आनंदयात्री Print

 

रामचंद्र गुहा  - रविवार, १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्याच वर्षी एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर सचिनला ‘भारतरत्न’ देण्यात यावे, अशी मागणी करणारे हेच प्रेक्षक, अवघ्या वर्षभरात ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती अशी, त्याच्या निवृत्तीची मागणी करू लागले . भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हे वर्तन कृतघ्नपणाचे आहे असे म्हणावे लागेल.
‘सचिनने निवृत्तीचा निर्णय घेण्याची वेळ आली..’ भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा पहिल्या डावात त्रिफळा उडाला आणि मदानात प्रेक्षकांमध्ये माझ्यामागे बसलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थाने आपल्या मताची िपक टाकली. आपल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत भारताच्या या सर्वोत्तम फलंदाजाने अनेक सुंदर खेळींची शिल्पे जिथे उभारली,

त्यात बंगळुरूमध्येच कानावर पडलेली ही प्रतिक्रिया संवेदनशून्यतेचेच प्रतीक म्हणायला हवे. दुसऱ्या डावात सचिन पुन्हा एकदा अपयशी ठरला. प्रेक्षकांच्या (निवृत्तीविषयीच्या) कुजबुजीचे आता उच्चरवात रूपांतर झाले होते. गेल्याच वर्षी एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर सचिनला सत्वर ‘भारतरत्न’ देण्यात यावे, अशी मागणी करणारे हेच प्रेक्षक, अवघ्या वर्षभरात ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती अशी मागणी करू लागले होते.
भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हे वर्तन कृतघ्नपणाचे आहे असे म्हणावे लागेल. (किंबहुना अशा टोकाच्या भूमिका घेण्यासाठी भारतीय चाहते कुप्रसिद्धच आहेत.) चिन्नास्वामी स्टेडियमच्या पॅव्हिलियनमध्ये बसून सचिनने निवृत्ती घ्यावी, अशी मागणी करणारा हाच मध्यमवयीन गृहस्थ, गेल्या वर्षी सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा, अशी आग्रही मागणी करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होता.

अशा चाहत्यांच्या कंपूचा मी तेव्हाही घटक नव्हतो आणि आजही नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. भारतरत्न हा सन्मान ज्येष्ठ वैज्ञानिक, राष्ट्रपुरुष, विद्वान, समाजसेवक आणि फार तर शास्त्रीय संगीतातील कलाकार यांच्यासाठी राखून ठेवला जावा असे मला वाटते. केवळ काही क्षणांची करमणूक करणारे क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी पात्र नाहीत आणि भविष्यातही नसावेत, असे माझे मत आहे. एकीकडे मी जरी असे म्हणत असलो, तरी दुसरीकडे हे सत्य उरतेच की, हा विश्वविख्यात फलंदाज खडतर काळ अनुभवत असताना आपण सर्वानी त्याच्या निवृत्तीचा आग्रह धरण्याऐवजी त्याचा सुवर्णकाळ आठवण्याची अधिक गरज आहे.
१९९०च्या दशकाच्या सुरुवातीस मी दिल्लीमध्ये राहत होतो. पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेनंतर थोडय़ाच दिवसांनी विल्स चषकाचा एक सामना झाला. या सामन्यात दिल्लीच्याच फिरोजशहा कोटला मदानावर मी सचिनला खेळताना पहिल्यांदाच बघितले. त्या सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला नव्हता, पण मला अगदी स्पष्टपणे आठवतो आहे तो बुजरा सचिन.. (या सामन्यात) क्षेत्ररक्षणासाठी मदानात उतरताना चाहत्यांनी गराडा घालून त्याच्या शर्टाच्या बाह्यांना, त्याच्या टोपीला, त्याच्या हातापायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बावरलेला लहानगा सचिन! त्यानंतर तीनच वर्षांनी सचिनला कोटलावरच भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात खेळताना मी पुन्हा एकदा पाहत होतो. या वेळी तो एक स्टार खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता. या सामन्यात, शाळकरी सवंगडी असलेल्या विनोद कांबळीबरोबर सचिनने एक मोठी भागीदारीही रचली.
