आवाज कुणाचा? Print

 

स्वैर अनुवाद: राजेंद्र येवलेकर - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांत आवाजाची पातळी ही मानवी आरोग्यास हानिकारक ठरेल इतकी जास्त असते, हे वास्तव  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून समोर आले आहे . त्यामुळे यंदा तरी आवाजाची पातळी कमी करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे..
जगभरातील हिंदू गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. भाद्रपद महिन्यात येणारा हा सण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांत साजरा होतो.

महाराष्ट्रात हा सण शिवाजीमहाराजांनी सुरू केला, त्यात अर्थातच संस्कृती व राष्ट्रवादाला उत्तेजन देणे हे खरे उद्देश होते. त्यानंतरही गणेश चतुर्थीचा हा सण सुरूच होता. फक्त १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला एक वार्षिक उत्सवाचे रूप देऊन तो सार्वजनिक केला. कालांतराने या सणाचे स्वरूप बदलत गेले. हा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा होऊ लागला. त्याला ध्वनिवर्धकाच्या आवाजाची जोड मिळाली, त्यामुळे आवाजाची पातळी वाढतच गेली. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांत आवाजाची पातळी ही मानवी आरोग्यास हानिकारक ठरेल इतकी जास्त असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी आवाजाच्या पातळीचा अभ्यास करून ध्वनिप्रदूषणाबाबत अहवाल सादर करीत असते. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ७ ते ११ सप्टेंबर २०११ दरम्यान ध्वनिप्रदूषणाची स्थिती काय होती, याबाबत मंडळाने सादर केलेल्या अहवालातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.

गोंगाट ज्याला आपण नॉइज असे म्हणतो त्याची व्याख्या नको असलेला जास्त पातळीचा आवाज अशी सोप्या भाषेत करता येते. ध्वनिप्रदूषण याचा अर्थही नको असलेल्या हानिकारक ध्वनीचा आपल्या रोजच्या जीवनात होत असलेला अनावश्यक प्रवेश असा सांगता येईल. ध्वनी हा कानाला सुखदही असू शकतो, कमी आवाजातील आल्हाददायक संगीत असा अनुभव देते. ज्या ध्वनीमुळे वेदना व इतर आक्रमक भावना निर्माण होतात त्याला गोंगाट असे म्हणतात. मानवाच्या आरोग्यावर व पर्यावरणावर अशा अनावश्यक आवाजांचा अनिष्ट परिणाम होतो. ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम २००० अन्वये निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल या मर्यादेत हवी. शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल या मर्यादेत आवाजाची पातळी असली पाहिजे. प्रत्यक्षात आवाजाची पातळी खूप जास्त असते असे दिसून येते.
* ध्वनिप्रदूषणामुळे श्वसनाच्या तरंगलांबीवर परिणाम होतो, रक्तदाब,
   हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, रक्तातील कोलेस्टेरॉल यांचे प्रमाण वाढते.
* कान दुखतात, विचित्र प्रकारचे आवाज येतात, दमल्यासारखे
   वाटते. एकूणच आरोग्यावर परिणाम होतो.
* कर्मचाऱ्यांची कामातील एकाग्रता कमी होते. परिणामी
   त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
* ध्वनिप्रदूषणाने झोप शांत लागत नाही व त्यामुळे माणसाला
   चिडचिडेपणा येतो. कामावर लक्ष केंद्रित होत नाही.
* ध्वनिप्रदूषणामुळे प्राण्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे
   प्राण्यांच्या चेतासंस्थेवर वाईट परिणाम होतो.
* ध्वनीमुळे निर्माण होणारी स्पंदने अप्रत्यक्षपणे इमारती, पूल,
   स्मारके यांना हानिकारक ठरतात.
