कृतार्थ आणि सफल! Print

डॉ. अनंत पंढरे, रविवार, २ सप्टेंबर २०१२

वैद्यक क्षेत्रात डॉ. अजित फडके यांचे नाव आदराने घेतले जाते. मूत्रपिंडरोपण, डायलिसिस, मूतखडा या क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांना मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात चांगले संशोधन व्हावे यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तयार केले. अशा याॠषितुल्य शल्यविशारदाचे नुकतेच मुंबईत निधन झाले.  औरंगाबाद येथील त्यांच्याच एका विद्यार्थ्यांने केलेले त्यांचे स्मरण..


अमेरिकन युरॉलॉजिस्ट्स असोसिएशनने ‘प्रेसिडेन्शिअल सायटेशन अ‍ॅवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार १०६ वर्षांच्या इतिहासात परदेशी आणि भारतीय व्यक्तीस दिला नव्हता. २०११ मध्ये डॉ. अजित फडके यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते, यावरूनच त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. डॉ. अजित फडके गेले.. फडके सर गेले.. उत्तम नेतृत्वगुण आणि विद्यार्थ्यांना घडविणारे डॉक्टर म्हणजे डॉ. अजित फडके! रविवारी सर नेहमीप्रमाणे शांत वाटत होते, पण मोठय़ा प्रवासाला निघालेले.
"TUESDAY'S WITH MORI"  या नावाचे सुंदर पुस्तक वाचण्यात आले. त्यामध्ये लेखकाचे शिक्षक मृत्यूला सामोरे जाण्याचा सोहळा साजरा करीत करीत जणू मृत्यूला आलिंगन देतात.. प्रत्येक TUESDAY  म्हणजे एक सोहळा.. डॉ. फडके यांचे जीवन आणि त्यांचा मृत्यू म्हणजे जणू असेच एक उदाहरण. जगावे कसे आणि मरावे कसे याचे. कृतार्थ आणि सफल! कसे काय जगता येते एखाद्याला अलिप्त, तरी तृप्त! कृतिशील तरी निरपेक्ष. देवालाच माहीत की देवानेच अशी योजना केली आहे आपल्यासाठी की पाहा- माझी माणसे अशी असतात हे दाखविण्यासाठी. खरोखरच, डॉ. फडके म्हणजे ‘देव’ व्यक्ती होती. अंत्यविधीच्या वेळी डॉ. अनंत जोशीसुद्धा म्हणत होते! नावाजलेल्या अनेकांना आपण फडकेसरांसारखे व्हावे वाटत असे आणि सर्वसामान्यांनाही तसेच व्हावे वाटे. केवढी किमया!
डॉ. अजित फडके यांनी कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या रुग्णसेवेतून मूत्ररोगांवरील उपचारांमध्ये स्वत:चा एक नवा अमीट ठसा निर्माण केला. लिथोट्रिप्सी, मूत्रपिंडरोपण, मूतखडय़ावरील उपचार आणि डायलिसिस या प्रकारच्या विविध उपचारांद्वारे त्यांनी असंख्य रुग्णांची सेवा केली. वैद्यक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कारही त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला होता. डॉ. फडके यांनी युरॉलॉजिस्ट्स  असोसिएशन ऑफ इंडियाचेही अध्यक्षपद भूषविले होते. गव्हर्निग कौन्सिल ऑफ असोसिएशन ऑफ इंडियन सर्जन्सचेही ते अनेक वर्षे सदस्य होते. राज्यपालांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. सर्वसामान्यांपासून अतिमहत्त्वाची मंडळी डॉ. फडके यांच्याकडे उपचारासाठी येत असत. भारतामध्ये मूत्रपिंड रोपणाची पहिली शस्त्रक्रिया डॉ. फडके यांनीच केली. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना २००६ साली अमेरिकेचा ‘क्विम्प्रो प्लॅटिनम स्टॅन्डर्ड’ पुरस्कार देण्यात आला होता.
औरंगाबादहून येऊन अधून-मधून त्यांची भेट होत असे, चौकशी करीत असे! शेवटी भेटलो तेव्हा म्हणालो, ‘सर, येतो मी पुन्हा, काळजी घ्या.’ पुन्हा भेटतील वाटले होते, पण रविवारी सकाळी बातमी आली, ‘सर गेले.’ ‘अरेच्या! सर निरोप न घेता गेले?’ पण मागील एक वर्ष आठवले. फडकेसर निरोपच तर घेत होते. एका एकाशी बोलून, भेटून सर्व निरवानिरव करत करत. डॉ. फडके यांनी आयुष्यात कोणतीच गोष्ट, संवाद, नाते अर्धवट सोडले असेल असे मला वाटत नाही.
औरंगाबादमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे नूतन बांधकाम, विस्तारीकरण सुरू आहे. डायलिसिस आणि लिथोट्रिप्सी विभागांची रचना पाहण्यासाठी ते आले होते. अशक्तपणा खूप, थोडी धापही लागत होती. आजुबाजूला आम्ही सर्वचजण डॉक्टर होतो, त्यामुळे कर्करोगाचा प्रभाव जाणवत होता. मात्र सरांचा आग्रह- देणगीदारांनी दिलेल्या देणगीचा योग्य वापर होतो आहे की नाही, त्यांना समाधान वाटेल असे प्लॅन केलेत की नाही, याची त्यांना स्वत: खात्री करायची होती. काही सूचना केल्या आणि डॉ. फडके समाधानाने मुंबईला परतले. पुन्हा औरंगाबादला न येण्यासाठी. फडके सरांना सक्षम, धनवान मंडळींबद्दल विशेष आदर होता आणि त्यांना ‘दान देण्याची इच्छा होत राहावी’ म्हणून त्यांचे मन सांभाळावे वाटत असे. पण लांगूलचालन कधीच नाही. एकदा एखाद्या व्यक्तीकडे देणगीसाठी विषय काढल्यावर फडके सर पुन्हा म्हणून त्या व्यक्तीकडे आठवण देण्यासाठीसुद्धा जात नसत. राग म्हणून नव्हे, तर त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर राखण्यासाठी! पाठपुरावा करणे कमीपणाचे वाटे म्हणून नाही तर दडपण येईल म्हणून नाही! व्यक्ती म्हणून एवढय़ा उच्च भावना बाळगून जगणाऱ्या कर्तृत्वाने महापुरुष पण मनाने बालक असणाऱ्या फडकेसरांना पाहून कोण देणगी देणार नाही? अनेक धनवान मंडळींचा देण्याचा मानस, इच्छा वाढत राहिली. संस्थाजगतावरील विश्वास वाढला तो सरांसारख्या व्यक्तींमुळेच. देणाऱ्यांनी दिले, पण देता देता कृतार्थताही अनुभवली ती सरांमुळेच.
सध्याच्या काळात दिलेला शब्दही लोक पाळत नाहीत. मात्र ‘न दिलेला शब्द’ ही कसा पाळायचा असतो, हे डॉ. फडकेसरांकडून शिकायला मिळाले. देणगीदारांनी दिलेली मदत योग्य वापरली जाते की नाही याची खातरजमा स्वत: फडकेसरांनी करणे हा त्यातलाच भाग.
रुग्णसेवा सदनसारखा मोठा प्रकल्प त्यांनी जीवनभर अविरतपणे सांभाळला आणि रुग्णसेवेचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला. डॉ. फडके यांच्या प्रयत्नांतूनच लालबाग भागात नाना पालकर स्मृती समितीचे ११ मजली भव्य रुग्णसदन उभे राहिले आहे. डॉ. अजित फडके यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि संघ परिवारातील अन्य संघटनांशी निकटचा संबंध होता. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे, वामनराव पै यांच्यासह अनेकांवर त्यांनी उपचार केले होते. रूढ अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नसून संघमय जीवन जगणे हेच तर आहे. निरामय जीवन जगण्याचे प्रशिक्षण न घेता अपेक्षित जीवन जगणाऱ्या या मानवी स्वयंसेवकास संघ जवळचा वाटणारच ना. आणि संघालाही!