झिम्बाब्वेच्या संघात त्या वेळी जॉन ट्रायकॉस नावाचा अतिशय उच्च दर्जाचा फिरकीपटू होता. चाळिशीत असूनही त्याची हाय अ‍ॅक्शन, चेंडूवरील नियंत्रण आणि चेंडूला उंची देण्यातील वैविध्य वादातीत होते. एकीकडे क्रीझवरून पुढे सरसावत विनोद कांबळी ट्रायकॉसचे चेंडू उंच भिरकावत होता, तर दुसरीकडे सचिन ट्रायकॉसच्या चेंडूंना स्लिप आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांच्या मागे कलात्मकतेने वळवत धावा वसूल करीत होता. सत्तरीच्या घरात गेल्यावर, सचिनने मारलेला कव्हर ड्राइव्ह खाली राहू शकला नाही. पाहुण्यांच्या उजेश रणछोड नामक फिरकीपटूच्या त्या चेंडूवर जॉन ट्रायकॉसनेच सूर मारत पकडलेल्या झेलामुळे सचिन बाद झाला. विनोदने मात्र त्या सामन्यात द्विशतक झळकावले होते.
या कसोटीनंतर लगेचच मी बंगळुरूत परतलो. माझ्या घरच्या मदानावर मी सचिनला सर्वप्रथम बघितले ते श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळताना. मुरलीधरन हा तेव्हा कसोटी क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू होता. ज्या शैलीदारपणे सचिनने अनुभवी ट्रायकॉसला हाताळले त्याच सुंदरतेने कट्स आणि स्विपच्या फटक्यांची मुक्त उधळण करत सचिनने अननुभवी मुरलीची गोलंदाजी खेळून काढली. या कसोटी सामन्यात नवीन चेंडू घेतल्यावर, लंकेचा वेगवान गोलंदाज प्रमोदिया विक्रमसिंघे याला सचिनने ऑफ साइडला खणखणीत चौकार लगावले. ९६ धावांवर खेळत असताना डॉन अनुरासिरी या फिरकीपटूने सचिनचा ऑफ स्टंप उडवला. यानंतर चारच वर्षांनी, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना पाहण्यासाठी मी अमेरिकेतून परतलो. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी शेन वॉर्नवर चांगलेच वर्चस्व गाजवले होते. नवज्योत सिद्धू, तेंडुलकर आणि अझरुद्दीन या तिघांनीही वेगवेगळ्या शैलीत वॉर्नविरुद्ध धावांची लयलूट केली होती. सिद्धूने लॉफ्ट करीत, सचिनने पूल आणि स्विपचा वापर करीत, तर अझरने ड्राइव्ह आणि फ्लिकचा वापर करीत वॉर्नला जेरीस आणले होते.
मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीपर्यंत वॉर्नचे पूर्णपणे खच्चीकरण करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. बंगळुरूच्या त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. वेगवान गोलंदाजांचा पहिला स्पेल टाकून झाल्यानंतर नवख्या गेविन रॉबर्टसनला आश्चर्यकारकपणे गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूचे सचिन आणि कंपनीने किती मानसिक खच्चीकरण केले होते याचा हा उत्तम नमुना. एकीकडे फिरकीपटूंसमोर दोन-तीन धावा काढत, तर दुसरीकडे मायकेल कॅस्प्रोविचसारख्या वेगवान गोलंदाजाला स्ट्रेट ड्राइव्ह्ज लगावत, सचिनने मदानावर आपली हुकमत गाजवली होती. या सामन्यात सचिनने कारकीर्दीतील आपला नवीन उच्चांक, १७८ नोंदवला.
आता आपण काळाचा पट पाच-सहा वर्षांनी पुढे सरकवू या. चिन्नास्वामी स्टेडियममधीलच हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. मी गॅलरीत बसलो होतो. प्रेक्षकांचा मूड आणि नूरही स्पष्ट दिसत होता. पाहुण्यांनी प्रथम फलंदाजी करताना ३०० हून अधिक धावांची मजल मारली होती. भारताने काही विकेट्स लवकर गमावल्या. मात्र सचिन मदानावर असेपर्यंत सामना जिंकण्याची आशा मावळली नव्हती. या सामन्यात खेळताना सचिनने अनेक फटके कल्पकतेने निवडले होते. पॅडल स्विप, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारला जाणारा इनसाइड आऊट फटका, हळुवार लेट कट्स अशा फटक्यांनी सचिन क्रिकेट विश्वातील सर्वात दर्जेदार मानल्या जाणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या क्षमतेची जणू परीक्षाच घेत होता. सचिनच्या प्रत्येक चौकारानंतर आकाशाकडे नजरा वळवीत माझ्या अवतीभवती बसलेले चाहते सचिन.. सचिन.. म्हणून हर्षोल्हासाने ओरडत होते. क्रिकेट जगतातल्या सर्वात बलाढय़ संघासमोर अगदी ईश्वरालाही कल्पनातीत वाटावेत अशा फटक्यांची पोतडी या ‘देवाने’ उघडली होती आणि ती पाहण्याचे भाग्य या प्रेक्षकांना लाभले होते. एकीकडे सचिन नेटाने खेळत असताना दुसऱ्या टोकाच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक नांगी टाकल्यामुळे तर सचिनची खेळी अधिक ठळकपणे उठून दिसत होती. लेट कट मारताना त्रिफळाचीत होण्यापूर्वी अवघ्या     ८० चेंडूंत सचिनने ९० धावा फटकावल्या.
