जल्लोष हवाय, स्पीकरही हवाय.. Print

रविवार, २ सप्टेंबर २०१२
शब्दांकन- अभिजित घोरपडे, विनायक करमरकर, पावलस मुगुटमल, रसिका मुळ्ये, संपदा सोवनी

सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवात जल्लोष हवाय, स्पीकर हवाय, मिरवणुकीच्या दिवशी रात्रभर पारंपरिक वाद्येसुद्धा हवीत. पुण्यातील प्रमुख मंडळांच्या प्रतिनिधींनी ‘लोकसत्ता’च्या ‘लाऊड स्पीकर’ या व्यासपीठावर ही मागणी आक्रमकपणे मांडली. उपस्थित असलेले पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर व पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनीही त्यांच्या थेट सवालांना उत्तर दिले. पण, सुरक्षेच्या मुद्दय़ावर सर्वानीच एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केले.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला गेला त्या पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांचे प्रतिनिधी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ च्या ‘लाऊडस्पीकर’ व्यासपीठावर एकत्र आले. ‘लोकसत्ता’ चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्याकडे चर्चेची सूत्रे होती. त्यांनी विविध विषय उपस्थित करून सहभागी प्रतिनिधींना बोलते केले.  मंडळांकडे आरोपी म्हणून पाहू नका, कायद्याचा जाच नको, असे मंडळांच्या प्रतिनिधींनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापुरते ध्वनिप्रदूषणाचे नियम सैल करा आणि रात्रभर पारंपरिक वाद्यांसह जल्लोषात मिरवणूक पार पडू द्या, अशी आग्रहाची मागणी मंडळांनी केली. याबाबत सवलत न देता कायदा राबवत असल्याचा आरोपही पोलिसांवर केला. त्या वेळी माजी पोलीस आयुक्त उमराणीकर यांनी मंडळांच्या भावनांबाबत सहमती दर्शवली, पण ते चुकीच्या ठिकाणी दाद मागत असल्याचे म्हणाले. कायद्याचे पालन केले नाही, तर पोलिसांना घरी जावे लागेल. त्यामुळे कायद्यात सुधारणा केली आणि परवानगी मिळवली तर पोलीसही त्याच्यात सहभागी होतील. पण पोलिसांनी कायद्याकडे कानाडोळा करावा, ही अपेक्षा योग्य नाही. सिंघल यांनीही अशीच भूमिका मांडत ‘मंडळांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणून कायद्यात बदल घडवून आणावेत,’ असा सल्ला दिला. ‘लोकमान्य लोकशक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता’ च्या व्यासपीठावर नेहमीप्रमाणे खुल्या वातावरणात आणि रोखठोक चर्चा झाली. या वेळी कळीचा ठरलेल्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर सर्वानीच काळजी घेण्याचे मान्य केले. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीला एक दिवसासाठी रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजू द्या, त्यासाठी सर्वानी सहकार्य करा, अशी मागणी मंडळांच्या प्रतिनिधींनी केली. ‘गुजरातमध्ये गरब्यासाठी, बंगालमध्ये नवरात्रीसाठी ध्वनिप्रदूषणाचे नियम शिथिल केले जातात, तर महाराष्ट्रात गणपतीसाठी तसे करायला काय हरकत आहे? मुंबईत एक नियम असतो मग पुण्यात दुसरा नियम का?’ असा सवालही त्यांनी केला. ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांमुळे मिरवणुकांमधील धांगडधिंगा कमी झाला आहे व त्यात शिस्त आली आहे. त्यामुळे या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे, कार्यकर्त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, अशी कळकळीची मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली.
alt


लाऊडस्पीकर कशासाठी?
पुण्यातील आणि एकूण राज्यातील गणेशोत्सवावर या वेळी दहशतवादाचे सावट आहे. अशा वेळी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर पोलीस, पालिका यांसारख्या यंत्रणा आणि मंडळांचे प्रतिनिधी यांच्यात सहकार्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांना एकत्र आणण्याचा उद्देश होता. त्यातून काही प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि काही प्रश्न मार्गी लागण्यासाठी संवाद सुरू व्हावा, यासाठी ‘लाऊडस्पीकर’ चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा पुरेपूर वापर यंत्रणा व मंडळांच्या प्रतिनिधींनी करून घेतला.

