राष्ट्रहित की पक्षनिष्ठा! Print

 

रामचंद्र गुहा  - रविवार, २६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गुजरात येथे २००२मध्ये झालेल्या दंगलींनंतर, राज्यसभेचे तत्कालीन खासदार नानाजी देशमुख यांनी एक आवाहन केले होते. समाजकार्याकडून राजकारणाकडे वळलेल्या नानाजींनी, दंगलग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाने एकत्र यावे, अशी विनंती केली होती. या सांप्रदायिक दंगलींची व्याप्ती लक्षात येताच, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांनी संयुक्तपणे अहमदाबाद येथे जावे आणि धार्मिक सलोख्यास बाधा आणणारे कोणतेही कृत्य सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष खपवून घेणार नाही असे आवाहन करावे, अशी अपेक्षा नानाजींनी व्यक्त केली होती.

प्रत्येक दंगलग्रस्त भागास अटल बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी यांनी एकत्र भेट दिली असती तर दोन्ही कडील विखारी वातावरण निवळण्यास हातभार लागला असता, असे देशमुख यांचे म्हणणे होते.
नानाजी देशमुखांनी निदान याप्रसंगी तरी, ऐतिहासिक घटनांचा-प्रघातांचा विचार जाणीवपूर्वक केला असेल असे वाटत नाही.  नानाजींचे आवाहन हे सामाजिक ऐक्याच्या कळकळीतून उत्स्फूर्तपणे आलेले होते. मात्र अशाच स्वरूपाचे आवाहन करणाऱ्या किमान तीन घटना इतिहासाने पाहिल्या होत्या. ऑगस्ट १९४७मध्ये महात्मा गांधींनी कोलकात्यातील जातीय दंगलींविरोधात आपल्यासह उपोषणास बसण्यासाठी, बंगालचे तत्कालीन पंतप्रधान एच. एस. सुऱ्हावर्दी यांना आमंत्रित केले होते. कोलकात्याच्या उत्तर भागात वसलेल्या बालियाघाट येथील हैदरी मंजीलमध्ये गांधीजी आणि सुऱ्हावर्दी यांनी अनेक दिवस मुक्काम ठेवला होता. प्रायश्चित्ताच्या भावनेतून, शांततेसाठी करण्यात आलेल्या या लहानशाच पण धाडसी कृतीने दंगलखोरांच्या मनात स्वतच्या कृत्यांबद्दल घृणा निर्माण केली होती. परिणामत दंगलखोरांनी शस्त्रत्यागही केला होता. एका दंगलग्रस्त शहरात आक्रमकांच्या अंतरात्म्यास साद घालत महात्मा गांधींनी शांतता प्रस्थापित करून दाखविली.
जातीय सलोखा प्रस्थपित करणारा गांधीजी-सुऱ्हावर्दी यांचा प्रयोग रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ या गाजलेल्या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रसंगामुळे तसेच 'फ्रिडम अ‍ॅट मिडनाइट' या प्रसिद्ध पुस्तकात उत्तम चितारला गेला असल्यामुळे तसा सुपरिचित आहे. मात्र याच धर्तीवर केले गेलेले दोन अन्य प्रयोग, अयशस्वी झाल्यामुळे असतील कदाचित, पण लोकांच्या विस्मृतीत गेले आहेत. भारतीय उपखंडाच्या पूर्वेकडे िहसाचाराने घातलेले थमान आटोक्यात आणण्याचा गांधीजी प्रयत्न करीत होते. त्याच वेळी पश्चिमेकडे मात्र भीषण रक्तपात सुरू होता. एकाच वेळी पश्चिम पंजाबात िहदू आणि शिखांचे तर पूर्व पंजाबात मुसलमानांचे नृशंस हत्याकांड सुरूच होते. आपल्या राहत्या प्रदेशातून त्यांना अमानुषपणे हुसकावून लावले जात होते. या भीषण परिस्थितीत चौधरी खलीकाझ्झमान आणि सुऱ्हावर्दी या दोन मुस्लिम नेत्यांनी शांततेचे आवाहन करणारा मसुदा तातडीने तयार केला. हे आवाहन गांधीजी आणि जीना यांच्या नावाने केले जाणार होते. उभय देशांनी आपल्या हद्दीतील अल्पसंख्याकांचे रक्षण करावे तसेच दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने करणे टाळावे, हा या आवाहनातील कळीचा मुद्दा होता. गांधीजींनी या आवाहनावर स्वाक्षरी करण्याची तयारी लगेचच दाखविली. मात्र जीनांनी यास ठाम नकार दिला.
