रविवार विशेष : नराश्य: एक सार्वत्रिक समस्या.. Print

डॉ. अद्वैत पाध्ये, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२

१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन’ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी त्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संस्थेमार्फत  एक विषय ठरवून ३ ते १० ऑक्टोबर या काळात सात दिवसांचा सप्ताह साजरा होतो. या वर्षीच्या सप्ताहाचा विषय आहे, ‘डिप्रेशन इज अ ग्लोबल बर्डन!’ नराश्य किंवा डिप्रेशन या व्याधीबाबत आपल्या भारतातील स्थिती काय आहे? या व्याधीची लक्षणे कोणती? औषधोपचार कोणते? या विषयीचा हा विशेष लेख..


एकविसाव्या शतकात विशेषत: २०२०पर्यंत ‘डिप्रेशन’ किंवा ‘नराश्य’ हृदयविकाराखालोखाल नंबर दोनचा जगाला ग्रासणारा विकार असेल असे नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. जणू काही संपूर्ण पृथ्वीच ‘मेलान्कोलिक’ होणार असाच त्या अहवालाचा अर्थ आहे. ४६०-३७० बी.सी.मध्ये सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता हिपोक्रेट्सने डिप्रेशन किंवा नराश्याला मेलँकोलिया असे म्हटलेय. ब्लॅक बाइलचे प्रमाण वाढले की, मेलँकोलिया म्हणजे नराश्य किंवा औदासिन्य येते असे त्याचे म्हणणे होते. या दोन गोष्टींचा अन्वयार्थ लावल्यास संपूर्ण जगच मेलँकोलिक होणार आहे. तसेच आणखी एका संशोधनानुसार संपूर्ण जगात भारत हा सगळ्यात निराशाग्रस्त देश असल्याचे निदर्शनास आले आहे. फक्त आपल्या भारतातच ३६ टक्के लोक हे नराश्यग्रस्त आहेत. अर्थातच ही काही चांगली गोष्ट नक्कीच नाही. किंबहुना काळजी करण्यासारखी, विचार करण्यासारखी बाब आहे. अशी वेळ आपणावर येऊ नये म्हणून त्या विषयी आपण जास्त जागरूक होणे किंवा तशी वेळ आल्यास ताबडतोब उपाय करणे आवश्यक आहे.
अगदी आपल्या रामायण, महाभारतासारख्या ग्रंथांतही चिंता, नराश्य या विकारांचे उल्लेख सापडतात. आयुर्वेदातील चक्र संहितेत (ख्रिस्तपूर्व ६००)सुद्धा शरीरातील द्रव्यांचे संतुलन बिघडल्याने नराश्यासारख्या मनोव्याधी जडतात, असे वर्णन केलेले आहे. चरक व सुश्रुत यांनीसुद्धा उन्माद, अपस्मार, वेड, फेफरे, चिंता, नराश्य अशा ‘विकृत’ अवस्थांचे वर्णन करून त्यावर उपाय सुचवले आहेत. स्मृती व आकलन यांमधील दोषांमुळे या विकृती जन्म घेतात, असे त्यांनी म्हटले होते, जे आज काही प्रमाणात नक्कीच ग्राह्य धरले आहे हे नक्की!
सध्याच्या काळात या नराश्याचे प्रमाण नक्कीच वाढत आहे. संपूर्ण जगभरातील लोकांना येत असलेल्या नराश्याच्या तुलनेत भारतीयांचा विचार केला तर हे प्रमाण नऊ टक्के इतके आहे. तर फक्त आपल्या देशापुरता विचार केल्यास भारतीय व्यक्तीला आयुष्यभरात नराश्य येण्याची शक्यता पंधरा वर्षांपूर्वी जवळजवळ ११ टक्के होती. ती आता जवळजवळ १६ टक्क्यांएवढी वाढली असून त्यातसुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. स्त्रियांमध्ये १६.३ टक्के तर पुरुषांमध्ये १३.९ टक्के एवढी शक्यता असते. नराश्याच्या लक्षणांमध्ये पाहिले तर आत्महत्येचे विचार येण्याचे प्रमाण १२.४ टक्के आहे, तर उदास वाटणे, थकवा वाटणे यांचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे. ज्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर कमी आहे अशा लोकांमध्ये नराश्याचे प्रमाण अर्थातच जास्त असून ते १९.३ टक्के इतके  आहे. तर वरच्या स्तरात ते फक्त सहा ते आठ टक्के इतके आहे. घटस्फोटितांमध्ये नराश्याचे प्रमाण २६.५ टक्के, विधुर/विधवांमध्ये २० टक्के तर नुकतेच लग्न झालेल्यांमध्ये १५.४ टक्के एवढे आहे. लहान मुलांमध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये हेच प्रमाण सौम्य नराश्य आणि तीव्र नराश्याचे अनुक्रमे २७ टक्के व सहा टक्के एवढे आहे. लहान मुलांपेक्षा किशोरवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते (चार टक्के लहान मुलांत तर १५ ते २० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये). ही सर्व टक्केवारी ही भारतीय संशोधनाप्रमाणे दिलेली आहे. एकूणच निराशेचा हा डोह किती गहिरा होत चालला आहे याचेच ही आकडेवारी निदर्शक आहे हे नक्की!