सवलतीची मागणी  खासदार, आमदारांकडे व्हावी
alt
गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्याबाबतचा उपाय पोलिसांकडे नाही. त्यांना कायद्यानेच वागावे लागते. सरकार जसा आदेश काढते तसेच त्यांना वागावे लागते. मंडळांचे लोक आता बोलतात, पण एखादा अधिकारी निलंबित झाल्यास त्याच्या बाजूने कुणी उभे राहात नाही. पोलीस करू शकतील व त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी मागितल्या तर ते रास्त होईल. गणेशोत्सव मंडळांच्या मागण्या रास्त असल्या, तरी त्यांची मागणी करण्याची जागा मात्र चुकीची आहे. ध्वनिक्षेपकाच्या वेळेबाबत सवलत मिळवून देण्याची मागणी मंडळांनी खासदार, आमदारांकडे केली पाहिजे.
 जयंत उमराणीकर (माजी पोलीस आयुक्त)

सर्व परवानग्या ४८ तासांत..
alt
गणेश मंडळांसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्यांबाबत अर्जाचा नमुना तयार आहे. आवश्यक कागदपत्रांची नोंदही त्यात आहे. हा अर्ज संबंधित पोलीस स्थानकात सादर केल्यास त्याच ठिकाणी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या परवानगीचे सोपस्कर पूर्ण होऊन ४८ तासांत मंडळांना परवानगी मिळते. त्यासाठी १ सप्टेंबरपासून एक खिडकी यंत्रणा सुरू झाली आहे. गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. उत्सवाच्या काळात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होते. पर्यावरणावर त्याचा दबाव येतो. ध्वनिक्षेपकाच्या वेळेचे बंधन मंडळांनी पाळलेच पाहिजे. आपल्यासाठी संगीत असणारा घटक कुणासाठी गोंगाट ठरू शकतो. हे भान सर्वानी ठेवलेच पाहिजे. इतर शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी होत आहे, पुणे शहर मात्र त्याला अपवाद ठरते आहे. आपल्या उत्साहामध्ये कुणाचे नुकसान होऊ नये. रात्री बारानंतर वाद्य किंवा ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची मागणी मान्य झाली तरच गणेशोत्सव चांगला झाला, असे मंडळांना म्हणायचे आहे का?
महेश पाठक (महापालिका आयुक्त)

उत्सवातील र्निबध हे लोकांच्या सुरक्षिततेसाठीच
alt
रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व वाद्य सुरू ठेवण्याबाबत शासनाला वर्षांतील १५ दिवसांचे अधिकार आहेत. त्यातील तीन दिवस गणेशोत्सवासाठी देण्यात आले आहेत. कायदा हा पोलीस नव्हे, तर सरकार तयार करते. पोलीस केवळ अंमलबजावणी करतात. त्यामुळे वेळांच्या मर्यादेबाबत मंडळांनी कायदे करणाऱ्यांकडे दाद मागितली पाहिजे. कायदा पाळण्यासाठी आम्ही सर्वाचे सहकार्य मागतो आहोत. उत्सवात गणेश मंडळांना त्रास देऊन आम्हाला मजा मिळते असे नाही, तर आम्हाला त्याचा त्रासच होतो. कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काही करू शकत नाही. ध्वनिक्षेपकाबाबत वेळेच्या मर्यादेबाबत कायद्यातील बदलाबाबत काम करणे योग्य पर्याय आहे. त्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी सक्षम आहेत. विविध र्निबध हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. सर्वाच्या सहकार्याशिवाय कायदा सुव्यवस्था राखणे शक्य नाही.
संजीवकुमार सिंघल (सह पोलीस आयुक्त)

