गुंगी आणि चटके Print

 

प्रशांत कुलकणी - रविवार, १६ सप्टेंबर २०१र्२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुणाला तरी, कुणी तरी काढलेलं, कुणाचं तरी पेंटिंग आवडलं नाही म्हणून त्यांनी लोकशाही मार्गाने चित्रकाराच्या घरासमोर निदर्शनं केली. त्या वेळी चित्रकाराने गॅलरीत येऊन त्यांची माफी मागितली. नंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन निदर्शक चित्रकाराला घेऊन त्याच्या प्रदर्शनाच्या गॅलरीत गेले. तिथे प्रथम चित्रकाराला, नंतर चित्रांना काळं फासण्याचं डेमॉन्स्ट्रेशन झालं. अखेरीस त्या काळे फराटे मारलेल्या रंगीत चित्रांना जगभर प्रसिद्धी मिळाली व चित्रकाराला लाखो डॉलर्स!


कुणाला तरी, कुठल्या तरी फडतूस गाण्यातला एक शब्द खटकला. त्यांनी त्या फडतूस गीतकाराला माफी मागायला लावली, परिणामी त्या गाण्याच्या कोटय़वधी सीडी विकल्या गेल्या. (प्रत्यक्षात या प्रकरणात कोणी तरी विकलं गेलं, अशी चर्चा दबक्या आवाजात बॉलीवूडमध्ये सुरू होती)
केवळ दोन आठवडेच आयुष्य असणाऱ्या सिनेमातला एक प्रसंग फारच आक्षेपार्ह असल्याचं कुणाला तरी वाटलं. त्यामुळे त्या सिनेमाचा जन्म त्या आक्षेपार्ह दृश्याच्या गर्भपातानंतरच झाला असं कळलं. (या अशा गाळल्या गेलेल्या अनेक दृश्यांना एकत्र करून एक नवा चित्रपट तयार होतोय असंही कळलं)