नराश्य येण्यामागे अनेक प्रकारची कारणे, अनेक प्रकारचे घटक कारणीभूत असतात. जीवनातील विविध तणावदायी घटना, जैविक, आनुवंशिकतेची/जनुकीय कारणे, विविध शारीरिक आजार किंवा विविध  प्रकारची औषधे, काही मानसिक विकार असे नानाविध घटक नराश्य येण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.
जीवनातील घटनांमध्येही वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक घटना अंतर्भूत आहेत. परीक्षेतील अपयश, आíथक नुकसान, शाळेतील, घरातील बदल, शिक्षकांचे, पालकांचे, मित्रांचे वर्तन, प्रेमभंग किंवा त्यात येणारे अडथळे, बेकारी, विवाह, विवाहोत्तर जीवनातील कलह/जबाबदाऱ्या, जोडीदाराचा वियोग/मृत्यू, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू/वियोग यांसारख्या अनेक वैयक्तिक, कौटुंबिक घटनांचा नराश्याशी घनिष्ट संबंध आहे.  
जैविक कारणांचा विचार करता यात मेंदूतील जीव-रासायनिक संप्रेरकांमध्ये होणारा बदल, आनुवंशिकता हे घटक अंतर्भूत आहेत. मेंदूतील सिरोटोनिन तसेच नॉर एप्रिनफ्रिन आदी जीव-रासायनिक संप्रेरके आपल्या भावनांचे, वर्तनाचे नियंत्रण करतात. सिरोटोनिन, नॉर एप्रिनेफ्रिन यांच्या मेंदूतील प्रमाणामध्ये म्हणजेच मेंदूच्या पेशींमध्ये असलेल्या जागेत ज्याला 'Synapse' (सिनॅप्स) म्हणतात, तेथील प्रमाणात घट झाल्यामुळे नराश्य येते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. काही वेळा प्रेपामिन नावाच्या जीवरासायनिक संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने आत्महत्या किंवा वैचारिक, भावनिक, शारीरिक मंदत्व येणे अशी लक्षणे दिसतात.
घरातील अतिशय जवळच्या म्हणजे आधीच्या पिढीतील कोणाला नराश्य असेल तर पुढच्या पिढीत ते येण्याचे प्रमाण किंवा शक्यता नक्कीच जास्त असते. थायरॉइड हॉर्मोनचे प्रमाण घटल्याने तसेच स्टेरॉइड हार्मोनचे प्रमाण वाढल्याने, मेलायेनिनचे प्रमाण घटल्यानेदेखील नराश्य येत असते. विविध शारीरिक आजार उदा. हृदयविकार, ब्रेन टय़ूमर्स, मधुमेह, मल्टिपल स्क्लेरॉसिस, फिट्सचा आजार, पक्षाघात, कंपवात किंवा पाíकन्सन्सचा विकार, किडनीचे विकार, सांधेदुखी यामुळेसुद्धा नराश्य येते.
दारू, गांजा तसेच अनेक नशिल्या पदार्थाच्या व्यसनांमुळेसुद्धा नराश्य येण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.  स्किझोफ्रेनिया, मंत्रचळेपणा, फोबिया वगरेसारख्या मनोविकारांमध्ये एक भाग म्हणून नराश्य आलेले अनेक वेळा आढळून आलेले आहे. ब्लडप्रेशरची, स्टेरॉइड्स असलेली औषधे अशा आणि अँटिसायकॉटिक औषधे यांमुळेदेखील नराश्य या सगळ्याचा एक दुष्परिणाम म्हणून येऊ शकते. कधी कधी व्यक्तिमत्त्व दोष किंवा आपण असे म्हणू शकतो की, व्यक्तीचे त्याचे स्वत:तील दोषदेखील त्याला नराश्याच्या गत्रेत नेण्यास, ते वाढवण्यास मदत करतात.
नराश्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मेजर डिप्रेशन ((Major Depression)) आणि दुसरा आहे, बायपोलार डिप्रेशन (Bipolar Depression) म्हणजे उन्मादाशी आलटून पालटून नराश्य येणे असे दोन प्रकार आहेत. मग अशा नराश्याची लक्षणे कोणती असतात? तर सातत्याने उदास वाटणे किंवा कोणत्याच दैनंदिन, आनंददायी किंवा इतर गोष्टींत रस न वाटणे अशी मुख्य लक्षणे असतात. कशातच उत्साह वाटत नाही, दैनंदिन गोष्टी करायच्या आहेत म्हणून करणे, खेळ, टीव्ही, गप्पाटप्पा यांत रस न वाटणे, लंगिक संबंधांची इच्छा/रस कमी होणे किंवा होतच नाही ही लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबरीने झोप कमी येणे/ जास्त येणे, भूक वाढणे/कमी होणे, वजन कमी होणे किंवा वाढणे, काहीच न सुचणे, एखादी निर्जीव वस्तू झाल्याप्रमाणे वैचारिक, शारीरिक मंदत्व येणे, नकारात्मक विचार सतत येत राहणे, जीवन अर्थहीन वाटणे, अपराधीपणाचे विचार येणे, आत्महत्येचे विचार येणे आदी नानाविध लक्षणे आढळून येतात.