आमच्या मते..
’ मिरवणूक वेळेत संपायला मदतच होईल
alt
ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात मंडळांनी गेल्या दहा वर्षांपासून सकारात्मक पावले उचलली आहेत. मंडळे त्या कामात पुढाकार घेत आहेत. मंडळे प्रबोधनाचेही काम करत आहेत. अनेक विधायक कामे मंडळे वर्षभर करीत असतात. वाद्यांवरील बंदीमुळे रात्री बारा वाजता मिरवणूक थांबली की ती दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत तशीच थांबून राहते. यासाठी रात्री पारंपरिक वाद्यांना परवानगी मिळाली, तर मिरवणूक वेळेत संपायला मदतच होणार आहे हा मुद्दा लक्षात घेतला जावा.
    सुहास कुलकर्णी (श्री कसबा गणपती मंडळ)

’ उत्सवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा
alt
गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी लोक मोठय़ा प्रमाणावर उत्सवात रात्री बाहेर पडतात. दर्शनासाठीची योग्य व्यवस्था केली तर उत्सव अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडू शकतो, असा आमचा अनुभव आहे. या उत्सवाकडे मुळात सकारात्मक दृष्टीने पाहा. उत्सवातील चांगल्या बाजूंकडे पाहिले पाहिजे. मंडळांच्या अनेक मागण्या आहेत. मुख्यत: ध्वनिवर्धकाच्या संदर्भातील मागण्या आहेत. ‘लोकसत्ता’ने ‘लाऊडस्पीकर’च्या माध्यमातून भक्तांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा.
अ‍ॅड. महेश सूर्यवंशी (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती )

गणेशोत्सव आल्यावरच कायदा का आठवतो?
alt
दरवर्षी गणेशोत्सव आला की बंधने येतात. मग बैठका घेतल्या जातात आणि सर्व बंधने मंडळांनी पाळावी असा आग्रह धरला जातो. दरवर्षी गणेशोत्सव आल्यावरच सर्वाना नियम आणि कायदा का आठवतो. या प्रकाराच्या विरोधात आता ‘लोकसत्ता’नेच आवाज उठवावा, असे मला वाटते.
    भोला वांजळे  (अखिल मंडई मंडळ)

देखावे बघितलेच जात नाहीत
alt
ध्वनिवर्धकावरील बंदीमुळे देखावे बघितलेच जात नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवशी प्रत्येक वर्षी रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकाला परवानगी असली पाहिजे. हीच सर्व मंडळांची मागणी आहे आणि आमच्या वतीने ‘लोकसत्ता’ने ती राज्य शासनाकडे आग्रहाने मांडावी.
    बाळासाहेब मारणे (बाबू गेनू मंडळ)  

प्लॅस्टर ऑफ पॅरिस हानिकारक नाही
alt
गणेशोत्सव हा कलाकार घडवणारा उत्सव आहे. अगदी राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आजच्या अनेक कलाकारांच्या कामाचा प्रारंभ गणेशोत्सवातूनच झालेला आहे. या उत्सवात देखावे केल्यामुळे, मूर्ती केल्यामुळे कलाकारांना हिंमत मिळते. बळ मिळते. त्यातून त्यांना कारकीर्द घडवता येते. कलाकार घडवण्याचे काम गणेश मंडळे आणि त्यांचे पदाधिकारी करत असतात. काही ठिकाणी मात्र काही वाईट अनुभवही येतात. त्यामुळे अनेक कलाकार मग या कामाकडे पाठ फिरवतात असाही अनुभव आहे. सध्या प्लॅस्टरच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्तीचा आग्रह धरला जात आहे. मुळात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस खराब वा हानिकारक नाही. मूर्तीला दिले जाणारे रंग खराब, हानिकारक असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
    विवेक खटावकर (तुळशीबाग मंडळ)