मला नेहमी एका गोष्टीचे खूप कौतुक वाटत असे- डॉ. अजित फडके यांच्या मित्रमंडळींमध्ये, त्यांचा आदर करणारे सर्वच प्रकारचे लोक होते. अनेक डॉक्टर असे होते की समाज ज्यांचा आदर करीत नाही. सर त्यांनाही कसे इतके आवडतात असे मला वाटे. मात्र सरांना जीवनाचा अर्थ कळला आहे हे जेव्हा कळाले तेव्हाच हे कोडे उलगडले. माणूस कधीच चांगला किंवा वाईट नसतो, किंबहुना चांगलं-वाईट काही नसतंच असं मानून संपर्कातील प्रत्येकावर निरतिशय प्रेम करणे, मदत करणे सरांना सहज जमले. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता, लोकप्रिय होण्याकरिता आजकाल लोक काय काय करीत नाहीत?  पण डॉ. फडके यांनी व्यावसायिक जगात राहून, मूल्ये सांभाळून, नाव कमावले, यशस्वीसुद्धा झाले. सध्याच्या डॉक्टर मंडळींसमोर हे उदाहरण ठेवून ते गेले. जाता जाता अपेक्षांचा डोंगर उभा करून न जाता ‘सहज शक्य आहे असे जगणे, मी नाही का जगलो!’ इतक्या सहज सांगून गेले. कधीही कोणाच्या वागण्याला न हिणवता फक्त उदाहरण समोर ठेवणे म्हणजे जणू संतांचेच जीवन आहे. डॉ. फडके यांच्या कॉलनी नर्सिग होम या रुग्णालयाचा असंख्य रुग्णांना मोठा आधार होता.
रविवारी पहाटे सर गेले. माझ्या मनात आले, ‘मुंबईतील व्यस्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांची अडचण होऊ नये म्हणूनच रविवारी श्वास सोडला असेल सरांनी!’ डॉ. फडके यांनी कधीच कोणाची अडचण, गैरसोय होऊ दिली नाही. संपूर्ण दिवसाची आखणीसुद्धा तशीच असे. संपूर्ण आयुष्याची आखणीसुद्धा. या शरीराचा इतरांना फक्त उपयोग व्हावा इतकाच काय तो प्रपंच. आपण देवळात जातो आणि केळीच्या पानावर प्रसाद घेऊन येतो (देवाचा आशीर्वाद म्हणून) प्रसाद खातो आणि त्या केळीच्या पानाला विसरून जातो.
डॉ. फडके यांचे जीवन जणू या केळीच्या पानासारखेच. विरक्त, उपयोगी, सहज, निर्लेप आणि म्हणूनच डॉ. फडकेसरांशी कधी कोणाची काही संघर्ष झाला असेल असे मला वाटत नाही. आपण अनेकजण सहसा एखादा विरोधी किंवा वेगळा विचार समोरच्याला सांगायचा असेल तर सावध होतो किंवा ताणाखाली बोलतो वा समोरच्याला आपला विरोध जाणवतो. डॉ. फडके यांची जीवनशैली आणि विचारप्रक्रियाच अशी होती की समोरचा त्या संयमित, मन राखून समोरच्याला चूक न ठरविता मांडलेल्या विषयाकडे कुतूहलाने पाहत असे आणि विरघळून जात असे.
असं म्हणतात की या प्रवाही जीवनामध्ये आपण जन्म घेतो आणि ठराविक कालावधीनंतर समाजातून घेतलेल्या, उचललेल्या गुण-अवगुणांच्या आधारे आपले जीवन निर्माण करतो. जणू जीवनाचे विविध पदर, अंग, रंग उलगडण्याचे काम प्रत्येकजण करीत असतो. जीवन जगावे कसे, याचा वस्तुपाठ अनेकजण घालून देतात. तसे पाहिले तर कशालाच काही अर्थ असा नाही; अर्थ आपण जोडतो. अशा अर्थहीन जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम फडकेसरांनी केले. एकदा विलिंग्डन क्लबमध्ये एका उद्योगपतीसोबत आत शिरत होतो. फडकेसर भेटले. मी ओळख करून दिली. सर त्या व्यक्तीस म्हणाले, ‘मी जर तरुण असतो ना, तर लगेच औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयात जॉईन झालो असतो. जे काम तरुण वयात मी करू शकलो नाही, ते काम ही मुलं करीत आहेत.’ केवढी मोठी पावती अन् केवढी मोठी जबाबदारी. म्हणूनच डॉ. फडके यांना वाटे की, त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाने डॉ. हेडगेवार रुग्णालय पाहण्यासाठी औरंगाबादला जावे. कोणाचे काय घ्यावे, कोणाकडून काय शिकावे, हे विचार करून ठरवावे असे मला शिकविले गेले आहे. डॉ. अजित फडके यांच्याकडून सर्व काही घ्यावे असेच जीवन ते जगले. मूर्तिमंत कर्तृत्व आणि चांगुलपणा ठायी असलेल्या डॉ. अजित फडके यांना विनम्र आदरांजली!