स्वरमंदिराच्या पूर्ततेसाठी हवे रसिकांच्या लोकवर्गणीचे दान Print

खास प्रतिनिधी, ठाणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

कल्याण शहरात गेल्या आठ दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे अभिजात संगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण करणाऱ्या कल्याण गायन समाजाने काळानुरूप बदलत नवे रूप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ भगीरथ मेहनत करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नवी इमारत उभी केली आहे. सर्वसामान्य रसिक आणि कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या उद्योजकांकडून मिळालेल्या देणग्यांमधून हे चार मजली भव्य सूरभुवन उभे राहिले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत.

अभिजात कलेचे आधुनिक स्वरूपात जतन करण्याचा एक आदर्श वस्तुपाठच या वास्तूच्या निमित्ताने कल्याण गायन समाजाने राज्यातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. या वास्तूत शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत तसेच नृत्याचे प्रशिक्षण वर्ग भरतात. त्याचप्रमाणे गुरुकुल पद्धतीनेही शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत शिकण्याची सोय येथे उपलब्ध आहे. संगीतविषयक तब्बल ८०० दुर्मिळ पुस्तके आणि १९८२ पासून संस्थेच्या सभागृहांमध्ये झालेल्या मैफलींचे ध्वनिमुद्रण अभ्यासकांना उपलब्ध आहे.
याशिवाय नव्या इमारतीत अद्ययावत ध्वनिमुद्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या दर्शनी भागात छोटेखानी कलादालन उभारून परिसरातील चित्रकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा विचार आहे. संस्थेचे सर्व संकल्पित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी अजून किमान ४० ते ५० लाख रुपये लागणार आहेत आणि लोकवर्गणीतूनच या स्वरमंदिराचे काम पूर्ण करण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय आहे. इच्छुकांनी कल्याण गायन समाज या नावाने धनादेश काढावेत.