या खेळीनंतर काही दिवसांतच सचिनला टेनिस एल्बोने ग्रासले. या आजाराचा परिणाम सचिनच्या हालचालींवर आणि फटकेबाजीवरही झाला. सचिनच्या हालचालींवरील हा परिणाम एव्हढा जाणवत होता की, माझ्या एका स्तंभात मी सचिनचे वर्णन ‘देवदत्त प्रतिभेची मूर्ती जेव्हा ‘सांधली’ जाते’ असे केले होते. पुरेशी विश्रांती आणि योग्य उपचारांनी सचिन यातून पूर्णपणे बरा झाला. २०१० मध्ये याच सचिनला चिन्नास्वामी स्टेडियममध्येच आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच कसोटीत खणखणीत द्विशतक झळकविताना मी पाहिले. कट, पूल, कव्हर ड्राइव्ह, लेग ग्लान्स आणि गॅलरीला रिझवणारे उत्तुंग षटकार.. अशा सर्वच फटक्यांची सचिनने मुक्त उधळण केली होती. (हा लेख मी जाणीवपूर्वक माझ्या आठवणींवर आणि कोणत्याही आकडेवारीचा संदर्भ न तपासता लिहिला आहे. पण मला वाटते, २०१० मधील या खेळीमुळे सचिनने एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारलेले बंगळुरूकरांना पाहायला मिळाले असावेत.)
यानंतर अवघ्या सहाच महिन्यांनी २०११ च्या विश्वचषक स्पध्रेत बंगळुरूमध्येच मी सचिनला पुन्हा एकदा उत्कृष्ट शतक झळकवताना पाहिले. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना समर्थपणे करण्याची सचिनची क्षमता यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता आली. जेम्स अँडरसन आणि ग्रॅमी स्वान या इंग्लंडच्या त्या संघातील सर्वोत्तम गोलंदाजांची सचिनने अक्षरश: पिसे काढली. अँडरसनला फ्लिक आणि ग्लान्सच्या फटक्यांनी तर स्वानला उंचावरून ड्राइव्ह मारत सचिनने बेजार केले. सचिनची ही खेळी अत्यंत वेगवानही होती. मात्र प्रत्युत्तरादाखल अँड्रय़ू स्ट्रॉस याच्या तितक्याच दमदार शतकाने इंग्लंडने यशस्वी पाठलाग करताना सामना बरोबरीत सोडवला.
माझ्या आयुष्यातील पहिला रणजी सामना मी १९६८ मध्ये पाहिला, तर पहिला कसोटी सामना १९७२ मध्ये. माझ्या प्रत्यक्ष मदानात जाऊन सामने पाहण्याला आता ४५ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत जितका शुद्ध आणि निभ्रेळ आनंद सचिनने ज्या विलक्षण सातत्याने दिला, तितका आनंद मला अन्य कोणत्याही फलंदाजाने आजवर दिलेला नाही. अगदी आमच्या पिढीचा ‘हीरो’ म्हटला जाणारा, ज्याला मी हस्तांदोलन केले असा पहिला कसोटीपटू, माझ्या शहरातील इतकेच काय पण माझ्या राज्याचा हीरो असलेला गुंडाप्पा विश्वनाथ यानेही नाही. तोच विश्वनाथ, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खेळताना, रणजीमध्ये कर्नाटककडून खेळताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळताना धावांच्या राशी रचल्या (आणि त्यासुद्धा अत्यंत शैलीदार आणि कलात्मक खेळाने) त्यानेही आजवर मला इतक्या सातत्याने आनंद दिलेला नाही.. गेली अनेक वष्रे सातत्याने सचिन तेंडुलकर जे देत आला आहे त्याबद्दल मी तर त्याचा मन:पूर्वक ऋणी आहेच, पण चिन्नास्वामी स्टेडियमच्या पॅव्हिलियनमध्ये बसून कृतघ्नपणे बाष्कळ टिप्पण्या करणारा ‘तो’ चाहतासुद्धा सचिनचा ऋणी ठरतो.
अनुवाद : स्वरूप पंडित