महाप्रस्थान! Print

 

डॉ. जनार्दन वाघमारे
रविवार, १९ ऑगस्ट २०१२

लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेला एक विलोभनीय लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या जाण्याने सबंध महाराष्ट्र हळहळला. लाखो शोकाकुल लोकांनी लातूरकडे धाव घेतली. साश्रूनयनांनी त्यांनी आपल्या नेत्याला शेवटचा निरोप दिला. शोकसागरात बुडालेला लोकसागर बाभळगाव येथे महाराष्ट्राने पाहिला. विलासराव देशमुख एवढय़ा तडकाफडकी जातील असे कुणालाही वाटले नव्हते. पण त्यांचा आजार दुर्धर होता. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.

त्यांना यश यावे म्हणून लातूरच्या नागरिकांनी सर्वधर्मीय प्रार्थना केल्या. त्यांनी यज्ञयाग केले. आपले व्यवहार बंद ठेवले, पण नियतीच्या पुढे कुणाचेही काही चालले नाही.
मराठवाडय़ाच्या इतिहासात एवढा लोकप्रिय नेता यापूर्वी झाला नाही. विलासरावांचे नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व लोकविलक्षण होते. लोकांची सुखदु:खे ओळखणारा आणि त्यांच्या आशा-अपेक्षा-आकांक्षांशी एकरूप झालेला हा लोकनायक होता. विलासरावांनी लोकांच्या नाडीवर बोट ठेवून आयुष्यभर राजकारण केले. त्यांची विनोदप्रचूर भाषणे ऐकण्यासाठी लोक आतूर असत. ते शब्दप्रभू होते. शब्दसामर्थ्यांवर त्यांची निष्ठा होती. वक्तृत्व ही त्यांना प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी होती. त्यात उत्स्फूर्तता, कल्पकता आणि नवनवोन्मिषता असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अजब रसायन होते. त्यांच्या लोकप्रियतेत वक्तृत्वाचा सिंहाचा वाटा होता.
एखाद्या नेत्याच्या यशापयशाची बीजे त्याच्या स्वभावात व मानसिकतेत दडलेली असतात. त्याच्या बोलण्या-चालण्याच्या व वागण्याच्या माध्यमातून ती बीजे अंकुरतात. प्रयत्न केला तर ती पल्लवित व पुष्पित होतात. त्यांच्या बाजूला कळत न कळत तणही माजते. ते काढून टाकण्याची दक्षता घ्यावी लागते. विलासरावजींच्या स्वभावात कर्तृत्वाची बीजे होती. त्यात सुसंस्कृतता, मैत्रभाव, सौंदर्यासक्ती, उपक्रमशीलता, धैर्य, विकासाची ओढ, लोकसंग्रहाची आस, भविष्यलक्ष्यी आशावाद, व्यवहारचातुर्य, गुणग्राहकता, मुत्सद्दीपणा, औदार्य, विधायकता इ. गुण होते. त्या गुणांना रंग-रूप-सुगंध देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या गुणांमुळेच त्यांना यश आणि कीर्ती मिळत गेली.
खरेतर या गुणांच्या आधारावरच त्यांनी जवळपास चाळीस वर्षांचा यशस्वी राजकीय प्रवास केला. बाभळगावच्या सरपंचपदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि नंतर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत ते पोहोचले. त्या प्रवासात खाच-खळगे होते, चढ-उतार होते आणि धोक्याची वळणेही होती, पण त्यांवर त्यांनी मात केली. त्यांच्या बहुआयामी, सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा ठसा प्रत्येक ठिकाणी त्यांनी उमटवला. त्यांच्या अनुभवाच्या कक्षा चौफेर विस्तारल्या. त्यांना संधी मिळत गेली आणि त्या संधीचा त्यांनी उपयोग केला. त्यांनी राज्यात व केंद्रात विविध खाती सांभाळली. अंगी प्रशासन-कौशल्य असल्यामुळे प्रत्येक खात्याचा त्यांनी विकासासाठी उपयोग करून घेतला.
विलासरावजींचे राजकारण लोकाभिमुख होते. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप विविध क्षेत्रांवर पडली. सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा इ. क्षेत्रांच्या विकासाला त्यांनी चालना दिली. त्यांनी काढलेला मांजरा सहकारी साखर कारखाना सबंध देशात आदर्श ठरला. तो कधी आजारी पडला नाही. सर्दी-पडशानेदेखील कधी त्याला बेजार केले नाही. शेतकऱ्यांच्या उसाला त्याने नेहमीच चांगला भाव दिला. बब्रुवान काळे यांचे परिश्रम, दिलीपराव देशमुखांचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन आणि विलासरावांचे मार्गदर्शन त्याला लाभले. हा कारखाना शेतकऱ्यांच्या जीवनात कल्पतरू ठरला. लातूरची जिल्हा सहकारी बँकही त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चालली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हा सहकारी बँका दिवाळखोरीत सापडल्या; पण लातूरची जिल्हा सहकारी बँक व्यवस्थित चालली. लातूरची कृषी बाजार समितीही बऱ्यापैकी काम करत आहे. राखणदारांवर पुष्कळ अवलंबून असते. लातूर नगर परिषदेला मात्र चांगले राखणदार मिळू शकले नाहीत. विलासरावजींच्या मार्गदर्शनाचा तिला लाभ घेता आला नाही. त्यांनी पैसा कमी पडू दिला नाही, पण त्याचा पूर्ण फायदा घेता आला नाही.