* ध्वनी मोजण्याची एकके- ध्वनी हा विविध कंप्रतांच्या लहरींचा बनलेला असतो. माणसाला फक्त २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या कंप्रतेच्या दरम्यानचा ध्वनी ऐकू येतो. मानवी कान हा फार संवेदनशील असतो. तो त्यापुढील कंप्रतेच्या आवाजाने त्याच्यावर परिणाम होतो. या कंप्रतेच्या आवाजांचे मापन डेसिबलमध्ये केले जाते.
ध्वनिमापक यंत्रात खरे तर विविध कंप्रतेच्या ध्वनीला सारखाच प्रतिसाद दिला जातो, पण मानवी कान विविध कंप्रतेच्या ध्वनिलहरींना वेगवेगळा प्रतिसाद देतो. मग ध्वनिमापन यंत्रावर ध्वनीचे मापन सदोष ठरू शकते. त्यावर उपाय म्हणून त्यात फिल्टर किंवा वेटिंग दिले जाते, त्यामुळे वेगवेगळय़ा कंप्रतेच्या ध्वनीला मानवी कानाप्रमाणेच वेगवेगळा प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे वेटिंगसाठी डेसिबलच्या डीबी या अक्षरांपुढे ‘ए’ हे अक्षर जोडले जाते व मापन डीबीएमध्ये दाखवले जाते. ध्वनीची दाबपातळी ही प्रत्यक्ष दाब व संदर्भ दाब यांच्या गुणोत्तराच्या बेस १० घेऊन काढलेल्या लॉगॅरिथमच्या २० पट असते.
* ध्वनिप्रदूषणाची मानके -केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाच्या काही हानिकारक पातळय़ा ठरवून दिलेल्या आहेत. त्यांचा समावेश पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मध्ये करण्यात आला आहे.
१. दिवसाची वेळ ही सकाळी सहा ते रात्री दहा अशी गृहीत धरली आहे.
२. रात्रीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी गृहीत धरली आहे.
३. रुग्णालये, शिक्षण संस्था व न्यायालये यांच्या आजूबाजूचा १०० मीटरचा परिसर हा शांतता क्षेत्र मानला जातो.
४. शांतता क्षेत्रात वाहनांचे भोंगे, ध्वनिवर्धक व फटाके वाजवणे निषिद्ध मानले जाते.
* पाहणीची पद्धती- ध्वनिप्रदूषणाची पातळी ही ७ ते ११ सप्टेंबर २०११ दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री बारा या काळात मोजण्यात आली. टाइप २ ध्वनिपातळी मापकाने आवाजाचे मापन केले असून, त्यात ‘ए’ फिल्टर वापरण्यात आला आहे. गणेश मंडपासून जवळच्या निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय परिणाम होतो याची तपासणी करणे हा या पाहणीचा हेतू होता. यात १२ शहरांतील एकूण ८९ ठिकाणची ध्वनिपातळी तपासण्यात आली.
निष्कर्ष- या अभ्यासातून असे दिसून आले की बहुतेक सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी ही सुसहय़ पातळीपेक्षा किंबहुना पर्यावरण सुरक्षा कायद्यात ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त होती. ध्वनिपातळी ही पाचव्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला सर्वाधिक होती. कारण तो उत्सवाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यावेळी काढलेल्या मिरवणुकांत ढोल, डीजे, बँड यांचा वापर केला जातो. ध्वनिमापन हे डीबीएमध्ये दाखवले आहे. त्यात ७ ते ११ सप्टेंबर या काळात ८९ ठिकाणी कमाल व किमान ध्वनिपातळी किती होती याची नोंद निरीक्षणांमध्ये आहे.
