगवरील लेखनाला साहित्याचा दर्जा मिळेल आणि साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर ब्लॉगलेखकांचा कप्पा असेल, असे स्वप्न आता ‘ई-साहित्यकारां’ना पडू लागले आहे.
साहित्य संमेलन हा मराठी साहित्यसृष्टीचा एक वार्षिक सोहळा असतो. साहित्यिकांच्या वर्तुळात वादाच्या ठिणग्या पडू लागल्या, एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू झाली, की साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागल्याची जाणीव साहित्यिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या मराठी मनाला होऊ लागते आणि साऱ्या नजरा या सोहळ्याकडे लागतात. मराठी मन राजकारणात जितका रस घेते, तितकाच रस मराठी साहित्य संमेलनाच्या राजकारणातही त्याला वाटतो. निवडणुका म्हटले की उखाळ्यापाखाळ्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार हे ठरलेलेच असते आणि लोकशाहीत निवडणुकीला पर्याय नाही, हे साहित्यिकांनाही ठामपणे वाटत असल्याने, साहित्य संमेलनांच्या निवडणुकीतही हे सगळे अनुभवायला मिळणारच असते. जिथे हे सगळे असणार, तिथे मराठी मनाचे रसाळपण अधिक बहरणार, हे स्वाभाविकही असते. साहित्य संमेलनाचा सोहळा निवडणुकांनीच सुरू झाला पाहिजे यासाठी मराठी साहित्यविश्व जेवढे अटीतटीचे आग्रही असते, तेवढाच आग्रह रसिकांचाही असतो. राजकारण आणि साहित्य संमेलनांचे हे साम्यस्थळ एवढय़ापुरतेच मर्यादित नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे राजकीय पक्ष संख्येने जेवढे कमी, तेवढी राजकीय महत्त्वाकांक्षांची उसळी लहान, हे गणित भल्या भल्या राजकारण्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांनाही उमगलेले असते. काँग्रेस फुटली, शिवसेनेची शकले झाली, भाजपला बंडखोरीने ग्रासले, जनता दलात उमेदवारांचा शोध सुरू अशा बातम्या येऊ लागल्या, की राजकीय महत्त्वाकांक्षांना आशेचे धुमारे फुटू लागतात. किंबहुना, राजकीय पक्षांची संख्या वाढावी म्हणजे आपल्याही उमेदवारीची सोय होईल अशा अपेक्षेने अनेक राजकारणी पाण्यात देव घालून बसलेले असतात. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत या महत्त्वाकांक्षांना मर्यादा पडतात, कारण एकच साहित्य संमेलन आणि त्याची निवडणूक घेणारे एकच महामंडळ! कवितांच्या हिंदोळ्यांवर झुलणारी, लालित्याचे पंख लावून साहित्यविश्वात विहरणारी, कथा-कादंबऱ्यांच्या जगात रमणारी, समीक्षणाच्या शब्दबंबाळात गुरफटून घेणारी, विद्रोहाच्या आगीत धगधगणारी, उपेक्षेच्या भावनेत जळणारी, गावकुसाबाहेरच्या वेदना सोसणारी आणि असंख्य कारणांनी रिंगणाबाहेर राहणारी मने आपापली ‘स्पेस’ शोधू लागतात आणि राजकारणात उदंडपणे अवतरणाऱ्या राजकीय पक्षांसारखीच स्थिती साहित्यविश्वातही दिसू लागते, हे ते साम्यस्थळ!
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंतच्या निवडणुकांचा राजकीय सोहळा पार पडला आणि उदंड राजकीय पक्ष जन्माला आले. राज्य निवडणूक आयोगाच्या यादीत राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरांवरील तब्बल पावणेतीनशे पक्षांची नोंद आहे. यात इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, तशीच आझाद हिंदू काँग्रेस पार्टीही आहे, भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता विकास आघाडीही आहे. बहुजन समाज पार्टी आहे आणि नेटिव्ह पीपल्स पार्टीही आहे. राजकारणाच्या पटलावर जसे पक्षांचे पीक आहे, तसेच पीक साहित्य क्षेत्रातील संमेलनांच्या सोहळ्यातही दिसते. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मराठी साहित्य संमेलने संपन्न झाल्यामुळे, राजकारणातील नेते-कार्यकर्त्यांप्रमाणेच, सरस्वतीपुत्रांनाही आपापली जागा निर्माण करण्याची पुरेपूर संधी उपलब्ध झाली आहे. येथे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे, युरोपीय मराठी साहित्य संमेलन आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनही आहे. संभाजीराजांपासून फुले-आंबेडकरांपर्यंत आणि तुकोबारायांपासून आचार्य अत्रे-अण्णाभाऊ साठेंपर्यंत, ‘विद्रोहीं’पासून ‘उपेक्षितां’पर्यंत आणि ‘लोकजागर’पासून ‘समरसता संमेलना’पर्यंत असंख्य व्यासपीठांवर शेवटी साहित्यसेवाच केली गेली आहे. अंध-अपंग साहित्य संमेलने, बालकुमार साहित्य संमेलने आहेत आणि शिक्षक व कामगार साहित्य संमेलनही आहे. दलित, मुस्लीम, ख्रिस्ती, आदिवासी, गुराखी, अहिराणी, मराठवाडी, कोकणी, वैदर्भीय, वऱ्हाडी अशी जवळपास दीडशे संमेलने यापूर्वी कधी ना कधी झाली आहेत. समांतर साहित्य संमेलने आहेत आणि संमेलनपूर्व संमेलनेही आहेत. प्रत्येक संमेलन म्हणजे, आपापली ‘स्पेस’ शोधण्याचा, स्थापन करण्याचा आणि टिकविण्याचा एक प्रयत्न असतो, पण शेवटी मराठी साहित्यशारदेची सेवा हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट असते. प्रतिभेचा रसिकतेने आस्वाद घेण्याची मराठी मनाची घडण आहे. या संमेलनांना उदंड प्रतिसाद मिळतो तो त्यामुळेच. काहीही झाले, तरी मराठी मनाचे हे ‘रसा’यन बरसतच राहणार!