खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम! Print

 

रविवार, १९ ऑगस्ट २०१२

सरपंच ते केंद्रीय मंत्री या दीर्घ राजकीय प्रवासात विलासरावांनी अनेक चढ-उतार अनुभवले. पण त्यांची वृत्ती ‘  खुशी मिले या गम..’ अशीच राहिली. शालेय शिक्षण आणि पशुसंवर्धन ही दोन खाती सांभाळताना आपण ‘पोराबाळांचे आणि गुराढोरांचे’ मंत्री आहोत हे मिश्कीलपणे सांगणारे किंवा शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या उद्योगांमुळेच बहुधा आपल्याला उद्योग हे खाते दिले असावे, अशी कबुली देणाऱ्या विलासरावांच्या कारकीर्दीतील हे काही किस्से..


*  १९८० साली विलासराव विधानसभेत निवडून आले. मित्रांना सोबत घेऊन जेव्हा आमदार निवासात गेले तेव्हा लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भुतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले. विलासराव विष्णू भुतडा यांना म्हणाले, ‘मी आमदार असलो काय किंवा तुम्ही असला काय. फरक काय पडतो. चला.’  आमदार निवासात मुक्काम झाला, चहा-कॉफी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रूमबॉयने विष्णू भुतडांनाच सॅल्युट ठोकला व बिल समोर केले. तेव्हा विष्णू भुतडा म्हणाले, ‘विलासराव आता खादीचे कपडे शिवा. ही नकली आमदारकी मला परवडणारी नाही’ तेव्हा विलासरावांनी त्यांना हसत दाद दिली.
*  आमदार असताना मुंबईहून लातूरला येताना जेवण कुठे घ्यायचे, चहा कुठे घ्यायचा व कुणी किती पसे खर्च करायचे, असे विलासराव सहकाऱ्यांना सांगत. एकदा हाजीअली येथे सीताफळाचा ज्यूस पिऊ व ते पसे अ‍ॅड्. ब्याळे देतील असे त्यांनी सांगितले. ज्यूसचे बिल     २५० रुपये झाले व गाडीत बसल्यानंतर ब्याळेंचे बोलणेच बंद झाले. तेव्हा विलासराव म्हणाले, ‘ब्याळेसाहेब, ज्यूसचे पसे हवे  तर मी देतो.  मात्र हसत खेळत आपण प्रवास करू’ तेव्हा पसे न घेताच ब्याळेंना हसण्यावाचून पर्याय नव्हता.
*  बाबासाहेब भोसले यांच्या काळात विलासराव मंत्री होते. भोसलेंचे मुख्यमंत्रीपद गेले  त्या दिवशी विलासराव त्यांना भेटायला गेले. गप्पा मारताना विलासराव आपले मंत्रिमंडळ कसे चांगले होते याबद्दल भोसलेंना सांगत होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ‘मला मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटले नव्हते. त्यामुळे त्याचा फारसा आनंद नव्हता आणि आता गेल्यामुळेही फारसे दुख होत नाही. मेलेली म्हैस किती दूध देत होती? हे सांगून काय उपयोग आहे विलासराव,’ असे बाबासाहेब म्हणाले तेव्हा विलासरावांना काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते.
*   विलासरावांच्या जीवनात १९९५ साली झालेल्या निवडणुकीतील पराभव हा एक मोठा स्पीडब्रेकर होता. स्पीडब्रेकर उभे करण्यात खटाटोप केलेले  बळवंत जाधव हे प. अदनानखाँ कायमखानी, मोहन माने यांच्यासमवेत निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी विलासरावांना भेटायला गेले. विलासरावांनी मात्र सर्वाचे हसतमुख स्वागत केले. कॉफी पाजली व विलासराव म्हणाले, ‘बळवंतराव, उधारीचा पलवान आणून निवडणूक लढविली. निवडणुकीत तुम्ही समोर पाहिजे होतात’ व अदनानखाँ यांच्याकडे बघून ते म्हणाले, ‘आमची माणसं व आमचीच माती अशी तुमची नीती’. विलासरावांचे हे वाक्य ऐकून सगळेजण हसले व ताण एकदम कमी झाला.  
*  शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे महसूलमंत्रीपद देण्यात आले. शिवसेनेतील तडफ काहीशी बाजूला ठेवून राणे यांनाही काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे कारभार करण्यास सुरुवात केली.  कालांतराने राणे यांच्यातील मूळ शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी सरकारची निर्णय प्रक्रियाच खोळंबली आहे, सरकार अस्तित्वात आहे की नाही हेच कळत नाही, अशी टीका करण्यास सुरुवात केली.  नंतर विलासरावांची मुख्यमंत्रीपदावरून गच्छन्ती झाली आणि त्यांना केंद्रात अवजड उद्योगमंत्री करण्यात आले. इकडे राणे यांनाही नाइलाजास्तव पक्षश्रेष्ठींनी दिलेले उद्योगमंत्रीपद स्वीकारण्यापासून पर्याय उरला नाही. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून स्थिरस्थावर झाल्यानंतर मुंबई भेटीवर आले असता एका पत्रकार परिषदेत विलासरावांना पत्रकारांनी प्रश्न केलाच, त्या प्रश्नाचा रोख अर्थातच नारायण राणे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातील होता. पण विलासरावही वस्ताद. राणे यांचा नामोल्लेख टाळून विलासराव म्हणाले अहो, त्यांच्याकडे केवळ उद्योग आणि आपल्याकडे अवजड उद्योग! विलासरावांचे हे वक्तव्य संपण्याच्या आतच त्या पत्रकार परिषदेत हास्यस्फोट झाला होता.