मुंबईतील जी २५ ठिकाणे अभ्यासासाठी निवडली होती, त्यात अंधेरी येथे आवाजाची पातळी सर्वात जास्त होती.  नवी मुंबईत वाशी येथे आवाजाची पातळी सर्वाधिक नोंदली गेली.  ठाण्यात वागळे इस्टेट भागात ध्वनिपातळी सर्वाधिक होती. पुण्यात दगडूशेठ मंदिर परिसरात ध्वनिपातळी सर्वाधिक होती.  नाशिकमध्ये पंचवटी भागात ध्वनिपातळीने उच्चांक गाठला होता.  औरंगाबाद शहरात सिटी चौक भागात आवाजाची पातळी सर्वाधिक नोंदली गेली. नागपुरातील गोळीबार चौक भागात आवाजाची पातळी जास्त होती.  कल्याणमध्ये शिवाजी चौक भागात आवाजाची पातळी १०० डीबीएपेक्षा जास्त होती. अमरावतीत राजकमल चौक भागात आवाजाची पातळी धोक्याच्या वर होती. जळगाव जिल्हय़ात शास्त्री टॉवर चौक भागात पाचही दिवस आवाजाची पातळी सर्वाधिक होती. कोल्हापूर जिल्हय़ात खासबाग मैदान भागात आवाजाची पातळी सर्वाधिक होती. साताऱ्यात मोती चौक भागात आवाजाची पातळी सर्वाधिक नोंदली गेली.
२०११च्या गणेशोत्सवातील आवाजाच्या कमाल व किमान
नोंदी शहरांनुसार पुढीलप्रमाणे होत्या.
मुंबई- पाच दिवसांच्या अभ्यासात २५ ठिकाणी आवाजाची मापने घेण्यात आली. त्यात ११ सप्टेंबरला अंधेरी येथे सर्वाधिक म्हणजे ९७.८ डीबीए आवाजाची नोंद झाली. मुलुंड येथे ८ सप्टेंबरला ४९.८ डीबीए इतक्या कमी आवाज पातळीची नोंद झाली.
नवी मुंबई- ११ सप्टेंबरला वाशी येथे सर्वाधिक म्हणजे १०४.२ डीबीए इतक्या कमाल आवाज पातळीची नोंद झाली. कोपरखैरणे येथे ७ सप्टेंबरला ४५.५ डीबीए इतकी कमी आवाज पातळी नोंदली गेली.
 ठाणे- ९ सप्टेंबरला वागळे इस्टेट येथे सर्वाधिक म्हणजे ९४.५ डीबीए इतक्या कमाल पातळीची नोंद झाली, तर कळवा-सीएसएम हॉस्पिटल भागात ४५.५ डीबीए इतक्या किमान पातळीची नोंद झाली.
 पुणे- ११ सप्टेंबरला दगडूशेठ मंदिर भागात सर्वाधिक म्हणजे १०१.४ डीबीए इतक्या आवाज पातळीची नोंद झाली, तर ७ सप्टेंबरला थेरगाव येथे सर्वात कमी म्हणजे ४५.८ डीबीए इतकी आवाज पातळी नोंदली गेली.
नाशिक- ११ सप्टेंबरला सर्वाधिक आवाज पातळी १०५.२ डीबीए ही पंचवटी भागात नोंदली गेली, तर ७ सप्टेंबरला सर्वात कमी आवाज पातळी दहीपूल येथे ६३.३ डीबीए इतकी नोंदली गेली.
 औरंगाबाद- ११ सप्टेंबरला सर्वाधिक आवाज पातळी ही सिटी चौक भागात ९६.७ डीबीए इतकी नोंदली गेली. ७ सप्टेंबरला सर्वात कमी आवाज पातळीची नोंद सिडको येथे ४९.६ डीबीए इतकी झाली.
नागपूर- गोळीबार चौक येथे ११ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे ९२.५ डीबीए इतकी आवाज पातळी नोंदली गेली. ११ सप्टेंबरला रामदास पेठ भागात सर्वात कमी म्हणजे ४९.१ डीबीए इतकी आवाज पातळी नोंदली गेली.
 कल्याण- ११ सप्टेंबरला शिवाजी चौक भागात सर्वाधिक म्हणजे १०७.९ डीबीए इतकी, तर ७ सप्टेंबरला उल्हासनगर येथे सर्वात कमी म्हणजे ५८.७ डीबीए इतकी कमी आवाज पातळी नोंदली गेली.