त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १९४९-५० मध्ये पूर्व पाकिस्तानात पुन्हा एकदा धार्मिक दंगल उसळली. भेदरलेली हजारो िहदू कुटुंबे भारतात पळून आली. या स्थलांतरामुळे एकीकडे पाकिस्तानच्या प्रतिमेस तडा गेला तर दुसरीकडे भारतावरील लोकसंख्येचा भार वाढला. फाळणीवेळी बंगालमधील 'लोकसंख्येच्या धार्मिक अदलाबदली'ची प्रक्रिया पंजाब प्रमाणे 'कट्टरते'ने अमलात आणली गेली नव्हती. पूर्व पाकिस्तानात िहदू तर पश्चिम बंगालमध्ये मुसलमान शांततेने आणि सन्मानाने जगू शकतील, अशी आशा होती.
१९४९-५० च्या दंगलींनी या आशेला हरताळ फासला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलग्रस्त भागास आपण संयुक्तपणे भेटी देऊन िहसाचार थांबविण्याचे आवाहन करूया, असे भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाक पंतप्रधान लियाकत अली खान यांना सुचविले. मात्र लियाकत अलींकडून या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही.
२००२ मध्ये नानाजी देशमुखांनी केलेल्या आवाहनामुळे इतिहासकारांच्या मनात ५० वर्षांपूर्वीच्या या तीन प्रसंगांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला मात्र नानाजींचे हे आवाहन आठवण्याचे कारण वेगळेच आहे. आजही नानाजींनी केलेले आवाहन तितकेच कालसुसंगत ठरले आहे. आसाममधील कोक्राझार जिल्ह्य़ातील वांशिक दंगलींचा आवाका जेव्हा मला जाणवला, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एकत्रितपणे आसामला भेट द्यावी, असा विचार माझ्या मनात उत्स्फूर्तपणे चमकून गेला. अडवाणी आणि डॉ. मनमोहन सिंग या दोघांनीही, निर्वासित असल्याने (अनुक्रमे सिंध आणि पश्चिम पंजाब प्रांत) राहते घर व हक्काची उपजीविकेची साधने गमावण्याची वेदना काय असते याची झळ अनुभवली आहे. शिवाय डॉ. मनमोहन सिंग यांना तर राज्यसभेचे सदस्यत्वही आसाममधूनच मिळालेले आहे.
माझा हा विचार मी माझ्या मित्राजवळ व्यक्त केला. या भाबडेपणाबद्दल त्याने मला वेडय़ात काढायचेच काय ते बाकी ठेवले! हे दोन्ही नेते वयोवृद्ध, थकलेले आणि 'सिनीकल' झालेले आहेत. निव्वळ कर्तव्यभावनेने प्रेरित होऊन हे दोन्ही नेते कोक्राझार येथे जरी गेले तरीही निषेधाचे काळे झेंडे आणि ‘वापस जाओ’च्या घोषणांनीच कदाचित त्यांचे स्वागत झाले असते. आणि खरोखरच, जेव्हा संसदेमध्ये या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी हे दोन्ही नेते समोरासमोर आले तेव्हा परस्परांच्या विचारधारेवर आणि पक्षावर चिखलफेक करण्यापलीकडे अन्य काहीही साध्य झाले नाही. माझ्या कल्पनेला वेडय़ात काढणारा माझ्या मित्राचा तर्क खरा ठरला!
या दोघांचेही वर्तन हे राजकीय चारित्र्यदर्शक आहे. आपल्या 'डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इट्स इन्स्टिटय़ुशन्स' या नवीन पुस्तकात आंद्रे बेटेली म्हणतात त्याप्रमाणे, सध्या भारतात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाढता अविश्वास-समन्वयाचा अभाव लोकशाहीला मारक ठरत आहेत.  या अविश्वासाला आणि संशयी वृत्तीला सत्ताधाऱ्यांच्या गुप्तता व बेफिकीर वृत्तीने खतपाणीच घातले जात आहे. परिणामी, एक जबाबदार आणि अधिमान्य राजकीय संस्था म्हणून विरोधी पक्षाला आकार देण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे.
काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे देशातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष 'विलक्षण सातत्याने' लोकसभा, राज्यसभा इतकेच नव्हे तर अगदी दूरचित्रवाहिन्यांवरही परस्परांचा तिरस्कार करताना दिसत आहेत. उभयपक्षांकडून एकमेकांवर भ्रष्टाचार आणि देशभक्तीच्या अभावाचे आरोप घृणास्पद पद्धतीने केले जात आहेत. सरकारतर्फे प्रस्तावित केल्या गेलेल्या विधेयकांवर सखोल-अभ्यासपूर्ण चर्चा होणे राहिले दूरच उलट, विरोधी पक्षाकडून असे प्रस्ताव उधळून तरी लावले जातात किंवा मग सभात्यागाचे हत्यार तरी परजले जाते, असे चित्र आहे.
दुर्दैवाने, यामुळे पक्षनिष्ठेपुढे राष्ट्रीय हितसंबंधांना कायमच दुय्यम स्थान मिळत गेले आहे. न्याय्य आíथक धोरणे आणि परराष्ट्र धोरणांच्या आखणीवरही या पक्षनिष्ठेचा विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. किंबहुना अंतर्गत शांतता, प्रांतीय-धार्मिक सौहार्दता निर्मितीवर या वृत्तीचा सर्वाधिक दुष्परिणाम झालेला दिसतो. २००३मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी श्रीनगरला भेट दिली होती. सुमारे २० वर्षांत श्रीनगरला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. यावेळी जम्मू-काश्मिर राज्यात पीपल्स डेमोकट्रिक पार्टी (पी.डी.पी.) आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार सत्तेवर होते. पंतप्रधान वाजपेयींनी या भेटीदरम्यान घेतलेल्या जाहीर सभेस पी.डी.पी. नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र काँग्रेसने या सभांपासून लांब राहणेच पसंत केले. द्वेषाने भरलेली ही अत्यंत धक्कादायक कृती होती. कारण, वाजपेयी हे 'स्वयंसेवक' म्हणून नव्हे तर भारताचे लोकनिर्वाचित पंतप्रधान म्हणून काश्मिरला भेट देत होते.
काश्मिरमध्ये (आणि काश्मिरबाबतही ! ) असाच द्वेषपूर्ण प्रतिसाद देण्याची पाळी आता भाजपाची होती. उपरोक्त घटनेनंतर अवघ्या पाचच वर्षांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात चर्चा सुरू होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय सीमारेषेत परावíतत करण्याविषयीचे करारपत्र हा यावेळेच्या चच्रेचा विषय होता. या निर्णायक क्षणी भाजपा आणि त्यांच्या सहपक्षांनी अमरनाथ यात्रेच्या प्रश्नावर निदर्शने करण्यास सुरुवात केली. या निदर्शनांच्या तीव्रतेमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील रस्ताही 'ब्लॉक' झाला. औषधे, अन्न आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या पुवरवठय़ापासून काश्मिर खोरे वंचित झाले. काँग्रेसवर कुरघोडी करण्यात जोपर्यंत आम्ही यशस्वी होतो आहोत तोवर तुमच्या उपासमारीशी आम्हाला काहीच देणं-घेणं नाही, असेच जणू आपल्या कृतीतून भाजपा काश्मिरी नागरिकांना सुचवित असावी.
२००२ मधील नानाजींच्या आवाहनाकडे वाजपेयी आणि सोनिया गांधी या दोघांनी केलेला कानाडोळा हे एकाच 'राजकीय स्वभाव वैशिष्टय़ा'चे द्योतक आहे. यावेळी पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेत्या यांपकी कोणीही गुजरात दंगली रोखणे अथवा तेथे प्रत्यक्ष जाऊन शांततेचे आवाहन करणे यापकी एकही कृती केली नाही. देशाच्या हितासाठी-सामाजिक ऐक्यासाठीसुद्धा लोकशाहीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत हेच यातून दिसते, असे हताश उद्गार नानाजी देशमुख यांनी यावेळी उद्वेगाने काढले होते.
मला कुणी वेडं म्हणा किंवा भाबडं, पण यापुढे भविष्यात एखादे संकट उद्भवल्यास राष्ट्रीय नेतृत्वाची नवीन पिढी निदान आतातरी अधिक प्रगल्भतेने, धाडसाने आणि निस्वार्थीपणे वागेल, अशी मला आशा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.. अजूनही राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वैद्यकीय मदतीसह कोक्राझारला एकत्रितपणे भेट देण्याबद्दल विचारणा करावी. कोणी सांगावे, सर्वच जाती-धर्मातील पीडितांना हवी असलेली आत्मीयता, मायेचा उबदार स्पर्श आणि आशा यातून मिळूही शकेल!
अनुवाद :  स्वरूप पंडित