कल्पक अभियंता Print

 

प्रतिभा खानोलकर-जोशी - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

भारतात पाणीपुरवठा पद्धती,  धरणं, नद्यांवरील पूल बांधणीत मोलाचे कार्य करणारे कल्पक अभियंता एम. विश्व्ोश्वरय्या यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मुंबई पालिकेत जलप्रकल्प अभियंता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे व अलीकडेच निधन पावलेले जलप्रकल्प अभियंता यशवंत कामत यांच्याविषयी..
निसर्गाने ऋतुचक्रानुसार केलेला जलवर्षांव जलाशयात एकत्रितपणे साठविण्याची कल्पकता व दूरदृष्टी मानवाने दाखविली नाही तर अचानक निर्माण झालेल्या निसर्गकोपाचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतील.

म्हणूनच अशा अचानकपणे निर्माण होणाऱ्या निसर्गकोपाचा विचार करून देशातील शासन यंत्रणा, महापालिका मानवाच्या जीवनावश्यक गोष्टींचे म्हणजेच पाणी, हवा, सूर्यप्रकाश (वीज) इ.साठी मोठमोठे प्रकल्प, शहरातील अनेक बुद्धिमान तंत्रज्ञ, अभियंते यांच्यामार्फत संघटित सहकार्याने व त्यांच्यातील कल्पकतेच्या, संशोधनातील तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्ण उपयोग देशहितासाठी अनेकविध योजना शहरांसाठी व गावांसाठी राबवीत असतात.
अशा अनेकविध प्रकल्पांतील एक प्रकल्प असतो जलवर्षांवाचे पाणी साठविण्यासाठी प्रचंड मोठे तलाव, सरोवरे, धरणे बांधणे व ते पाणी प्रचंड व्यासांच्या जलवाहिनींचे जाळे पसरवून शहर व गावोगावी नागरिकांना पाणीपुरवठा करणे.
अशा मोठमोठय़ा प्रकल्पांसाठी महानगरपालिकेच्या अनेक तंत्रज्ञ, स्थापत्यविशारद, अनेक अभियंते, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कष्टकरी मजुरांपर्यंत संघटितपणे कुशलपणे कामे करत असतात. अशा अनेक व्यक्तींना हाताशी घेऊन प्रमुख प्रकल्प अभियंते काम करत असतात.अशात अनेक कल्पक, बुद्धिवंत प्रकल्प जल अभियंत्यांपैकी एक होते यशवंत हरी कामत. ते मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्याचे प्रमुख (हायड्रॉलिक इंजिनीअर) प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून (१९४२ ते १९७२) सालापर्यंत कार्यरत होते.  कामत यांची मुंबई महानगरपालिकेत नोकरीत असताना प्रकल्प जल अभियंता म्हणून असलेल्या कारकीर्दीत केलेली कामे लक्षणीय आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत जनतेसाठी जीवनदायिनी पाण्याच्या जलवाहिन्या जोडण्याच्या संदर्भात विशेषत: शहरातील व उपनगरातील प्रमुख जलवाहिन्या जोडण्याच्या, त्यांची देखभाल करण्याच्या, तलावांवर नियंत्रण करण्याच्या (तानसा, वैतरणा, विहार) तलावासंदर्भात कामे केली. कामत यांनी बी.ई. सिव्हिलची पदवी घेतल्यानंतर १९४२ साली ते मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्याचे निरीक्षक म्हणून प्रथम कामास लागले आणि १९७२ साली मुंबई महापालिकेचे ‘प्रमुख प्रकल्प जलअभियंते’ म्हणून निवृत्त झाले. आपल्या महापालिकेच्या कारकीर्दीत त्यांनी संघटितपणे अनेक वैशिष्टय़पूर्ण कामे केली.
अशा अनेक कामांतील काही खास वैशिष्टय़पूर्ण कामे ही जलवाहिन्यांचे कित्येक मैल दूर असे जलवाहिनी जोडणीच्या संदर्भातील होती. वैतरणा प्रकल्पावर असताना त्यांनी तानसा ते भांडुपपर्यंत ३८ मैल लांबीची व आठ फूट व्यासाची पोलादाची प्रमुख जलवाहिनी टाकण्याचे काम त्यांच्याच देखरेखीखाली झाले होते. ही जलवाहिनी वैशिष्टय़पूर्ण अशा शंख पद्धतीने टाकण्यात आली होती व त्या वेळी ती भारतात नवीन पद्धत ठरली होती.