जळगाव- ११ सप्टेंबरला सर्वाधिक आवाज पातळी शास्त्री टॉवर येथे १००.३ डीबीए इतकी नोंदली गेली, तर ८ सप्टेंबरला किमान आवाज पातळी शनी पेठ पोलीस स्टेशन येथे ६०.२ डीबीए इतकी नोंदली गेली.
 कोल्हापूर- ११ सप्टेंबरला खास मैदान येथे सर्वाधिक आवाज पातळी ९०.९ डीबीए इतकी नोंदली गेली, तर ७ सप्टेंबरला किमान आवाज पातळी ५२.९ डीबीए ही महालक्ष्मी मंदिर येथे नोंदली गेली.
 सातारा- ९ सप्टेंबरला सर्वाधिक आवाज पातळी ९४.५ डीबीए मोती चौक येथे नोंदली गेली तर ७ सप्टेंबरला पवई नाका येथे सर्वात कमी म्हणजे ५८.३ डीबीए इतकी किमान आवाज पातळी नोंदली गेली.
विविध शहरांतील २००७ ते २०११पर्यंतच्या
आवाज पातळय़ांचा तुलनात्मक अभ्यास
२००७-२०११ या पाच वर्षांच्या काळात गणेशोत्सवात ज्या कमाल व किमान आवाज पातळय़ांची नोंद झाली, त्यात काही शहरांत आवाज पातळी कमी झाल्याचे दिसून आले, तर काही शहरांमध्ये ती अजूनही होती तशीच जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता २०११ मध्ये आवाज पातळी कल्याण व जळगाव वगळता सर्व ठिकाणी कमी झाली. पुणे व नाशिक या शहरांत आवाजाची पातळी २०१०मध्ये होती तेवढीच दिसून आली. काही ठिकाणी आवाज पातळी कमी झाली असली तरी अजूनही ते मानवी आरोग्यास धोकादायक मर्यादेवर आहे.
 मुंबई- मुंबईत गेल्या वर्षांपेक्षा आवाजाची पातळी कमी झालेली दिसली. २००७ मध्ये ती ६३-१०२ डीबीए होती. २००८ मध्ये ती ५०.२-९७ डीबीए होती. २००९मध्ये ४६-१०५ डीबीए होती, तर २०१० मध्ये ५८-१११ डीबीए आवाज पातळी होती, आता २०११मध्ये ती ४९-९७ डीबीए इतकी खाली आली आहे.
नवी मुंबई- नवी मुंबईत आवाजाची पातळी गत चार वर्षांपेक्षा कमी झाली. २०१० मध्ये आवाजाची पातळी सर्वाधिक म्हणजे ५७-१२६ डीबीए इतकी होती.
 ठाणे- ठाण्यात किमान व कमाल आवाज पातळी २०११ मध्ये कमी झाली ती ४५-९४ डीबीए इतकी होती. २००९ मध्ये ६०-९५ डीबीए, २००८ मध्ये ५६-९६ डीबीए व २०१० मध्ये ५०.३-१०८ डीबीए इतकी आवाजाची पातळी होती.
पुणे- पुण्यात २०११मध्ये आवाजाची पातळी ४५-१०१ डीबीए होती. २०१० मध्ये ती ३९-१०१ डीबीए नोंदली गेली. २००७ मध्ये ५६-९९ डीबीए, २००८ मध्ये ६२-१०७ डीबीए व २००९ मध्ये ५३-१०१ डीबीए इतकी आवाजाची पातळी नोंदली गेली होती. याचा अर्थ आवाजाच्या पातळीत फारसा फरक पडलेला नाही.
नाशिक- २०११ मध्ये आवाजाची कमाल व किमान पातळी ६३-१०५ डीबीए नोंदली गेली. २०१० मध्ये ती ४६-१०४ डीबीए होती. किमान आवाज पातळी वाढलेली दिसते व एकूणच आवाजाची पातळी जास्त व कायम आहे.