तीव्र नराश्यात आत्महत्येचे विचार, प्रयत्न, आक्रस्ताळेपणा, वैचारिक-शारीरिक मंदत्व, संशय, भास, टोकाचे निराशावादी विचार आदी लक्षणे दिसतात. जोडीला अनेकदा चिंता, भीती, मंत्रचळ, व्यसने अशी लक्षणेही आढळतात.
लहान मुलांमध्ये/किशोरवयीन मुलांमध्ये शाळा, कॉलेज बुडवणे, अभ्यासात अधोगती, असामाजिक वर्तन, व्यसनाधीनता, लिंगपिसाटपणा किंवा लैंगिक विकृती
आदी नराश्यासम लक्षणे (Depressive Equivalents)  दिसतात. वयस्क, ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतीवर परिणाम पण स्मृतिभ्रंश नाही 'Pseudo Dementia' अशी लक्षणे दिसून येतात.
नराश्यावर लवकरात लवकर औषधोपचार केल्यास नराश्यग्रस्त व्यक्ती निश्चितच बरी होऊ शकते. यातील पहिली पायरी म्हणजे ‘स्वीकार’. मला/माझ्या व्यक्तीस नराश्य आले आहे, त्यास मानसोपचारतज्ज्ञाकडे, डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे हे ओळखून वेळीच डॉक्टर/फॅमिली फिजिशियन/मनोविकारतज्ज्ञ/समुपदेशक यांची मदत घेणे. ही सुरुवात होण्यास वेळ लागला तर रुग्ण बरा होण्याचा कालावधी वाढू शकतो.
‘नराश्य’ या व्याधीवरील उपचारासाठी आज अनेक, नानाविध औषधे, जुन्या इमिप्रामिनपासून ते अगदी नव्या डेसवेनला फॅक्सिनपर्यंत जणू फौज उभी आहे. परंतु अजूनही औषधे म्हटली की, अनेकजण फक्त दुष्परिणामांचा विचार करतात, म्हणजे दिवस म्हटले की, सकाळऐवजी फक्त रात्रीचाच विचार करण्यासारखे आहे. इफेक्ट असतो तेथेच साइड इफेक्ट असू शकतात. औषधोपचाराबरोबरच समुपदेशन, वर म्हटल्याप्रमाणे सद्विवेकी वर्तणूक
उपचार (Rational Emotive Behavior) समुपदेशनाद्वारे केल्यास नराश्यावर मात करता येते. या जोडीला योगोपचार, कलांमध्ये, धार्मिक, सामाजिक कार्यात भाग आदी जोडीचे उपचार आहेतच. तीव्र स्वरूपाच्या नराश्यात इलेक्ट्रो कन्व्हल्जिव थेरपी, FMS म्हणजे ट्रास मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ज्याला मराठीत चुंबकीय उद्दीपन म्हणतात वगरे उपचारांनी खूपच लवकर आराम मिळतो.
म्हणजेच नराश्याचा ‘स्वीकार’, विवेकी दृष्टिकोन ठेवून आवश्यक त्या सर्व उपचारांचा ‘एकत्रित’ उपयोग केल्यास म्हणजेच केवळ औषधे/ केवळ समुपदेशन/फक्त योगोपचार नव्हे तर सर्वाचा एकत्रित प्रयोग केल्यास नक्की यश मिळू शकते. हे उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने व ते सांगतील तितका काळ केल्यासच फरक येतो व टिकून राहतो. नराश्य म्हणजे सर्दी नाही की चार दिवस औषध घेतले, बरे वाटले बंद केले. म्हणून त्या औषधांचा ‘योग्य’ काळ उपचार घेणे अत्यावश्यक ठरते.
पण मग नराश्य येऊच नये यासाठी आवश्यक ती खबरदारी, काळजी आपण घेऊ शकतो का? तर वाचकहो, तशी काळजी नक्कीच घेता येते. दैनंदिन व्यायाम व योग, सकस, सात्त्विक आहार, वेळेचे नियोजन, विवेकी-सकारात्मक विचारसरणीचा अवलंब. ही चतु:सूत्री नराश्य न येण्यासाठी मदत करू शकते, जी कठीण वाटत असली तरी अशक्य निश्चितच नाही. म्हणूनच जरी आज नराश्य ही एक ‘सार्वत्रिक’ समस्या होऊ पाहत असली तरी या चतु:सूत्रीचा अवलंब आपणास त्यापासून लांब ठेवू शकतो. तरीसुद्धा कधी आपण या व्याधीला बळी पडलोच तर लगेच ‘स्वीकार’ करा व औषधोपचार करा हाच या जागतिक मानसिक स्वास्थ्य सप्ताहाचा संदेश आहे!