तसेच वैतरणा तलावातून मुंबई शहराला जादा पाणीपुरवठा व्हावा म्हणून बेलनाला ते भांडुपपर्यंत टाकायच्या ४२ मैल लांबीच्या प्रमुख जलवाहिनीचे आराखडे व अंदाजप्रकल्पाचे जवळजवळ ७० टक्के काम त्यांनीच पूर्ण केले होते. कामत यांचा मलबार हिल येथे नवीन प्रणालीचे ‘पंपिंग स्टेशन’ (उदंचन केंद्र) बसविण्यात फार मोठा सहभाग होता. सो. ये. शास्त्री हे त्या वेळी महापालिका आयुक्तपदावर होते, त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. या केंद्रामुळे दक्षिण मुंबईच्या काही क्षेत्राच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळा वाढविणे शक्य झाले होते. पाणी गळती सुधारणे, ती शोधून काढणे, साथीच्या रोगांची लगण होवू नये म्हणून पाण्याचे वेळोवेळी नमुने घेऊन तपासणे, मुख्य जलवाहिन्या तपासणे, स्वच्छ ठेवणे वगैरे अनेक गोष्टींवर सातत्याने भर दिला जात असे. सर्वसाधारणपणे पाण्याची गळती २४०० मि.मी. (९६ इंच) व्यासाच्या प्रमुख जलवाहिन्यांचा विस्तार सांध्यावर निर्माण होते. या जलवाहिन्या ‘गर्डर’चा आधार देऊन रुळावर बसविलेल्या असतात, त्याच्या गळणाऱ्या विस्तार सांध्याची दुरुस्ती करायची तर त्याचे विशिष्ट भाग काढून ती करणे आवश्यक असते. १९६३ मध्ये उपजल अभियंता व १९६४ मध्ये अप्पर वैतरणा प्रकल्पावर कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी प्रकल्पाची विकास करण्याची जबाबदारी हाती घेतली. ते इंडियन स्टॅण्डर्ड कमिटीवर सभासद म्हणून व कॉन्व्हर्नर म्हणूनही होते. भातसा ‘एस’ स्कीम आणि सव्‍‌र्हिस, रिझरव्हायर्स ‘इनलेट्स’ व आऊटलेट्स अशा मोठय़ा मास्टर प्लानवर त्यांनी काम केले. सध्या प्रचलित असलेले पीव्हीसी पाइप्स हे कामतांनी प्रथम उपयोगात आणले होते. पाण्याचे वाटप व पाणीपुरवठय़ाची पद्धत सुधारण्यासाठी, त्यात नवनवीन शोध लावून त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या विभागातील होतकरू अभियंते निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक अभ्यासक्रम, शिबीरं ते आयोजित करीत. कामत यांनी (पाइप लाइन्स) जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती कशी व कुठून होते यावर संशोधन करून गळतीद्वारे वाया जाणारे पाणी वाचविण्याकरिता पीव्हीसी पाइप्स उपयोगात आणले.
मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला. आपल्या नोकरीतील सहकाऱ्यांच्या मुलांसाठी, स्त्रियांसाठी त्यांची जीवनशैली सुखावह होण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. उदा. स्त्रियांसाठी लघुउद्योगांसाठी सोयीसुविधा, मुलांना खेळासाठी जागा अनेक संस्थांना उदा. आनंदवन (वरेरी) हिंगण्याची कन्याशाळा, कॅन्सर पेशंटसारख्या संस्थांना सढळ हाताने मदत करत. जनहितासाठी पाण्याचे मोठे मोठे प्रकल्प व त्यासाठी राबणाऱ्या मुंबई महापालिकेच्या असंख्य सहकाऱ्यांच्या मदतीने निसर्गकोपाला शह देण्याची वेळच येऊ नये, असे पाण्याचे पूर्वनियोजन किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या कार्याच्या योगदानातून कामत यांनी दाखवून दिलेले आहे.