औरंगाबाद- २०११मध्ये गतवर्षीपेक्षा आवाजाची पातळी कमी झाली आहे. २०११ मध्ये ती ४९-९६ डीबीए नोंदली गेली. २०१० मध्ये ती ५५-९८ डीबीए होती. २००९ मध्ये ४१-९६ डीबीए होती.
नागपूर- आवाजाची पातळी नागपूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २०११ मध्ये वाढली ती ४९-९२ डीबीए इतकी नोंदली गेली. २०१०मध्ये ती ५१-९० डीबीए होती.
कल्याण- या शहरात आवाजाची कमाल पातळी वाढलेली दिसते. २०१० मध्ये ही पातळी ६९-९८ डीबीए होती ती २००९ मध्ये ६७-९५ डीबीए होती. गतवर्षी म्हणजे २०११ मध्ये ती ५८-१०७ डीबीए इतकी नोंदली गेली.
जळगाव- कमाल व किमान आवाज पातळी गतवर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसते. २०११ मध्ये आवाजाची पातळी ६०-१०० डीबीए होती, तर २०१० मध्ये ५३-९८ डीबीए इतकी आवाजाची पातळी नोंदली गेली होती.
 कोल्हापूर- कमाल व किमान आवाज पातळी ही गतवर्षीपेक्षा कमी झालेली दिसते. २०१० मध्ये आवाजाची पातळी ६६-१३१ डीबीए होती तर २०११ मध्ये ती ५२-९० डीबीए होती. तीन वर्षांच्या तुलनेतही आवाजाची पातळी कमी होताना दिसत आहे.
सातारा- येथेआवाजाची पातळी २०११ मध्ये कमी झालेली दिसते. किमान आवाज पातळी मात्र वाढलेली दिसते. २०१०च्या तुलनेत एकंदरीत आवाजाची पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
निष्कर्ष - या अभ्यासात १२ शहरांमधील ८९ ठिकाणी ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०११ दरम्यान सायंकाळी ६ ते रात्री १२ या काळात आवाजाची पातळी मोजण्यात आली. त्यात कोल्हापूर, सातारा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, अमरावती या शहरांत आवाजाची पातळी गेल्या काही वर्षांत कमी होत असल्याचे दिसून आले आहे. नागपूर व जळगाव या शहरात आवाजाची पातळी वाढत चालल्याचे दिसून येते. पुणे व नाशिक या शहरात आवाजाची पातळी स्थिर असून सायंकाळी ६ ते १० व सायंकाळी १० ते १२ या काळात सर्वच ठिकाणी आवाजाच्या पातळीत बदल झालेले दिसतात. पुण्यात रोजच्या रोज आवाजातील पातळीत बदल झाल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या  काही दिवसांतील आवाजाच्या पातळीच्या नोंदीनुसार या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ही पाहणी आसमंतातील एकूणच आवाजाच्या मापनावर आधारित आहे त्यामुळे त्यात उत्सवाशिवाय वाहतूक, घरगुती कामे, बांधकामे यांच्या आवाजांचाही समावेश होत आहे. आवाजाच्या पातळीत होत जाणाऱ्या बदलात उत्सवाच्या काळातील आवाजाचे प्रतिबिंब असले तरी त्याचा या आवाज पातळीतील नेमका वाटा किती आहे याचा अभ्यास यात केलेला नाही. असे असले तरी सार्वजनिक जागरूकतेमुळे, वेळेच्या र्निबधांच्या अंमलबजावणीमुळे ध्वनीच्या पातळीचे प्रमाण कमी होत चालले आहे. ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मध्ये नमूद केलेल्या आवाज पातळीपेक्षा आसमंतातील आवाज हा जास्त पातळीवर आहे. त्यामुळे आवाजाची पातळी कमी करण्यासाठी आणखी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न करण्याची गरज आहे.