*  एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला मनोहर जोशी, नितीन गडकरी आणि विलासराव देशमुख उपस्थित राहणार हे कळताच माध्यमांना काहीतरी चटपटीत मिळणारच हे ओघानेच आले. त्यामुळेच त्या कार्यक्रमाला साहजिकच प्रचंड गर्दी झालेली. गर्दी पाहिली की विलासराव अधिक खूश होतात आणि अधिक खुलतात हा अनुभव आणि झालेही अगदी तसेच.  प्रेक्षकांची आणि माध्यमांची नाडी ओळखण्यात विलासरावही वाकबगार. ते फलंदाजीला  म्हणजेच भाषणाला उभे राहिले. शालेय शिक्षण खातेही विलासरावांनी अत्यंत उत्तमपणे सांभाळले होते. त्यामुळेच बहुधा त्यांनी शाळेतील शिकवणीचे उदाहरण दिले असावे. लहानपणी शाळेत मास्तरांनी दिलेली शिकवण आपल्याला राजकारणातही कशी उपयोगी पडली ते सांगताना विलासराव म्हणाले की, रस्ता ओलांडताना प्रथम डाव्या बाजूला पाहायचे, त्यानंतर उजव्या बाजूला पाहावयाचे; आणि अपघात होणार नाही याची खात्री करूनच रस्ता ओलांडावयाचा. हेच तत्त्व आपण आघाडीचे सरकार चालविताना अवलंबिले. आधी डावे काय म्हणतात ते (नुसते) ऐकायचे. मग (गडकरींकडे कटाक्ष टाकून) उजव्यांकडे बघायचे. त्यानंतर शांतपणे रस्ता ओलांडायचा..  त्यानंतर कार्यक्रम ज्या सभागृहात होता तेथे काय झाले असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी.
*   एकदा लातूरहून हैदराबादला प्रदीप राठी, गुरुनाथ ब्याळे व आप्पासाहेब हलकुडे विलासरावांसोबत कारमध्ये निघाले. वेळ घालविण्यासाठी म्हणून आप्पासाहेब हलकुडेंना विलासरावांनी गाणे म्हणण्यास सांगितले. हलकुडेंनी ‘दत्ता दिगंबरा’ हे गाणे म्हटले व बऱ्याच जणांच्या सूचनांमुळे दहा-बारा वेळा तेच ते गाणे हलकुडे गाऊ लागले. विलासराव म्हणाले, ‘हलकुडेअप्पांचे गाणे खरे तर रेडिओवर ठेवले पाहिजे.’ विलासरावांची ही प्रतिक्रिया ऐकून हलकुडे म्हणाले, ‘खरेच का हो साहेब मी एवढा चांगला गातो?’  तेव्हा विलासराव म्हणाले, ‘अहो ब्याळे, रेडिओवर गाणे एवढय़ासाठी ठेवायचे की आपल्याला नको वाटले की रेडिओ बंद करता येतो.’ विलासरावांची ही प्रतिक्रिया ऐकून गाडीतील सगळेच मित्र हास्यकल्लोळात बुडाले.
*  विलासराव देशमुख हे काही मोजक्या नेत्यांपैकी होते की जे कायम भ्रमणध्वनीवर येणारा प्रत्येक फोन घ्यायचे. त्यांचा मोबाइल क्रमांक तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना माहीत होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत विलासरावांनी कधीही आपला मोबाइल क्रमांक बदलला नाही. कोणताही फोन उचलल्याने राज्यात काय चालले याची माहिती आपल्याला मिळायची, असा त्यावर विलासरावांचा युक्तिवाद असायचा. मागे एकदा जातीय दंगल पेटली असता युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने विलासरावांना फोन केला आणि पोलीस काहीच कारवाई करीत नाही, असे सांगितले. विलासरावांनी तात्काळ तत्कालीन पोलीस महासंचालक मल्होत्रा यांना दूरध्वनी केला, पण तोपर्यंत पोलीसप्रमुखांनाही दंगल पेटल्याबद्दल काहीच माहीत नव्हते.
*  सरकारमध्ये एकत्र असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीत कायम कुरघोडी चालायची. नव्हे, ती अजूनही चालतेच. २००२च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. विलासरावांनी तेव्हा मुख्यमंत्री म्हणून राज्यभर दौरा केला. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह हे घडय़ाळ. राष्ट्रवादीची टिकटिक १० वाजून १० मिनिटाने बंद झाली आहे. ते पुढेही सरकत नाही. तेव्हा बंद पडलेल्या घडाळ्याला मतदान करणार का, असा सवाल ते सर्वत्र करायचे. विलासरावांनी घडय़ाळावरून केलेली टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारच झोंबली होती.
(संकलन :  प्रदीप नणंदकर / संतोष प्रधान/  केदार दामले)