चंद्रावतरणाचे वार्ताकन अन् न्यूजरूममधील उत्कंठा.. Print

एकनाथ बागूल, रविवार, २ सप्टेंबर २०१२

२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी अपोलो ११ मोहिमेचे कमांडर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवून इतिहास घडवला. नुकतेच त्यांचे निधन झाले. या मोहिमेची माहिती दूरचित्रवाणी, नभोवाणी व वृत्तपत्रांतूनच लोकांना कळली. त्या दिवशी रात्रपाळीचा उपसंपादक असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराची ही आठवण..


अमेरिका आणि रशिया या दोन देशांच्या पुढाकाराने आणि जगभरातील ४०० अंतराळ संशोधकांच्या अथक प्रयत्नाने ‘क्युरिऑसिटी’  यानाने आणि त्यातील यंत्रमानवासह ‘मंगळ’ ग्रहावर केलेल्या संपूर्ण थरारक प्रवास दूरचित्रवाणीवर पाहिला व वृत्तपत्रात वाचला तेव्हा ‘केसरी’ मध्ये रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून केलेल्या कामाच्या आठवणी माझ्या मनापुढून सरकत होत्या. त्याचवेळी अमेरिकेच्या अपोलो यानातून २० जुलै १९६९ रोजी प्रत्यक्ष चांद्रभूमीवर अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग याने टाकलेल्या पहिल्या पावलाच्या महान ऐतिहासिक घटनेचे वृत्त सादर करण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी होतो. याचेही मला सतत स्मरण होऊ लागले. नील आर्मस्ट्राँगच्या निधनाच्या खेदजनक वृत्तांतामुळे त्या आठवणी अधिक ताज्या झाल्या. अपोलो यानातील एडविन ऑल्ड्रिन नामक दुसरा अंतराळवीर त्याचवेळी अपोलो यानाचे सारथ्य करीत चांद्रभूमीच्या सभोवती चंद्राच्या अवकाशातच तरंगत होता. खरे तर या दोन चांद्रवीरांनी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ केंद्रावरून चांद्रभूमीवर थेट पाऊल ठेवण्याच्या क्रांतिकारक संपूर्ण प्रवासाची तयारी, अनेक दिवसांपर्यंतचा अंतराळ प्रवास, पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत अपोलो यानाने केलेला प्रवास आणि त्या यानाने प्रवेश केलेल्या यानातून आर्मस्ट्राँगने ऑल्ड्रीन या सहकाऱ्याला मागे सोडून चक्क यानातून चांद्रभूमीवर विशिष्ट हवाई छत्रीमधून एकटय़ाने टाकलेली यशस्वी अचूक उडी व नंतर मानवाला कोटय़वधी वर्षांपासून खुणावणाऱ्या चंद्राच्या भूमीवर पडलेले त्याचे पहिले पाऊल या घटनेचे वृत्त ऐकण्यासाठी मुद्दाम रेडिओकडे कान देऊन सारेजण कमालीच्या औत्सुक्याने बसले होते. भारतामध्ये त्यावेळी दूरदर्शनचे आगमन झाले नव्हते. वृत्तपत्रांनी मानवाच्या त्या अभूतपूर्व प्रचंड साहसाचे व त्यातील शास्त्रीय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे नकाशे आणि छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी आधी अनेक दिवसांपासून जय्यत तयारी केली होती. चांद्रप्रवासाची तयारी व त्याचे महत्त्व याचे वेळोवेळी सर्व तपशील व तज्ज्ञांचे लेख बहुतेक सर्व प्रमुख वृत्तपंत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध होत होते. मानवाने केलेल्या चंद्रावरोहणाच्या थक्ककारक ,अचाट पराक्रमाचे वृत्त कसे द्यावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्या दिवशी ‘न्यूजरूम’मध्ये जातीने वरिष्ठ सेनांनीपासून सगळेजण उपस्थित होते. ‘मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल’, ‘चंद्रावरोहण यशस्वी’, ‘मानव चंद्रावर पोहोचला’ अशा जास्तीत जास्त मोठय़ा टाइपातील शीर्षकांनी आणि चांद्रवीरांच्या छायाचित्रांनी देशभरातील सर्व वृत्तपत्रांची पहिली पाने दुसऱ्या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध झाली. ‘केसरी’ ने देखील अगदी ६० किंवा त्यापेक्षा मोठय़ा पॉईंट आकारातील पोस्टर टाइप नावाच्या लाकडी टाइपामध्ये ‘चंद्रावर मानवाचे पदार्पण’ या शीर्षकासह आपला अंक वाचकांना सादर केला. मानवाच्या या अचाट आणि चित्त थक्ककारक अभूतपूर्व वैज्ञानिक कामगिरीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात सहभाग असल्याचा आनंद माझ्याप्रमाणेच माझ्या सर्व सहकाऱ्यांनाही त्यावेळी आला. हे विलक्षण मानवी साहस यशस्वी होईल, याची अमेरिकेलाही खात्री नव्हती. त्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचा त्यात अंत झाला तर राष्ट्राला उद्देशून ते खेदजनक वृत्त कळविणारे भाषण तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी तयारही ठेवले होते.