परवानग्यांसाठी हेलपाटे मारावे लागतात
alt
मंडळांना ज्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजनेच्या घोषणा दरवर्षी केल्या जातात. मात्र, परवानग्यांसाठी वीस-वीस दिवस हेलपाटे मारावे लागतात असा आमचा अनुभव आहे. फक्त आदेश दिले जातात त्याची अंमलबजावणी स्थानिक स्तरावरचे अधिकारी करतच नाहीत. तीन हजार मंडप शेवटच्या तीन दिवसात उभे करणे अशक्य आहे. त्यामुळे ही कामे आधीपासूनच सुरू करावी लागतात. जाहीर केल्याप्रमाणे एकतरी परवानगी कधी चोवीस तासात दिली गेली का ते प्रशासनाने सांगावे.
    श्याम मानकर (हत्ती गणपती मंडळ)

एका आळीचा एक गणपती
alt
वॉर्ड वा प्रभागाचा गणपती ही संकल्पना अवघड आहे; पण एका आळीचा एक गणपती आणि त्या गणपतीचा उत्सव ही संकल्पना संपूर्ण शहरात सुरू झाली तर अनेक प्रश्नांना ते चांगले उत्तर ठरू शकेल. आळीच्या गणपतीचा उत्सव, त्याची विसर्जन मिरवणूक ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसे झाल्यास उत्सव आणि मिरवणूकही शिस्तीची होईल. मुख्य म्हणजे मंडळांनी वर्षभर काम केले पाहिजे. उपक्रम केले पाहिजेत. उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणपती पाहणाऱ्यांना पोलीस सिटी पोस्टाकडून सोन्या मारुती चौकाकडे येऊच देत नाहीत. असे बंधन यंदातरी घालू नये. पथारीवाल्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर रस्त्यावर ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील त्यांच्यावर ते अचूकपणे लक्ष ठेवू शकतील.
    रवींद्र माळवदकर (साखळी पीर तालीम मंडळ)

गरब्यावर बंदी नाही..
alt
वाद्यांवरील बंदीची अंमलबजावणी सन २००५ पासून सुरू झाली आणि तेव्हापासून या उत्सवातील उत्साह संपत चालला आहे. मिरवणूक कशी काढायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.  कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहात आहेत. गुजरातमध्ये गरब्यावर बंदी नाही. बंगालमधील उत्सवात तेथील मिरवणुकांवर बंदी नाही. फक्त महाराष्ट्रात मात्र गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतील वाद्यांवर बंदी हा काय प्रकार आहे. मंडळे नेहमीच प्रशासनाला सहकार्य करतात. प्रशासनानेही त्याच भूमिकेतून उत्सवात मंडळांना सहकार्य केले तर काय बिघडले.
    संजय बालगुडे (खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)

प्रशासनाने तारतम्याने निर्णय घ्यावेत
alt
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघून प्रशासनाने तारतम्याने निर्णय घ्यावेत. मंडळांसाठी सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. प्रत्येक मागणीसाठी आंदोलने करावी लागतात. राजकीय दबाव आणावा लागतो. मग एखादी मागणी मान्य होते. असे मंडळांना दरवेळी का करावे लागते याचा विचार झाला पाहिजे.
    शिरीष मोहिते (सेवा मित्र मंडळ)

कार्यकर्त्यांशी वर्षभर संवाद साधला पाहिजे
alt
पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. या उत्सवासाठी किमान १० ते १५ लाख लोकं एकत्र जमतात. हे एक मोठे व्यासपीठ आहे. लोकांचा उत्स्फूर्त उत्साह या उत्सवात दिसून येतो. त्याला विरोध असू नये. पुण्याच्या गणेशोत्सवाचे जगभर अनुकरण केले जाते. हा उत्सव सुव्यवस्थित व्हावा, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकावा आणि शिस्तही राखली जावी यासाठी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या आधी आठ दिवस कामाला न लागता, वर्षभर काम करणे गरजेचे आहे. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वर्षभर संवाद साधला पाहिजे.
    बाळासाहेब रुणवाल (संस्थापक- मेरे अपने संस्था)