१९८२ साली लातूर जिल्हा अस्तित्वात आला. या नवीन जिल्ह्य़ाच्या विकासासाठी जे जे करणे शक्य होते, ते ते त्यांनी केले. अनेक देखण्या इमारती लातूरमध्ये उभ्या राहिल्या. चांगले कर्तबगार अधिकारी त्यांनी लातूरला आणले. लातूरमध्ये व्यापार-उद्यम वाढला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.
अलीकडे लातूर शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनलेले आहे. मी राजर्षी शाहू महाविद्यालयाचा प्राचार्य असताना माझ्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून एक नवा शैक्षणिक पॅटर्न उत्क्रांत झाला. विलासरावजींनी ‘लातूर पॅटर्न’ असे त्याचे नाव दिले. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. लातूरला त्यांनी स्वत:ची दोन-तीन महाविद्यालये काढली. त्यापैकी आयुर्वेदिक महाविद्यालयाचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी काढलेले अपंगांसाठीचे विद्यालय हे त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रतीक आहे. जे जे नवे, ते ते लातूरला हवे, हा त्यांचा हव्यास होता.
लातूरच्या नागरिकांनी थेट निवडणुकीच्या माध्यमातून मला नगराध्यक्षपदावर बसविले. खरे तर मलाही लातूरचा विकासच हवा होता. बरीच खळखळ झाली. विरोधही झाला, पण विलासरावजींनी मला सहकार्य केले. विकासाच्या कार्यात ते आडवे आले नाहीत. स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न होता.
महाराष्ट्र राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू व्हावे म्हणून सर्वच मुख्यमंत्र्यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. विलासराव देशमुखांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दोनदा मिळाले. त्या पदावर ते आठ वर्षे राहिले. आघाडी सरकार चालवण्यासाठी त्यांना सतत कसरत करावी लागली. लोकशाहीत राज्याचे नेतृत्व करणे ही गोष्ट सोपी नाही. कारण अनेक महत्त्वाकांक्षी स्पर्धकांना तोंड द्यावे लागते. ती स्पर्धा जो जिंकेल त्याच्याच गळ्यात नेतृत्वाची माळ पडते. त्यासाठी संघर्ष, युक्त्या-प्रयुक्त्या आणि नको त्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. विलासरावांना या स्पर्धेत यश आले.
त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना दोन मोठय़ा संकटांना तोंड द्यावे लागले. मुंबईवर आलेले अतिवृष्टीचे संकट आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला. दुसऱ्या घटनेने त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर वज्राघात केला. नशीब सिकंदर म्हणून केंद्रात त्यांना स्थान मिळाले.
आपल्या जगण्यावर आणि आयुष्यावर शतदा प्रेम करणारा हा नेता होता. जीवनातले सर्व श्रेयस् आणि प्रेयस् त्यांना हवे होते. वैभवशाली जीवन ते जगले. त्यांची रसिकता सर्वश्रुत होती. लोकांना आधार देणारा हा नेता होता. लोकांच्या हाकेला ‘ओ’ देणाऱ्या नेत्याच्या हाकेलाही लोक ‘ओ’ देतात. सत्तास्थानावर दीर्घकाळ राहिलेल्या नेत्यांमध्ये औधत्य निर्माण होते. सत्ता अहंकार वाढवीत असते, पण विलासरावांनी नम्रता सोडली नाही आणि आपल्या चेहऱ्यावरचे हास्य मावळू दिले नाही. याचा अर्थ ते अजातशत्रू होते असा नाही. राजकारणात कोणीही अजातशत्रू असू शकत नाही. पण ते आपल्या विरोधकांनादेखील जवळ आणण्याचा प्रयत्न करीत. त्यांचा आशावाद लोकांना उभारी देणारा होता. विलासरावांची नजर काळ्याकुट्ट ढगांमध्येही रूपेरी कडा शोधणारी होती.
राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे यशवंतराव चव्हाण म्हणत. विलासराव ‘नाही’ म्हणायला शिकले नव्हते. त्यांचा स्वभाव भिडस्त होता. त्याचा गैरफायदा अनेकांनी घेतला. राजकारणासाठी अखंड सावधानता हवी. अलीकडे त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये गोवले गेले होते. कोर्टाचे ताशेरे आणि माध्यमांनी त्याला दिलेली प्रमाणाबाहेरची प्रसिद्धी दु:खदायी होती. त्यांनी ती मूकपणे सहन केली. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. त्यातच असाध्य रोगाला त्यांना सामोरे जावे लागले. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही डॉक्टरांना यश आले नाही. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे, मराठवाडा व महाराष्ट्राचे आणि शेवटी देशाचे नुकसान झाले. सामान्य लोकांचा तर आधारच तुटला.
विलासराव देशमुखांचे सबंध राजकीय जीवन नाटय़मय होते. ज्या नाटय़ाचा शेवट दु:खात होतो त्याला ‘शोकनाटय़’ म्हणतात. शोकनाटय़  हे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात हळहळ निर्माण करते. ते चिरकाल स्मरणात राहते. करिश्मा असलेल्या या नेत्याचे महाप्रस्थान चटका लावून गेले. त्यांनी आपल्या मागे सोडलेल्या पाऊलखुणा राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील, असे मला वाटते.