कुठल्या तरी वस्तीत कुणाला तरी पुतळा पाहिजे म्हणून आंदोलन झालं. नंतर एक दिवस त्या पुतळ्याला चपलांचा हार घातल्यावर गोळीबार झाला.  नंतर कुणाचाही हात पोहोचणार नाही, इतक्या उंचीवर तो पुतळा आता नेऊन ठेवलाय.  आता या असामान्य पुतळ्याला अतिसामान्य नेते क्रेनमधून उंचावर जाऊन बरोबरी साधतात व हार घालतात.
एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये एका प्रख्यात गायिकेला एक अतिप्रख्यात चित्रकार भेटला व म्हणाला, ‘मला तुमचा आवाज आवडतो, पण शब्द नाही!’ यावर ती गायिका म्हणाली, ‘मला तुमची चित्रं आवडतात, पण ती हवेमध्ये काढलेली, प्रत्यक्षातली नाहीत!’ या वादामुळे समाजामध्ये गायन व चित्रकला या दोन्ही विषयांमधला रस वाढीस लागला व अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना क्रिकेट क्लासमधून काढून संगीत, चित्रकलेच्या क्लासला घातलं!
सर्वात कहर म्हणजे कुणी तरी वस्तुस्थिती दाखवणारं एक चित्र काढलं, तर त्याला (म्हणजे त्या चित्राला) अनेकांनी व्यंगचित्र म्हणायला सुरुवात केली. लोक विशेषत: पोलीस आपल्याला व्यंगचित्रकार म्हणताहेत असं कळल्यावर तो चित्रकार अपमानाने एकदम बेशुद्ध पडला. त्याला लगेच हलवलं. शुद्धीवर आल्यावर त्याला वाटलं, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत व डॉक्टर आपल्याला तपासताहेत. पण प्रत्यक्षात तो तुरुंगात होता व पोलीस त्याच्या खिशात जामीन मंजूर झाल्याचा कागद कोंबत होते. या प्रकारात त्या बिचाऱ्याची दाढी एकदम सहा इंचांनी वाढली व तो खराखुरा व्यंगचित्रकार दिसायला लागला!
वर्तमानपत्रातल्या या असल्या बातम्यांनी वैतागून गेल्यामुळे मी टी.व्ही.वरच्या सरकारी बातम्या पाहायचं ठरवलं. निवेदिका निर्जीव चेहऱ्याने व रुक्ष आवाजात सांगत होती, ‘नव्या आर्थिक, सामाजिक व राजकीय धोरणांनुसार गेल्या पंचवीस वर्षांपासून देशभरात मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक मठ्ठपणाची लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. आता हा कार्यक्रम यशस्वी झाला असून, या लागवडीला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालंय. गेल्या पाच वर्षांपासून या झाडांना फुलं धरू लागली असून, यावर्षी प्रचंड दुष्काळामुळे जोरात पीक आलं आहे. सर्वसाधारणपणे अधिवेशनाच्या काळात याची बोंडं उकलायला सुरुवात होते. नंतर यातून विशिष्ट प्रकारचा रस पाझरतो व त्याचा सुगंध आसमंतात पसरतो. हा द्राव वाळला की प्रत्येक राजकीय पक्ष तो आपल्या पद्धतीने प्रोसेस करून ‘सांस्कृतिक अफू’ तयार करतो. या सांस्कृतिक अफूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीही किंमत नसली तरी देशांतर्गत बाजारपेठेत वाढती मागणी आहे. सध्या या सांस्कृतिक मठ्ठपणाच्या सुगंधामुळे देशभरातील वातावरण धुंद झाले असून, त्यामुळे अनेक भ्रष्टाचार, कुपोषण, दुष्काळ वगैरे त्रासांचा दीर्घकालीन विसर पडतो. हे एक प्रकारचं ‘पेन किलर’ आहे. या लागवडीला शासनातर्फे शंभर टक्के अनुदान मिळतं. विशेष म्हणजे दोन निवडणुकांच्या पिकांच्या दरम्यान आंतरपीक म्हणूनही सांस्कृतिक मठ्ठपणाची लागवड करता येते.’
फोर जी किंवा फाय जी वगैरे आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा सुगंध टी.व्ही.वाटे घरात येईल व या असल्या सुगंधांची मला अ‍ॅलर्जी असल्याने मी टी.व्ही. बंद केला. या अस्वस्थतेवर उतारा म्हणून जगातल्या उत्तम राजकीय व्यंगचित्रांचा संग्रह पाहायला सुरुवात केली. राजकीय व्यवस्थेवर, प्रकरणांवर, व्यक्तींवर परखड भाष्य करणारी अनेक व्यंगचित्रं पाहिल्यावर मी थोडा ‘नॉर्मल’ झालो.
‘झेंडा’ हे प्रत्येक देशाचं मानचिन्ह, ओळख आणि आनंदाने सन्मानाने मिरवायचं प्रतीक अशी आपली समजूत. या बाबतीत एका अमेरिकन मासिकात आलेलं एक व्यंगचित्र दिसलं. एका समुद्रकिनाऱ्यावर अनेक स्त्री-पुरुष तिथल्या संस्कृतीप्रमाणे मोजकेच कपडे घालून मौजमजा करताहेत. त्यातच एक टंच तरुणी अगदी म्हणजे अगदीच मोजके कपडे घालून फिरतेय. मुख्य म्हणजे तिचे ते कपडेही अमेरिकन झेंडय़ापासून बनविलेले दिसताहेत. या वेळी तिला एक पोलीस अधिकारी हटकतोय व म्हणतोय, ‘‘हे एरवी मी मुळीच खपवून घेतलं नसतं, पण या वेळी जाऊ दे! कारण आज आपला स्वातंत्र्यदिन आहे!’’
अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यावर तर हजारो व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली असतील, पण दुर्दैवाने अमेरिकन लोकांना भावनाच नसल्याने त्या दुखावल्या जात नाहीत. जगातल्या एखाद्या देशातलं नीट चाललेलं सरकार ‘लष्करी क्रांती’ करून खाली खेचायचं आणि त्या जागी त्यांच्या लष्करप्रमुखाला गादीवर बसवायचं हा अमेरिकन सरकारचा आणि तिथल्या लष्कराचा एक आवडता छंद आहे, हे आपण सारे जाणतोच! अध्यक्ष निक्सन यांच्या काळात (१९७३) दक्षिण अमेरिकेतील चिली देशात लष्करी क्रांतीने डावं सरकार उलथवलं गेलं आणि लष्करप्रमुख ऑगस्तो पिनोशे सत्तेवर आला. त्या संबंधातलं सोबतचं व्यंगचित्र काळजीपूर्वक पाहावं असं- विशेषत: मांडीवरच्या बाळाच्या हातातलं पिस्तूल आणि निक्सन यांनी घातलेला अमेरिकन ध्वजाचा गाऊन! ब्रिटिश व्यंगचित्रकार मॅक याने तर त्याच्या व्यंगचित्र संग्रहाच्या मुखपृष्ठावर मार्गारेट थॅचर यांच्यासह त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ नग्नावस्थेत कॅरिकेचरिंगसाठी पोझ देतंय असं व्यंगचित्र रेखाटलं होतं (असल्या बीभत्स(!) हिडीस(!) व सनसनाटी(!) व्यंगचित्राबद्दल मॅकवर तिथे हक्कभंगाचा प्रस्ताव आला की नाही हे माहिती नाही, अध्यक्ष महोदय!)
एका व्यंगचित्रात वॉटरगेट प्रकरणात निक्सन हे पूर्ण नग्नावस्थेत दाखवले असून, निव्वळ ‘वादग्रस्त टेप्स’च्या साहाय्याने ते लज्जारक्षण करताहेत असं चित्र आहे.
राजकीय व्यंगचित्रांमध्ये जे प्रखर भाष्य अपेक्षित आहे, त्याची अजून आपल्याला फारशी सवय झालेली नाही. वर उल्लेखिलेल्या सुगंधामुळे गुंगी येत असेल तर अशा भाष्यांचे चटके देऊन जाग आणावी लागते. बऱ्याच वेळेला या चटक्यांमुळे अपमान होतो असं पेशंट्स म्हणतात. त्या वेळी त्यांना आणखी चटके देण्याची गरज असते हे नक्की.