बंधने व्यवहार्य असावीत
alt
परिवर्तनामध्ये गणेशोत्सवाचे स्थान मोठे आहे. कार्यकर्ते नेहमीच परिवर्तनाची साथ देत आले आहेत. कार्यकर्त्यांवर फक्त बंधने घालण्यापेक्षा त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव देणे, त्यांचा उत्साह वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात कार्यकर्ता वाचवा मोहीम सुरू करावी लागेल.  सुरक्षेचे भान कार्यकर्त्यांनाही आहे, हे प्रशासनानेही लक्षात घेणे गरजेचे आहे. एक वॉर्ड एक गणपती अशांसारखी दिवास्वप्नही बघणे योग्य नाही. मंडळांसाठी नियम करताना किंवा बंधने घालताना ते व्यवहार्य असतील हे पाहणे गरजेचे आहे. बाळबोध नियम केले की, त्याचे हसे होणे स्वाभाविक आहे. एखादा नियम करून तो सरसकटपणे सर्वाना लागू करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांना प्रक्रियेत सामावून घेऊन, प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार नियम करणे योग्य ठरेल. गणेशोत्सवाची मिरवणूक हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा सर्वोच्च बिंदू असतो. त्याचवेळी दहा दिवस अहोरात्र काम करून पोलीसही दमलेले असतात त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातील तणाव वाढतो. या परिस्थितीवर उपाय म्हणून समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा एक प्रभावगट निर्माण करण्यात यावा, जो मंडळे आणि पोलीस दोघांमध्येही समन्वय घडवून आणेल.
    आनंद सराफ (गणेशोत्सवाचे अभ्यासक)

कार्यकर्त्यांना आरोपी समजू नका
alt
गणेशोत्सव हा फक्त कार्यकर्त्यांचा उत्सव नाही, तर त्यामागे एक मोठे अर्थकारण आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला मिळालेले एक व्यासपीठ आहे. गणेशोत्सव जवळ आला की, उत्सवापेक्षाही त्याच्या बंधनांवर अधिक चर्चा होते. कार्यकर्त्यांनी, मंडळांनी केलेले नवे प्रयोग, त्यांचे उपक्रम यांवर कुणी चर्चा करत नाही. या उत्सवामध्ये बंधने कशी पाळली जातील किंवा या बंधनातून मार्ग कसे काढता येतील याचाच फक्त विचार करण्यापेक्षा उत्सवाला आलेले बीभत्स स्वरूप नष्ट व्हावे यासाठी एकत्रपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्सवाला चांगले वळण लागावे आणि त्यातून विधायक गोष्टींची निर्मिती व्हावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. एरवी कमानी, मांडव, मिरवणुका, ध्वनिप्रदूषण याबाबतचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होत नाही. मात्र, चांगले काम करणाऱ्यांना आरोपी समजले जाते. कार्यकर्त्यांना आरोपी समजू नका, ते दिशादर्शक आहेत.
    पराग ठाकूर (सचिव, ढोलताशा महासंघ)

मुंबई आणि पुण्यासाठी वेगळे नियम का?
alt
मुंबईमध्येही रात्री मिरवणूक चालते. मात्र, पुण्याच्या गणेशोत्सवाला मुंबईपेक्षाही मोठी परंपरा असूनही मिरवणुकीवर बंधने लादली जातात. मुंबई आणि पुण्यासाठी वेगळे नियम का? मिरवणुकीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांना परवानगी दिल्यास सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मिरवणूक संपेल. मिरवणूक असावी का यावर मतदान घेतल्यास एखादा अपवाद वगळता ९९ टक्के लोक  मिरवणुकीच्या बाजूने मतदान करतील. गेल्या पंधरा वर्षांमध्ये उत्सवाला चांगले वळण लागले आहे. आता उत्सवात हुल्लडबाजी दिसत नाही. गणेशोत्सव हे सामान्य कार्यकर्त्यांला मिळालेले व्यासपीठ आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला या उत्सवाच्या माध्यमातून वाट मिळत असते. उत्सवावर बंधने घालून, प्रत्येक गोष्टीसाठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले की, कार्यकर्त्यांचा उत्सवातील उत्साह कमी होतो आणि त्यांच्यातील ऊर्जेला चुकीचे वळण मिळते.
    सूर्यकांत पाठक (अखिल भारतीय ग्राहक पंचायत)

