उत्तर महाराष्ट्र तहानलेला Print

अनिकेत साठे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२
पावसाळ्याच्या मध्यावरही कोरडय़ाठाक पडलेल्या नद्या, नाले व साठवण बंधारे.. पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर करावी लागणारी पायपीट.. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांमुळे धोक्यात आलेली पेरणी.. कापूस व इतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव.. पिकांना जीवदान देण्यासाठी हजारो रुपये मोजून टँकरने पाणी देण्याची धडपड.. थंडावलेली शेतीची कामे.. परिणामी, रोजगाराचाही निर्माण झालेला प्रश्न.. आणि दुष्काळाच्या मुद्दय़ावरून सुरू झालेले राजकारण.. यंदाच्या हंगामात ‘धूमकेतू’ प्रमाणे आलेला आणि पुन्हा तसाच अंतर्धान पावलेल्या पावसाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाच्या अशा गडद छायेबरोबर प्रश्नांची अव्याहत मालिका निर्माण केली आहे.

शासकीय निकषांनुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत परिघाबाहेर राहिलेल्या अर्थात त्यात समाविष्ट होऊ न शकलेल्या २० तालुक्यांत बहुतांश ठिकाणी हे चित्र पहावयास मिळते. सद्यस्थितीत या भागात असे एकही शहर, तालुका वा गाव नाही की, जिथे कपातीविना पाणी पुरवठा होत आहे. त्यातच फिडरनिहाय भारनियमन लागू झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठय़ावर विपरित परिणाम झाला असून ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे नेमके काय, याची शब्दश: अनुभूती घ्यावी लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जवळपास २० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला तरी उर्वरित २० तालुके या सीमारेषेच्या बाहेर राहिले. त्यातील नाशिकमधील इगतपुरी हा एकमेव तालुका वगळता उर्वरित ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात तितकीच गंभीर स्थिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका भागात समाधानकारक पाऊस होत असला तरी हरसूल हा दुसरा पट्टा तहानलेला आहे. परंतु, पर्जन्यमानाच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट होत नसल्याने त्याचा फटका हरसूलकरांना बसला. दुष्काळी यादीत समाविष्ट न झालेल्या देवळा व चांदवड तालुक्यांची तर कहाणीच वेगळी. चांदवड शहरात पंधरा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. नदी-नाले व विहिरी कोरडय़ा असल्याने पिण्याच्या पाण्यासह मका, बाजरी व कांदा ही नगदी पिके कशी वाचवायची, याची भ्रांत पडली आहे. काही सधन शेतकऱ्यांनी हजारो रुपये मोजून टँकरने पाणी आणून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा ‘द्राविडी प्राणायाम’ किती दिवस करता येईल ? जळगाव जिल्ह्यात पंधरापैकी आठ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले. भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव व पारोळा यातील बरेचसे तालुके टंचाईचा सामना करत असताना ते दुष्काळी ठरू शकले नाहीत. पाऊस गायब झाल्याने वातावरणात जे बदल झाले, त्याचा विपरित परिणाम केळीवर करपा, कापसावर लाल्या व इतर उडीद, मूग या पिकांवर किडींचा प्रार्दुभाव होण्यात झाला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, तळोदा व नवापूर हे तालुके दुष्काळी तालुक्याच्या निकषात समाविष्ट झाले नाहीत. या भागातून वाहणारी गोमाई नदी वर्षभर कोरडी राहण्याच्या मार्गावर आहे. गेल्या सप्टेंबरपासून गोमाईतून पाणी वाहिलेले नाही. या नदी काठावरील विंधन विहिरीतून शहराला कसाबसा सध्या तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे खान्देशातून मार्गस्थ होणारी तापी नदी दुथडी भरून वहात आहे. हे पाणी अडविण्यासाठी प्रकाशा, सुलवाडे व सारंगखेडा बॅरेजेसची उभारणी करण्यात आली. मात्र, सिंचनासाठी ते पाणी उचलता येत नाही. कारण, सहकारी उपसिंचन योजना लयास गेल्याने जलसाठा असूनही केवळ दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागते. धुळे जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा व शिरपूर या तालुक्यात टंचाईचे संकट घोंघावत आहे.  उन्हाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील तब्बल २५ धरणे पूर्णपणे कोरडीठाक पडली होती. अधूनमधून होणाऱ्या पावसाने ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार काही धरणांचा जलसाठा उंचावू लागला होता. परंतु, आजही कित्येक धरणांची स्थिती गंभीरअसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.