विदर्भाचा काही भाग संकटात Print

 

विक्रम हरकारे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२
विदर्भातील बहुतांश भागात पीक स्थिती चांगली असली तरी पावसाअभावी काही भाग संकटात सापडला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या १२२ तालुक्यांमध्ये विदर्भातील १९ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी १६ तालुके एकटय़ा अमरावती विभागातले असल्याने विदर्भातील अन्य दहा जिल्ह्य़ांमधील तालुक्यांचा विचार करण्यास सरकारला वेळ का मिळाला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

दुष्काळाविषयी प्रत्यक्ष लाभाच्या योजनांची अंमलबजावणी १५ डिसेंबरनंतर गावनिहाय अंतिम पैसेवारी ठरवून केली जाणार असल्याने विदर्भातील शेतक ऱ्यांनाअजूनही आशेचा किरण दिसत आहे. यंदा विदर्भात पावसाचे आगमन बरेच उशिरा झाले. त्याचा पेरण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. अनेक भागात पावसाने खंड दिल्याने पेरण्या उलटल्या, तर काही भागात अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली. अनेक भागात सुरुवातीला झालेल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण नंतर पावसाने ताण दिल्याने पिके करपली. बुलढाणा जिल्ह्य़ाला तर अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याच्या अगदी विरुद्ध चित्र गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्य़ांचे आहे. या जिल्ह्य़ांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला असून अनेक तालुके मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. सिंदखेडराजा आणि सेलू हे तालुके दुष्काळी तर उर्वरित अवर्षणप्रवण आहेत. राज्यातील १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेल्या १९ तालुक्यांपैकी १६ तालुके विदर्भातील आहेत. अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा, भातकुली, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी, केळापूर, नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर, भंडारा जिल्ह्य़ातील पवनी, चंद्रपूर जिल्ह्य़ातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्य़ातील कुरखेडा, बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद, अकोला जिल्ह्य़ातील अकोट, मूर्तिजापूर आणि वाशीम जिल्ह्य़ातील मंगरूळपीर आणि मानोरा या तालुक्यांमध्ये सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड, भिवापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ाचा काही भाग तसेच भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, तरीही या विभागातील तालुके अवर्षणप्रवण यादीत नाहीत. दुष्काळी तालुक्यांसाठी तात्काळ मदत पोहोचवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले असतानाच दुष्काळी आणि अवर्षणप्रवण निकषांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली अशा तालुक्यांना दुष्काळी तर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेल्या अवर्षणप्रवण भागात गृहित धरण्याचा निकष लावण्यात आला असला तरी विदर्भातील अनेक तालुके निकषाच्या बाहेर असल्याने दुष्काळी स्थिती असूनही हात चोळत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.