पारंपरिक वाद्यांसाठी परवानगी मिळावी
alt
गुजरातमध्ये मोदींनी पुढाकार घेऊन नवरात्रीसाठी परवानगी मिळवली, मग आपल्याकडे हे का शक्य होत नाही? गेल्या काही वर्षांमध्ये गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. वर्गणी मागणे, मंडळांमधील वादावादी असे गुन्हे जवळपास बंद झाले आहेत. २००५ नंतर मंडळांवर दरवर्षी ध्वनिप्रदूषणाचे खटले दाखल केले जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आहे. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ता किमान दोन महिने सातत्याने कष्ट करत असतो. मात्र, प्रत्येक वर्षी आयत्यावेळी बंधने घातली जातात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. मिरवणुकीच्या वेळी कोण आहे हे न पाहताच कार्यकर्ता दिसला की, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त मिरवणुकीचे रथ सजवणारे कलाकार, इलेक्ट्रिशियन यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. हा सर्व वाद टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी पारंपरिक वाद्ये वाजवण्यासाठी मंडळांना परवानगी मिळावी.
    अ‍ॅड. प्रताप परदेशी (गणेश मंडळांचे खटले लढणारे वकील)

गणपतींची संख्या कमी करायला हवी
alt
मी पुण्याची महापौर होते तेव्हा लोकांना गणेशोत्सवात गुलाल उधळू नका अशी विनंती सातत्याने करत होते. काही ठिकाणी मला विरोधही झाला. एकदा महापौर मंडपाजवळ एक मंडळ विसर्जन मिरवणूक घेऊन आले असताना मी त्यांना गुलाल न उधळण्याविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी जवळपास पोतेभर गुलाल माझ्या डोक्यावर टाकला होता. मात्र काही वर्षांपासून या काळात उधळल्या जाणाऱ्या गुलालाचे प्रमाण जवळजवळ बंद झाले आहे. गुलालाव्यतिरिक्त मला जाणवणारी आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे गेल्या काही वर्षांत पुण्याचा प्रचंड विस्तार झाला आहे. तरीही पुण्याचा गणेशोत्सव मात्र पुणे शहर आणि पेठांमध्येच साचून राहिला आहे. या भागांत या उत्सवाची वाढ एकवटलेली दिसते. अर्थातच उत्सवाची गर्दीही या मध्यवर्ती भागांतच होते आहे. सुरक्षेचा विचार लक्षात घेऊन गणपतींची संख्या कमी करायला हवी आहे.
    कमल व्यवहारे (महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)

लोकांचा मिरवणुकीला विरोध नसतोच
alt
शहराची भौगोलिक रचना पाहिली तर मध्यवर्ती असणाऱ्या चार चौकांत मिरवणुकीची गर्दी प्रामुख्याने होते. हा सगळा भाग व्यापार व्यावसायिकांचा आहे. या भागात राहणाऱ्यांना मिरवणुकांची सवय झाली आहे. मिरवणुकीचा त्रास होत असेल तर इथली वृद्ध मंडळी शहराच्या दुसऱ्या भागांतील नातलगांकडे राहायला जातात. पण या लोकांचा मिरवणुकीला विरोध नाही. मंडळांना रात्रीच्या वेळी किमान महापौर मंडपापर्यंत तरी वाजत-गाजत मिरवणूक काढण्याची परवानगी मिळाली पाहिजे.
    गोपाळ तिवारी (सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी)

या कार्यक्रमात प्रकाश कदम (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी महापालिका), नागेश बांदल (कसबा गणपती मंडळ), सुनील रासने (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट), उल्हास शेट्टी (नगरसेवक, पिंपरी), राजू गोलांडे (माजी नगरसेवक, पिंपरी), सुहास पोफळे, बाबा डफळ (श्रीमतं भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट),संजय मते (अखिल मंडई मंडळ) या मान्यवरांनीही आपली मते मांडली

‘गणेशोत्सव आणि सुरक्षितता’ या विषयावर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी www.youtube.com/LoksattaLive  येथे भेट द्या .