लोकाभिमुख राजकारणी Print

उल्हास पवार - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

कमालीचा संयम हेच विलासरावांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांच्यामध्ये कटुता किंवा द्वेष याचा लवलेशही नव्हता. ज्यांच्यावर विलासरावांनी उपकार केले अशांपैकी काही जणांनी त्यांच्याशी कृतघ्नपणा केला. पण खासगीतसुद्धा त्यांनी कुणाविषयी कधी प्रतिक्रिया दिल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. त्यांनी आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवला नाही. पण त्यांना गर्व आणि दुरभिमान याचा स्पर्शही झाला नाही. सामान्य कार्यकर्त्यांचा फोन कधीही आला तरी तो उचलणारा हा नेता.

कुणी त्यांना एसएमएस केला तरी त्याला उत्तर देणे हे विलासराव आपले कर्तव्य समजत होते. त्यांचा उमदेपणा, राजिबडे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व, प्रशासनाला दिशा देण्याचे कौशल्य, साहित्य-कला-संस्कृती याविषयीची जाण हे गुण ध्यानात घेतले तर विलासराव देशमुख यांच्याविषयीचे पूर्ण आकलन कुणाला झाले असेल असे वाटत नाही. हे व्यक्तिमत्त्व व्यवस्थित समजून घेतले नसल्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याला त्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही असेच म्हणावे लागेल.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साहित्य-कला-संस्कृती याविषयीची जाण असलेला एकमेव मुख्यमंत्री असेच विलासरावांचे वर्णन करावे लागेल. चित्रपट आणि नाटकाला अनुदान दिले जाते त्या धर्तीवर तमाशालादेखील अनुदान कसे देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उमेदीच्या काळात आपल्या कलेने रसिकांना आनंद देणाऱ्या आणि वयोमानापरत्वे कार्यरत नसलेल्या निराधार कलाकारांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय विलासरावांनी घेतला. ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानामध्ये वाढ केली. कृतज्ञता आणि आपुलकीचा धागा त्यांनी जीवनाच्या अखेपर्यंत जपला. त्यांच्या निधनामुळे आमची चार दशकांची मैत्री अशा पद्धतीने संपुष्टात येईल, अशी कल्पना केली नसताना अखेर ही वाईट बातमी समजली आणि मन विषण्ण झाले. आमच्यातील मैत्रीचा भावबंध त्यांनी जपला. एवढेच नव्हे, तर हा भावबंध वाढतच जाईल याची दक्षता त्यांनी घेतली.

बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात विलासरावांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली, ही बातमी आम्ही आकाशवाणीवरून ऐकली. त्याच वेळी विलासरावांच्या बाभळगावहून ट्रंककॉल आला. फोनवर दादा म्हणजे विलासरावांचे वडील होते. त्यांच्याशी बोलताना विलासरावांना आनंदाने गहिवरून आले. शेवटी फोनवर दादांशी मी बोललो. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मुख्यमंत्रीपदाचा नऊ महिन्यांचा कालावधी आणि युती सरकार सत्तेवर आल्यानंतरचा साडेचार वर्षांचा काळ वगळला तर विलासराव हे कायम सत्तेच्या राजकारणात राहिले. एवढेच नव्हे तर मंत्रीपददेखील भूषविले. राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना दोनदा मिळाली. प्रश्नांचे आकलन करून घेत कितीही अवघड असले तरी जनहिताचे काम कायद्यात कसे बसवायचे हे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते.
मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासरावांनी २००२ मध्ये गुटखाबंदी केली. गुटखाबंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. त्या वेळी गुटखा उत्पादक उच्च न्यायालयात गेले. तेथे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर गुटखा उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ तांत्रिक मुद्दय़ावर न्यायालयाने गुटखाबंदी उठविली. जनहितासाठी घेतलेल्या निर्णयाचे असे झाल्यामुळे विलासरावांना वाईट वाटले होते. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून त्यांनी गरीब आणि उपेक्षितांविषयीची कळवळ असल्याचे सिद्ध केले. तीर्थक्षेत्र विकासासाठी ४७० कोटी रुपयांची तरतूद केली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) २७५ चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे हे त्यांनी कायद्यामध्ये परावर्तित केले. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे, तर अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ ही योजना त्यांनीच सुरू केली.
मुंबई विद्यापीठाला १४० वर्षांत एकही दलित कुलगुरू लाभला नाही. त्याबाबत नावांची चाचपणी सुरू होती तेव्हा डॉ. बाबा आढाव आणि भाई वैद्य यांनी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे नाव माझ्याकडे सुचविले होते. मी हा विषय काहीसा दबकतच विलासरावांशी बोललो होतो. त्या वेळी ‘माझ्याही मनात मुणगेकरांचेच नाव आहे. त्यांचे करिअर आऊटस्टॅंिडग आहे,’ असे विलासराव माझ्याशी बोलताना म्हणाले होते. राज्यपालांशी चर्चा करून विलासरावांनी मुणगेकर यांचीच कुलगुरुपदासाठी शिफारस केली. हीच बाब ध्यानात घेऊन विलासरावांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जाधव यांची परवानगी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. एस. एन. पठाण यांची नियुक्ती करून विलासरावांनी राज्यामध्ये प्रथमच मुस्लीम व्यक्तीचा या पदासाठी विचार केला.
राजकारणातील विलासराव घरामध्ये मुलांशी मोकळेपणाने वागणारे होते. गप्पा आणि हास्य-विनोदात रमणाऱ्या विलासरावांविषयी मुलांमध्ये आदर होता. पण त्यांना वडिलांशी संवाद साधताना कधी भीती वाटलीच नाही. अभिजात शास्त्रीय संगीताला जशी उत्स्फूर्त दाद दिली तशीच विलासरावांनी लावणी आणि उर्दू गजललादेखील दिलखुलास दाद दिली. बाभळगावच्या घरी भजनाचा कार्यक्रम व्हायचा तेव्हा विलासराव तबलावादनाची साथ करायचे. तर त्यांचे बंधू दिलीपराव हार्मोनिअम वाजवायचे. विलासरावांनाही हार्मोनिअम उत्तम वाजवता यायचे. शास्त्रीय संगीतामध्ये परिपूर्ण ज्ञान संपादन करण्याची त्यांची इच्छा होती. पण राजकारणात प्रवेश केल्यामुळे हे राहूनच गेले. मात्र एखाद्या मैफलीत कलाकार समेवर आला की विलासराव त्याला दाद दिल्याशिवाय राहत नसत. उत्तम नाटकाविषयी आत्मीयतेने बोलणारे विलासराव हे कलाकारांच्या अभिनयावर उत्तम चर्चा करायचे.
विलासरावांनी १८ ऑक्टोबर १९९९ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लातूरला गेल्यावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. लातूरकरांनी घरावर गुढय़ा उभारल्या होत्या. रांगोळ्यांच्या पायघडय़ा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. ‘याच लातूरकरांनी पराभवानंतरही माझ्यावर उदंड प्रेम केले, आज मी खरोखरच भारावून गेलो आहे’, असे बोलून झाल्यावर हुंदका आला आणि ते पुढे बोलू शकले नाहीत. दादांचे निधन झाल्यानंतर त्यांनी पहाटे दोन वाजता मला फोन केला होता. त्या वेळी ते हुंदके देऊन रडू लागले. एवढे दोन प्रसंग वगळले तर विलासरावांनी सदैव संकटांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे धैर्य दाखविले. पुण्यात आल्यानंतर वेळ मिळाला की विलासराव माझ्या घरी येऊन आईची आवर्जून भेट घेत असत. आईच्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी हा त्यांचा वीक पॉइंट होता. २६/११ च्या घटनेनंतर २००८ मध्ये विलासरावांचे मुख्यमंत्रीपद गेले. दोनच दिवसांनी माझ्या आईचे निधन झाले. त्याही परिस्थितीत फोन करून ‘मी राजीनामा देतो आहे. आईचे अंतिम दर्शन घ्यायला येतो’, असे त्यांनी मला फोन करून कळविले. राजधानीत घडामोडी होत असताना तुम्ही येऊ नका, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी आता अशोक चव्हाण यांना पाठिंबा द्यायचा असे मी आमदारांना सांगितले असल्याचे विलासरावांनी माझ्याशी बोलताना स्पष्ट केले.
मध्यंतरी नांदेडला गेल्यानंतर विलासरावांनी अशोक चव्हाण यांची घरी जाऊन भेट घेतली. नंतर रात्री मला फोन करून ‘मी योग्य केले की नाही’, असे विचारले. ‘कितीही झाले तरी तो मला भावासारखा आहे. शंकरराव चव्हाण यांनी माझ्यावर प्रेम केले हे मी विसरू शकत नाही’, असे त्यांनी सांगितले. विलासरावांचे सासरे म्हणजे वैशाली वहिनींच्या वडिलांचे निधन झाले त्या दिवशी त्यांना अविश्वासाच्या ठरावाला उत्तर द्यायचे होते. त्यामुळे वहिनी आणि दिलीपराव यांना पुढे पाठवून विलासराव दुसऱ्या दिवशी गेले. कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक असताना भाचीच्या लग्नासाठी विलासरावांना जाता आले नाही. ही बैठक संपल्यावर ते विमानतळावर आले तेव्हा धो-धो पाऊस कोसळत असल्याने ते विमातळावरच अडीच तास बसून होते. आपला मामा येईल ही आशा असलेल्या भाचीला काय वाटले असेल या विचारांनी विलासरावांच्या जीवाची घालमेल झाली होती. या घटनेचा मी साक्षीदार आहे.  
विलासरावांच्या वडिलांचे हिंदूुजा हॉस्पिटल येथे ऑपरेशन झाले. त्यानंतर ‘दादा, दोन दिवस ‘वर्षां’ वर विश्रांती घेऊन मगच गावी जा’, अशी विलासरावांनी त्यांना विनंती केली. दादा कधीच ‘वर्षां ’वर गेले नव्हते. विलासरावांपाठोपाठ वैशाली वहिनींनीदेखील त्यांना घरी येण्याचा आग्रह धरला. त्या वेळी ‘वर्षां हे काय आपले घर आहे का. ‘वर्षां’ म्हणजे सोन्याचा िपजरा’, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. तुम्हाला एवढे वाटत असेल तर, आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्येच राहतो. पण ‘वर्षां’वर येत नाही, असेही त्यांनी विलासरावांना सांगितले. या दोघांनीही मग आपला हट्ट सोडला. वैशाली वहिनींवर त्यांनी मुलीसारखे प्रेम केले. ‘सूनबाई फार गुणाची आहे’, अशा शब्दांत ते त्यांचे कौतुक करायचे.  विलासराव आपल्यामध्ये नाहीत ही कल्पनाच मनाला शिवत नाही. वास्तव स्वीकारणे कठीण आहे. माझा मित्र गेला. आता उरल्यात त्या केवळ आठवणी..